भवरखेडे येथे महामातांचा प्रबोधनाच्या जागराचा समारोप…

29

🔸९ गावांमध्ये वैचारीक प्रबोधनाचा नवरात्रोत्सव साजरा !..- पी.डी.पाटील सर.

🔹 “महामातांचा जागर ” ही ऐतिहासिक कामगिरी – लक्ष्मणराव पाटील.

✒️धरणगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

धरणगांव(दि.13जानेवारी):- तालुक्यातील भवरखेडे गावात ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान संपन्न झालेल्या प्रबोधन जागराचा समारोप काल भवरखेडे येथे संपन्न झाला.राजमाता जिजाऊ ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन, जिजाऊ जयंती, युवा दिनाचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला. या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक हेमंत माळी सर यांनी केले. लहान माळी वाडा धरणगाव, विवरे, पष्टाने, बांभोरी, गंगापुरी, गारखेडे, धानोरा, सोनवद आणि आज भवरखेडे येथे शेवटचे पुष्प आम्ही गुंफत आहोत, अशी माहिती हेमंत माळी यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच रुपाली किरण पाटील होत्या. प्रमुख वक्ते महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सर, हेमंत माळी सर, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अजय ब्राह्मणे, सीआरपी उज्वला पाटील, जयश्री पाटील, पशुसखी रंजना पाटील, ग्रा.पं सदस्य विजय सूर्यवंशी, उगलाल पाटील, प्रशांत पाटील, धनराज पाटील, दिलीप पाटील, खंडू भिल यांच्यासह गिरीष पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शामकांत पाटील, मुन्ना महाजन, समाधान पाटील, मनोहर महाजन, निलेश पाटील, देवराम पाटील, संजय भामरे, आबासाहेब राजेंद्र वाघ, गोरख देशमुख, आकाश बिवाल, दिनेश भदाणे, प्रफुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व सर्व विचार मंचावरील उपस्थित प्रमुख अतिथींचे शाल- श्रीफळ – पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्रमुख वक्ते पी.डी.पाटील यांनी महामातांचे जीवन चरित्र सांगितले. आम्ही गावांमध्ये महामातांचा नवरात्रोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण क्रांतीच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकुन, या सोबतच राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्याराणी होळकर, फातिमाबी शेख, त्यागमूर्ती रमाई, विरागंणा झलकारी देवी या सर्व महामातांचे चरित्र उलगडले. महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या असे प्रतिपादन केले.

शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम फुले दांपत्यांनी केलेले आहे. शिक्षणाने मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही. शिवरायांच्या खऱ्या गुरु राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व राष्ट्रसंत तुकोबाराय होय. छत्रपती शिवरायांना अवघ्या ५० वर्षाचे आयुष्य लाभलं यामध्ये त्यांनी हजारो वर्षांची गुलामगिरीचा नायनाट केला, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

तत्पूर्वी जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींनी प्रणाली, संस्कृती, रक्षा तसेच सीआरपी जयश्री पाटील यांनी आपल्या मनोगतातून महामातांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सर्व उपस्थित माता, भगिनी व बांधवांना विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले, महापुरुषांचे व महामातांचे ग्रंथ भेट देण्यात आले. या वैचारिक प्रबोधनाचे सूत्रसंचालन ह.भ.प. शशी महाराज यांनी तर आभार संजय भामरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भवरखेडे गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, युवक मित्र व सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.