अनाथ चिमणी पाखरे, माईंच्या प्रेमास पारखी!

26

(सिंधुताई सपकाळ श्रद्धांजली विशेष.)

सिंधुताई सपकाळ या एक भारतीय समाजसुधारक होत. त्यांना ‘अनाथांची माई’ म्हणून ओळखले जाते. भारतातील हजारो अनाथ मुलांचे पालन पोषण त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे केले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देतच त्यांचा सांभाळ केला आहे. मुलांनो, तो तुमचा आधारवड नुकताच कोसळला आहे रेऽऽऽ…! भारतातील स्त्रियांना जीवन जगणे म्हणजे खूपच कठीण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत त्यांना समाजातील अडचनींना सामोरे जावे लागते. त्यांना स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागते. असेच एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचे आहे. त्यांच्या पुरुषांनाही लाजविणाऱ्या अचाट कामगिरीमुळे सन २०१६मध्ये सिंधुताईंना सामाजिक कार्यासाठी डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चतर्फे साहित्यात डॉक्टरेट पदवी देण्यात आली. सिंधुताई संचलित काही संस्था- १) बाल निकेतन हडपसर, पुणे. २) सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा. ३) अभिमान बाल भवन, वर्धा. ४) गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा. ५) ममता बाल सदन, सासवड. ६) सप्तसिंधु महिला आधार, बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे. या आहेत. आपल्या जीवनामध्ये अडचणी कशा निर्माण होऊ शकतात? त्यांचा समर्थपणे सामना कसा केला पाहिजे? हे त्यांनी स्वानुभवातून दाखवून दिले आहे.

समाजसुधारक सिंधुताईंचा जन्म दि.१४ नोव्हेंबर १९४८ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात गुरेढोरे पाळणाऱ्या गरीब कुटुंबात झाला. एका गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांना चिंधड्या चिंधड्यांचे कपडे घालावे लागत होते. सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमानजी साठे होते. वडील सिंधुताईंचे शिक्षण घेण्यास उत्सुक होते. वडील त्यांना गुरे चारण्याच्या निमित्ताने बाहेर शाळेत पाठवत असत. आईचा विरोध आणि घरची आर्थिक परिस्थिती यांमुळे त्यांच्या शिक्षणाला खीळ बसली. आर्थिक परिस्थिती, लहान वयात घरातल्या जबाबदाऱ्या आणि बालविवाह यामुळे त्यांना फक्त चौथीपर्यंत शिकल्यानंतर शाळा सोडावी लागली होती.सिंधुताईं सपकाळ यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी वर्धा जिल्ह्यात झाला. लग्नानंतर त्यांना खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी उमेद गमावली नाही. त्यांच्या माहेरी त्यांनी महिलांच्या शोषणाविरूद्ध लढा दिला. जे वन विभाग आणि जमीनदारांसाठी शेण गोळा करण्यास लावत होते.

यामुळे त्यांचे जीवन अधिकच काटेरी झाले. या लढाईनंतर त्यांचे आयुष्य अधिक कठीण होईल हे त्यांना माहित नव्हते. वयाच्या २०व्या वर्षी जेव्हा त्या गरोदर राहिल्या, तेव्हा एका चिडलेल्या जमीनदाराने कपट मनाने घृणास्पद अफवा पसरविली कि हे मूल दुसर्‍याचे आहे. त्यामुळे पतीच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही त्यांना गावाबाहेर काढले. त्याच रात्री सिंधुताईला अतिशय निराशाजनक वाटले आणि मोठा धक्का बसला होता. त्यांनी एका गाईच्या गोट्यामध्ये मुलीला जन्म दिला. एकीकडे आपल्या वडिलोपार्जित घरी जाण्यासाठी त्यांनी धडपड केली, परंतु त्यांच्या आईनेही त्यांना नकार दिला.सिंधुताईंनी आपल्या गरजा भागवण्यासाठी रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकांवर भीक मागितली. त्यांचे व्यतीत झालेले अतिशय संघर्षमय जीवन हे स्वतःचे आणि मुलीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी होते.

जगण्याच्या या संघर्षमय प्रवासात त्या महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात चिकलदारा येथे आल्या. वाघ संरक्षण प्रकल्पामुळे तेथील तब्बल ८४ आदिवासी गावे रिकामी करण्यात आली होती. त्यांनी असहाय आदिवासी ग्रामस्थांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना वनमंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्यांच्या पर्यायी पुनर्वसनाची योग्य ती व्यवस्था केली. त्यानंतर सिंधुताई आपल्या मुलीसोबत रेल्वे स्थानकात राहू लागल्या. पोट भरण्यासाठी भीक मागत स्वत:सह मुलीला रात्री सुरक्षित ठेवण्यासाठी स्मशानभूमीत राहू लागल्या. आपल्या या संघर्षमय काळात त्यांना समजले की देशात अशी अनेक अनाथ मुले आहेत, ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी ठरविले, की जे कोणी अनाथ त्यांच्याकडे येतील त्यांची आई म्हणून सांभाळ करेल. त्यांनी स्वतःची मुलगी श्री दगडूशेठ हलवाई पुणे, महाराष्ट्र ट्रस्टला दत्तक दिली, कारण त्यांना सर्व अनाथ मुलांच्या आई बनणे सुलभ होऊ शकेल. बरीच वर्षे अथक परिश्रमानंतर सिंधुताईंनी चिकलदरा येथे पहिले आश्रम बांधले. आश्रमशाळांसाठी पैसे गोळा करण्यास त्यांनी बरीच शहरे आणि गावे पालथी घातली. आतापर्यंत त्यांनी १२०० मुलांना दत्तक घेतले, जे प्रेमाने त्यांना ‘माई’ म्हणून संबोधतात. त्यापैकी बरेच लोक आता अनेक ठिकाणी नामांकित डॉक्टर आणि प्रतिष्ठित वकील म्हणून काम करत आहेत.

सिंधुताई स्वतंत्र भारतात जन्मल्यानंतरही भारतीय समाजात उपस्थित सामाजिक अत्याचारांना त्या बळी पडल्या. आपल्या जीवनाचे धडे घेत त्यांनी महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम बनवले, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या बाबी उपलब्ध करून दिला. त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्‍या संस्थांनी असहाय आणि बेघर महिलांना मदत केली. आपले अनाथाश्रम चालविण्यासाठी त्यांनी पैशासाठी कुणापुढे हात कधीच पसरले नाहीत, त्याऐवजी त्यांनी सार्वजनिक व्यासपीठांतून प्रेरणादायी भाषणे केली आणि समाजातील वंचित व उपेक्षित वर्गांना मदत करण्यासाठी जनतेचा पाठिंबा मागितला. त्यांची आनंदाची बाब म्हणजे अनाथ मुलांसह राहणे, त्यांचे स्वप्न साकार करणे आणि त्यांना आयुष्यात आत्मनिर्भर व स्थायिक करणे, ही होय.

असा हा माई सिंधुताई सपकाळ यांच्या रूपातील आधारवड प्रदीर्घ आजाराने नुकताच दि.४ जानेवारी २०२२ रोजी कोलमडून पडला. कधीही भरून न निघणारी पोकळी आसमंतात तयार झाली. माई ऐसी सिंधुताई, पुन्हा काही होणे नाही! त्यांच्या अकस्मात निघून जाण्याने महाराष्ट्रच काय? तर अख्खे जगच अनाथ झाले आहे. सर्व अनाथ चिमणी पाखरे आज माईंच्या अजोड प्रेमाला पारखी पोरकी होऊन अधांतरीच भिरभिरू लागली आहेत. आता पुन्हा माई सिंधुताई सपकाळ यांची नितांत निकड भासू लागली आहे. माई तू धन्य आहेस, तुझ्यासारखी तूच! तुझ्या संतासमान पावन चरणारविंदावर ही तुटक्या फुटक्या शब्दांची विनम्र श्रद्धांजली!!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी[म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.]मु. एकता चौक- रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली, मो. ९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com