हे..राष्ट्रमाते..आई..जिजाऊ..

26

जिजाऊ” शब्द किंवा नावाचा ध्वनी नसून उतुंग आदर्श मातृत्वाचा निरंतर वाहणारा निर्झर आहे.या गौरवशाली मातृत्वाच्या अत्युच्च शिखराला जगात तोड नाही. आदर्श ममतेचा,संस्काराचा,शौर्याचा,धैर्याचा, स्वराज्याचा ज्वलंत साक्षात्कार म्हणजे माॕ.जिजाऊ…१२ जानेवारी १५९८ हा दिवस स्वराज्याची नवी पहाट घेवुन उगवला,वैभवशाली यादव कुळातील लखुजी जाधवांच्या घरी म्हाळसाराणीच्या पोटी एका दैदिप्यमान कन्येने सिंधखेडराजा येथे जन्म घेतला. कन्याप्राप्तीचे स्वप्न साकार होण्याच्या या घटनेने आनंदित होवून राजे लखुजी जाधवांनी हत्तीवरुन साखर वाटली.राजघराण्यातील या कन्येला राजकारण,घोडस्वारी,तलवारबाजी,मुसद्देगीरी,युद्धकलेचे धडे घरातुनच गिरवता आले.इ.स.१६१० शहाजी राजेंसोबत जिजाऊंचा विवाह झाला ही स्वराज्य स्थापनेतील महत्वाची घटना.

या वीर मातेच्या जीवनात आलेला एक एक प्रसंग व त्या प्रसंगाला धिरोदात्तपणे केलेला सामना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक एक पैलू आपल्याला प्रेरणा देवून त्यांचे अथांग व्यक्तिमत्त्व उजागर होते. माॕ.जिजाऊंनी त्यांच्या जीवनात जी संकटे प्रत्येक्ष अनुभवली ती जगातल्या एकाही मातेच्या वाट्याला आली व अनुभवली नसावी.
विवाहाच्या चार वर्षापुर्वीच १६०६ मध्ये सासरे मालोजी इंदापूरच्या लढाईत मारले गेले.काका शरीफजी व आई उमाबाईने शहाजीला सर्व बाबतीत परिपूर्ण बणवले होते. शहाजीराजे महान योध्दा राजनितिज्ञ विद्वान त्याचबरोबर महान दुरदृष्टीचा पितासुद्धा होते.स्वराज्याचे डोहाळे लागलेल्या अशा या वीरमातेने १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्यात एका छत्रपतीला जन्म दिला ते विश्ववंदे छत्रपती शिवराय.स्वतःच्या मुलाएवढेच कड्याकपारी राहणारे आदिवासी रामोशी भिल्ल कोळी कुणबी तेली माली महार,मांग….अठरापगड जातीच्या लोकांना आपल्या ममतेच्या पदराखाली घेवून प्राणाला प्राण देणारे मावळे तयार करणारी वात्सल्याची मुर्तीवंत उदाहरण म्हणजे माॕ “जिजाऊ”….

रयेतेच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी रयतेची काळजी घेणारा,शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावता कामा नये असा फर्मान काढणारा,प्रत्येक स्त्री ही आपल्या मातेसमान बघणारा व तिच्या सन्मानासाठी व रक्षणासाठी कठोर शिक्षा करणारा,स्वराज्यातील प्रत्येक मानसावर सारखं प्रेम करणारा,सैन्यातील प्रत्येक जाती धर्माच्या आपल्या मावळ्याला मुलाप्रमाणे वागणूक देणारा,त्यांच्या धार्मिक भावना जोपासनारा असा धर्मनिरपेक्ष विश्वातील महापराक्रमी आदर्श छत्रपती घडवतांना या मातेने स्वतः कोणत्याही संस्काराची तथा शिक्षणाची उणीव बाकी ठेवलेली नव्हती.माॕ जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीसाठी शिवाजीला एवढेच नव्हे तर नातू छ.संभाजीला सुद्धा घडविण्यात कसलीही कसर न ठेववता स्वराज्यासाठी जगात तोड नसणारे दोन दोन विश्ववंदे आदर्श महान छत्रपती घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंना जगात तोड नाही.अशी संस्काराची खान असणाऱ्या आदर्श माता आदर्श गुरु “माॕ.जिजाऊ”च…

खंडागळेच्या हत्ती प्रकरणावरुन झालेल्या गृहयुद्धात भावा दिराचा खुन,निजामाने कपटाने पित्याची भावांची केलेली क्रुर हत्त्या ,स्वराज्याच्या रणरणत्या धावपळीच्या दगदगीत गमवावी लागलेली स्वतःची चार अपत्ये,पती शहाजीचा मृत्यु,स्वराज्याच्या चहोबाजूंनी शत्रू चा वेढा या सर्व घटनांना धिरोदात्तपणे पाशवी रुढी परंपरा कर्मकांड अंधश्रद्धांना लाथाडून सामना करणारी योद्धा म्हणजे वीरमाता “जिजाऊ”….स्वराज्याच्या स्थापनेसाठी राजकिय मुसद्देगीरीत निंबाळकर,मोहिते, पालकर,इंगळे, शिर्के, गायकवाड, विचारे, जाधव,अशा मात्तब्बर सरदारांच्या मुलींसी आपल्या शिवबाचे विवाह लावून रक्ताचे नातेसंबंध प्रस्थापित करुन त्यांचा होणारा विरोध मोडून काढला यावरुन लक्षात येते की स्वराज्य स्थापनेसाठी मुसद्देगीरीला जगात तोड नसणाऱ्या मुसद्धी राजनितीज्ञ माॕ.”जिजाऊ”च…अफजलखानाची भेट असो ,पुरंदरला मोगलांचा वेढा असो,लाल महालात शाहिस्तेखानावरील छापा असो,औरंगजेबाच्या दाढेत जावून आग्र्याला शिव शंभू ची भेट असो, की पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका असो …..अशा स्वराज्यावरील महाकाय संकटात पोटच्या गोळ्याला शत्रूच्या दाढेत लोटून स्वराज्याचा एकच ध्यास घेतलेल्या जगातल्या एकमेव आदर्श स्वराज्य संकल्पीका राष्ट्रमाता राजमाता माॕ “जिजाऊ”च..

शुद्रांने राजा बणता कामा नये या महाराष्ट्रातल्या पुरोहितांनी राज्यभिषकाला केलेल्या विरोधाला न जुमानता सगळ्या विरोधावर मात करुन तत्कालीन मान्यतेप्रमाने छत्रपती चे छत्र धारण करण्यासाठी स्वराज्याची तिजोरी पणाला लावली.काशीवरुन पुरोहित गागाभट्टाला आणून ६ जुन १६७४ ला राज्यभिषक करवून स्वराज्याचा जगातला पहिला आदर्श छत्रपती आपल्या डोळ्यात साठवूनच स्वराज्याची स्वप्न साकार करणाऱ्या या वीर राष्ट्रमातेने स्वराज्यासाठी आपल्या आयुष्यचा त्याग करुन स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करुनच या राजमातेने राज्यभिषकानंतर अवघ्या अकरा दिवसांनी १७ जुन १६७४ ला रायगडाच्या पायथ्याशी पाचाडच्या वाड्यात अखेरचा श्वास घेतला.
अशा या धेय्यनिष्ठ,राजनिष्ठ,कर्तव्यदक्ष, दृढनिश्चयी, रयत हेच कुटुंब अशी रयतेप्रती कुटुंबवत्सलता,आदर्श मातृत्व,संस्काराची खाण,स्वराज्य संकल्पनेच्या त्यागमुर्ती,आदर्श गुरु असलेल्या राष्ट्रमाता राजमाता माॕसाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्ये विनम्र वंदन करुन १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्व शिवप्रेमींना शिवशुभेच्छा.

✒️रामचंद्र सालेकर(राज्यउपाध्यक्ष,शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र)मोब:-527139876

*। । जय जाजाऊ । ।*
————– ————–