प्रदुषणाबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करा -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

26

🔸येरूर येथे प्रदुषणामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतीची पाहणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7जानेवारी):- जिल्ह्यातील काही औद्योगिक कंपन्या प्रदुषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कंपन्यांच्या प्रदुषणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कडक कारवाई करा, अशा सुचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. येरुर येथे प्रदुषणामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी निलेश तायवाडे, वेस्टर्न कोल फिल्डचे श्री. गुप्ता यांच्यासह औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

येरूर येथे प्रदुषणामुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पाहणी केली असता, शेतातील कापूस अक्षरश: काळा दिसत होता, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, अशा कापसाला बाजारभावाच्या 50 टक्केसुध्दा भाव मिळत नाही. एवढेच नाही तर या कंपन्यांनी अतिशय कमी प्रमाणात स्थानिकांना रोजगार दिला असून नागरिकांच्या शेतीचे तसेच जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या प्रदुषणाचे सुक्ष्म कण लोकांच्या डोळ्यात शरीरात जातात. त्यामुळे नागरिकांना कॅन्सर, दमा, हृदयरोग आदी रोगांनी ग्रासले आहे. एवढेच नाही तर जनावरेसुध्दा आजारी पडत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे.

उद्योगांच्या विरोधात आम्ही नाही. मात्र प्रदुषण नियंत्रणाबाबत नियमांचे कंपन्यांनी पालन करणे गरजेचे आहे. जे उद्योग या नियमांचे उल्लंघन करीत असेल त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा जीव महत्वाचा आहे. याचे भान कंपन्यांनी ठेवावे. कंपन्यांच्या परिसरात असलेल्या गावात ईपीएस नेहमी सुरू ठेवावे. तसेच मातीचा धुराळा उडणार नाही, यासाठी नियमित टँकरने पाणी मारावे. सार्वजनिक ठिकाणी एअर क्वॉलिटी मॉनेटरिंग सिस्टीम बसविणे गरजेचे, असेही ते म्हणाले.

बैठकीला चमन मेटॅलिक, ग्रेस इंडस्ट्रिज, गोपानी स्टील, विमला इन्फ्रास्टक्चर आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

येरूर येथे शेतीची पाहणी : जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी येरुर येथे प्रदुषणामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतीची पाहणी केली. शेतकरी प्रदीप जोगी आणि गुणवंत चंदनखेडे यांच्या शेतातील कापूस अक्षरश: काळा पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी गावक-यांनी मंत्र्यांसमोर समस्या मांडल्या. प्रदुषणामुळे नुकसान झालेल्या शेतमालाची कंपन्यांकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. काळ्या पडलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. रस्त्यावर कंपन्या पाणी मारत नाही. त्यामुळे प्रदुषणाचे धुलीकण नागरिकांच्या शरीरात जात असल्यामुळे नागरिकांना अनेक रोगांनी ग्रासले आहे. त्यामुळे अशा कंपन्यांविरोधात सक्त कारवाई करावी, अशी मागणी गावक-यांनी केली.

यावेळी प्रकाश देवतळे, रामू तिवारी, येरुरचे सरपंच मनोज आमटे, माजी पंचायत समिती सभापती विजय बलकी, नकोडाच्या ग्रामपंचायत सदस्या ममता मोरे, विद्या डांगे, मधूकर बरडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.