उप प्रादेशिक परिवहन कार्यालय खबरदारी घेवून उद्यापासून सुरू

  48

  पुरोगामी संदेश नेटवर्क

  *कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर

  गडचिरोली :

  राज्यातील सर्व परिवहन कार्यालयामध्ये त्यांच्या अंतर्गत असणा-या शिबीर कार्यालयामधील कामे वगळता उर्वरित सर्व कामे जसे- अनुज्ञप्ती जारी करणे, अनुज्ञप्ती दुय्यम करणे, अनुज्ञप्ती विषयक सत्र कामे इ.. वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे, वायुवेग पथक इ. कामकाज सुरु करण्याबाबत शासनाकडून मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे आदेश प्राप्त आहेत. त्यानुसार दिनांक २२ जून पासून अनुज्ञप्ती व वाहन विषयक कामकाज उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली या कार्यालयात सुरु करण्यात येणार आहे.

  अनुज्ञप्ती व वाहन विषयक कामकाजाकरिता आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली (अपॉईन्टमेंट) सुरु करणे बाबत निर्देश दिल्यानुसार कार्यालयातील उपलब्ध अधिकारी/कर्मचारी यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामाकरिता कोटा निश्चित करण्यात आला आहे. शिकाऊ अनुज्ञप्ती करिता २० अर्जाचा कोटा तसेच पक्का अनुज्ञप्ती करिता २० अनुज्ञप्तींचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ज्या शिकाऊ अनुज्ञप्ती पक्की अनुज्ञप्ती अर्जदारांच्या अपॉईन्टमेंट घेण्यात आल्या होत्या अशा अर्जदारांचे अपॉईन्टमेंट रि-शेड्यूल करण्यात आलेले आहेत. त्यासंबंधी त्यांनी अर्ज करतांना नोंद केलेला भ्रमणध्वनी क्रमांकावर त्यांना संदेश देण्यात आले आहेत. शिकाऊ अनुज्ञप्तीची संगणकीय चाचणी घेण्यासंदर्भात अर्जदारांनी खालील प्रमाणे दक्षता घ्यावी.

  – २ अर्जदारामध्ये किमान ६ फुटाचे अंतर असावे.

  – अर्जदारास मास्क व हँडग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात येईल.

  -पक्की अनुज्ञप्ती चाचणी घेण्याआधी वाहन सॅनिटाईज करण्यात येइल.

  – त्याचप्रमाणे पक्की अनुज्ञप्तीची चाचणी ड्रायव्हींग स्कुलच्या वाहनावर घेतल्यास एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनेटाईज करुन घेतल्यानंतरच दुस-या उमेदवाराची चाचणी घेण्यात येणार.

  – योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण
  करण्यासाठी आलेल्या वाहनाचे सॅनिटायझेशन पूर्णतः वाहन मालकाच्या/धारकाच्या खर्चाने करावयाचा आहे.

  वाहनांचे सॅनिटायझेशन केल्यानंतर अशा वाहनांची चाचणी घेण्यात येईल.

  कोरोना महामारीचा प्रादुर्भाव विचारात घेऊन कार्यालयातील तसेच कार्यालयात येणा-या इतर व्यक्तीस संसर्गजन्य प्रादुर्भाव होणार नाही याकरिता सर्व वाहन धारकांना, जनतेला आवाहन करण्यात येते की, वरील दिलल्या सूचनांचे पालन करण्यात यावे तसेच या कार्यालयाकडे सादर करावयाचे अर्ज ऑनलाइन
  पध्दतीने करण्यात येऊन आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली (अपॉटमेंट) घेण्यात येऊन संगणकाव्दारे देण्यात
  आलेल्या दिनांक व वेळेतच आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात कामकाजासाठी हजर राहावे.