सोहळा लोकशाहीचा , जागर मताधिकाराचा

1010

जग बदल घालुनी घाव , सांगून गेले मज भीमराव’ . बदल घडविण्यासाठी मोठा पहाड फोडावा लागणार नाही , एका मताचा स्वाभिमान जागवावा लागेल . लोकशाहीतील मताचा अधिकार प्रत्येक नागरिकांच्या मनगटातील सामर्थ्य आहे . मताच्या पेटीतून शासनाचा जन्म होतो , कोण्या संपत्तीच्या भांडारातून नाही . ही अलौकिक देणं अन्य शस्त्रात सापडणार नाही . मतदानाचे शस्त्र मुजोरांना त्यांची जागा दाखवून देते . मुजोरांना वठणीवर आणणे नागरिकांच्या हाती असल्याने , हुकूमशाहीची नांगी ठेचल्या जाते . सार्वभौम गणराज्याची मुहूर्तमेढ मजबूत बनते . गणराज्याला बळकटी देणे मतदानाचा गाभा आहे . मतदान लोकशाहीचा डोलारा उभा करते . त्यामुळे स्वैराचारी राज्यसत्ता थरथर कापत असते . मतदानाचा पहारा अंदाधुंद अनैतिक मानसिकतेचे खच्चीकरण करून , सर्वलौकीक कल्याणाला खतपाणी घालते . त्यामुळे लोकशाहीचा कणा अधिक ताठ होऊन , देशाची एकात्मता सौख्यशिखर गाठते . मतदानाने सत्तेवर बसवून लोकहितासाठी झटण्याची संधी उपलब्ध करून देता येते . त्याप्रमाणेच अहितकारक सत्तेला पायउतार करण्याचा उत्तम उतारा म्हणजे मतदान . अशाने लोकशाहीचे आरोग्य धोक्यात येत नाही . सुदृढ लोकशाहीचे सोहळे साजरे करता येतात .

मताधिकाराचा जागर होणे गरजेचे आहे . मताची शक्ती कळणार नाही , तोपर्यंत जुलमी मनोवृत्ती डोके वर काढत राहील . भारतासारख्या विशाल देशात , अनेक बाबतीत विविधता आढळते . प्रांत , भाषा , जात , धर्म यापलीकडे एकोपा साधत भारतीय म्हणून एका धाग्यात बांधण्याचे काम लोकशाही करीत असते . पण लोकशाहीच्या अथांग सागरात अज्ञानाची वादळे उलथापालथ घडवून आणतात . अज्ञानापोटी विविधतेतील भेदाचा वापर करून , लोकशाहीवर हल्ला करणारे सत्ता हस्तगत करू पाहतात . अशांच्या हातात सत्ता आली की , गणराज्याची गळचेपी करण्याचे तंत्र त्यांना चांगले अवगत असते . अशावेळी आक्रंदणाऱ्या लोकशाहीचे सांत्वन करण्याखेरीज मतदाराच्या हाती काहीच नसते . मताचे मूल्य न कळल्याने भेदाच्या वादात अडकून , मतदार लोकशाहीच्या हत्येत सहभागी होत असतो .
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात बुद्धिभेदाची जळमटे पसरताना दिसतात . यात मतदार फसत जातो . नीती , अनितीच्या तार्किकतेला फाटा देत , भेदाच्या प्रेमात पडून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो . पर्यायाने लोकशाहीला खिंडार पाडण्याचे पातक आपल्या माथी पाडतो . विकल्या गेलेली प्रसारमाध्यमे मतदारांच्या बुद्धीत खोट्या थापांचे बीज पेरून , द्वेषाला खतपाणी घालतात . मताचे अवमूल्यन केल्या जाते .

लोकशाहीचे मूल्य रुजविणाऱ्या शक्ती सत्तास्थानी गेल्या तरच , मताची किंमत वाढते . त्यासाठी मतदार जागरूक होऊन मतदानाची उपयोगिता जाणला पाहिजे . मतदारांपुढे रेटून खोट्याला सत्यात मांडणारी वृत्ती , चकवा देत असते . खोट्याची जित झाली की , निराश मतदार हतबल होऊन मतदानापासून फारकत घ्यायला लागतो . स्वतःला मिळालेला वरदान विसरून , बांडगुळांना आयते आशिष मिळते . लोकशाही प्रवर्धित होण्याऐवजी घसरणीला लागते .
मतदानासारखे दुधारी शस्त्र म्यान करण्यात शहाणपण नाही . संविधानाने प्रत्येक नागरिकांच्या मनगटात भरलेले बळ आहे . मतदार गर्भगळीत झाला तर , सत्तापिपासू गैरमार्गाने व्यभिचार करायला मोकळे । नव्या युगात स्वतःला जागरूक समजणारा मतदार , मतदानापासून गाफील राहतो . यापेक्षा लोकशाहीचे मोठे हत्यारे कोण ? मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून मजा मारणारे कपाळकरंटे वेळ निघून गेल्यावर देशाच्या चिंतेने , परिस्थितीवर ताशेरे ओढण्याची चढाओढ लावतात . प्रत्यक्ष मतदानातून पर्याय शोधण्याचा शहाणपण कधी येणार ? लोकशाहीचा खरा सोहळा साजरा करायचा असेल , तर आधी हक्क नव्हे कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे .

आर्थिकतेची दरी मतदाराला मजबूर बनवते , ही बतावणी लोकशाहीला घातक आहे . पैशासाठी मत विकण्याची दरिद्री परंपरा त्यागली पाहिजे . पैशाने लाचार बनून , लोकशाही खिळखिळी करण्याचे भिकारधंदे सोडायची गरज आहे . आपल्या कष्टाने पाच वर्षे सुखाने उदरनिर्वाह करणारा मतदार , एक दिवसासाठी भिकारी कसा होतो ? याचा फायदा उचलत प्रस्थापित श्रीमंत गरिबीची दरी खोल करीत जातात . याला कारणीभूत मतदार आहे . जिथे लोकांनी लोटांगण घालावे ; अशी मताची श्रीमंती गहाण ठेवून दबेल बनलेला मतदार , लोकशाहीला झुकायला भाग पाडतो . म्हणून मताचे मूल्य पैशात न मोजता , स्वाभिमान जागा केला पाहिजे . स्वाभिमानाचे मोल जिवाहून लाखमोलाचे . तेव्हा साधा चिवडा आणि दारुची बोळवण पाहून , मताची माती करण्यात कसला पुरुषार्थ ? मतदानाच्या जोरावर लोकशाहीला पोषक सत्ता उभी करण्यात पुरुषार्थ आहे ; मत विकण्यात नाही .मताच्या अधिकाराने सर्वांना समान दर्जा दिला आहे . महालातील श्रीमंत असो की झोपडीतील रंक , पुरुष असो की स्त्री , जात ,धर्म , वर्ण कोणताच भेद ठेवला नाही . प्रत्येकाच्या मताचे मूल्य समान . त्यामुळे प्रत्येक नागरिक समान दर्जाचा आहे . दर्जा खालावण्याची नामुष्की मतदार स्वतः ओढवून घेतो .

विकल्या गेलेला गुलाम असतो . गुलाम सदोदित वंचित असतो . वंचिताची परंपरा खंडित करायची असेल तर , समान दर्जाच्या मताधिकाराचा मार्ग सोडता कामा नये . लोकशाहीच्या उदात्त ध्येयाकडे नेणारा मतदानाचा मार्ग आपला तारणहार आहे . संविधानाच्या गर्भातून भेटलेला अनमोल ठेवा जोपासत , स्वतः देशाचे मालक बनण्याचा राजमार्ग म्हणजे मताधिकार . या अधिकाराचा योग्य वापर झाला तर , लोकशाहीत समानता आणि समता बहरण्यास वेळ लागणार नाही . मताधिकार विकून लाचारी पत्करली जाते , तेव्हा विषमतेची दरी वाढायला सुरुवात होते . आपले हक्क ,अधिकार मिळवायचे असतील तर , बाणेदारपणे कर्तव्य बजावता आले पाहिजे .
एका बोटावरच्या शाईची किंमत ज्याला कळली , तो लोकशाहीचा शिलेदार झाला आहे . त्याच्या बोटावरच्या शाईने भल्याभल्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याची धमक ठेवली . अभिमानाने बोटावर लागलेली शाई , लोकशाहीचे सोहळे सजवत असते . याच प्रतापाने कित्येक स्थित्यंतरे घडवून आणली . जागरूक मतदाराचे महान कार्य लोकशाहीची धुरा सांभाळत आहे . म्हणून मताधिकाराचा जागर घालण्याची गरज असून त्याचे सामर्थ्य वाढवले पाहिजे . बोटावरची शाई मिरवण्याची नसून सत्तापिपासू वृत्तीला ठेचून काढण्यासाठी आहे .
शपथ घेण्यापेक्षा बाणा बनला पाहिजे . मत विकण्याची लाचारी खूप झाली . लोकशाहीचे मारेकरी पिटाळून लावण्यासाठी धमक भरली पाहिजे . लोकशाही कोणत्याही व्यभिचाऱ्याच्या अत्याचाराने हंबरडा फोडणार नाही , यासाठी दक्ष बनून मताधिकार बजावला पाहिजे . मताची शक्ती लोकशाहीचा पाया बळकट करेल , तेव्हाच स्वातंत्र्यपताका फडकत राहील . गैराला वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होणार नाही . हाच लोकशाहीचा खरा सोहळा . सुरक्षित नागरिकत्वाची हमी देत , भेदाची विषमता नष्ट करून एकसंघ राष्ट्राची महत्ती वाढेल . मताच्या मुल्यातून राष्ट्राचे मूल्य वाढत जाते . याची जाणीव प्रत्येकाच्या हृदयात साठून राहावी .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता. मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१