आर्वीतील अर्भक हत्या प्रकरण- कदम रुग्णालयासह डॉ.रेखा कदम व संबंधीत गुन्हेगारांवर कठोर कार्यवाहीची गरज

26

अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

विदर्भातील वर्धा व अमरावती जिल्ह्याला संतांची भूमी म्हटल्या जाते. कारण या भूमीत अनेक संत महात्मा व समाजसेवक होऊन गेलेत. त्यांचीच तत्त्वे जपत व जवळपास त्यांनी दाखविलेल्या मार्गावर विदर्भातील जनता मार्गक्रमण करीत आहेत. परंतु या मार्गालाच नव्हे तर संपूर्ण स्त्री जातीलाच काळीमा फासल्याच घृणास्पद व निंदणीय कृत्य आर्वीतील कदम रुग्णालयाच्या डॉ. रेखा कदम यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर एक स्त्रिच कित्येक स्त्रियांची हत्या केलेली आहे. यावरून डॉ. रेखा कदम या कसाई असल्याचं सिध्द होत आहे. आर्वीतील या रुग्णालयाची अत्यंत गंभीर व भयावह घटना बघता सरकारने ताबडतोब प्रतिबंध लावायला हवे. अशा रुग्णालयावर व संबंधीत आरोपींवर जलद मार्गीय न्यायालयाच्या (फास्ट ट्रॅक कोर्टच्या) माध्यमातून वेळीच व शिघ्रगतीने कार्यवाही करायला पाहिजे. जेणेकरून इतर ठिकाणी कदम रुग्णालयाची पूनरावृत्ती होणार नाही.

आर्वीतील एका अल्पवयीन मुलीसोबत शेजारी राहणा-या अल्पवयीन मुलाने बळजबरी शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. यातून सदर मुलगी गरोदर राहिली होती. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मुलीला स्थानिक डॉक्टरकडे नेले असता मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर समाजात बदनाम होण्याच्या भीतीने आरोपी मुलाच्या आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार डॉ. रेखा कदम यांच्या कदम नर्सिंग होममध्ये 30 हजार रुपयात मुलीचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर पोलिसांना या अनधिकृत गर्भपाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपी, तिचे आई-वडिल आणि डॉ. रेखा कदम यांना ताब्यात घेतले. यानंतर नर्सिंग होममध्ये याआधी अशा प्रकारे किती गर्भपात झाले? याचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ज्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रुग्णालय परिसरात खोदकाम सुरु केले. रुग्णालय परिसरात असलेल्या विहिरीत सुमारे पाच तास खोदकाम सुरु होते. विहिरीत खोदकामात काय सापडले याबाबत अधिका-यांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र रक्त नमुनासह काही साहित्य नेल्याची माहिती मिळते. याबाबत वर्धा आणि नागपूर येथील न्यायवैद्यक चमुने रुग्णालयाची पूर्ण पाहणी सुद्धा केली आहे. याआधी रुग्णालय परिसरातील गॅस चेंबरमध्ये 12 कवट्या आणि 54 हाडे सापडली होती. घटनास्थळी पोलीस, आरोग्य प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. विहिरीत खोदकामाला सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली होती. अधिका-यांच्या समक्ष मलबा बाहेर काढला जात होता आणि रुग्णालयात कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही.

आर्वी शहरात समोर आलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात पीसीपीएनडीटी समितीच्या राज्य सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी आर्वी येथे भेट दिली. पीसीपीएनडीटी समितीच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी रुग्णालयात पाहणी केली. दरम्यान या प्रकरणातील तथ्य पडताळून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिळालेल्या कवट्या आणि हाडे एकूणच रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारे असल्याचे मत आशा मिरगे यांनी मांडले आहे.
अधिकृत गर्भपात केंद्राची परवानगी 12 आठवड्याची आहे. ज्या कवठ्या मिळाल्या त्या 14 आठवड्याच्या आहेत, त्यामुळे कायद्यानुसार डॉक्टर गुन्हेगार ठरत आहे. अल्पवयीन मुलगी 22 ते 23 आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर येत आहे. याशिवाय अल्ट्रासाऊडची जी परवानगी आहे, ती जानेवारी 2021 मध्ये रद्द झाली आहे. मुदत संपली असताना देखील अजूनही नियमानुसार दुसरे कोणतेही प्रमाणपत्र रुग्णालयात लावलेले त्यांना दिसून आले नाही. तेथील नर्सेसला विचारले असता त्यांनी देखील दाखविलेले नाही, असे पीसीपीएनडीटी समितीच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी म्हटले आहे. शैक्षणिक धोरणासह लैंगिक शिक्षणाची अत्यावश्क गरज आहे. समाजात लैंगिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यासाठी पालकांची आणि शासन अर्थात केंद्र शासनाची देखील जबाबदारी आहे. शैक्षणिक धोरणासह प्रत्यक्ष पाठ्य पुस्तकात लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचेही आशा मिरगे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात आता आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वर्ध्यातील आर्वी येथे अवैध गर्भपात प्रकरणात दररोज नवनवीन माहिती उघड होत आहे. आर्वीतील घटनेने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात एकच खळबळ उडाली. त्याच दरम्यान खळबळजनक माहिती उघड झाली आहे की, आर्वी येथील कदम रुग्णालयात रेखा कदम या गर्भपात करत होत्या. मात्र, गर्भपात केंद्राची परवनगी ही डॉ. रेखा कदम यांच्या नावावरच नसल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या केंद्राची परवानगी रेखा कदम यांच्या सासू डॉ. शैलजा कदम यांच्या नावावर आहे. नियमानुसार, जिल्हा आरोग्य समिती आणि केंद्राकडून ज्यांना परवानगी दिली असते त्यांनाच गर्भपात करण्याची परवानगी असते. पण सासूच्या नावावर असलेल्या परवान्याचा वापर करुन डॉ. रेखा कदम करत असल्याचं उघड झालं आहे. आर्वीतील त्या रुग्णालयाच्या परिसरात खोदकाम सुरूच असल्याने आणखी एक कवटी आढळल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

हा प्रकार उघडीस आल्यानंतर मुलीच्या आई व वडिलांसह गर्भपात करणाऱ्या डॉ. रेखा कदम आणि 2 परिचारिका अशा एकूण 5 जणांना पोलिसांनी अटक केलं होतं. मात्र नंतर याच प्रकरणात डॉ. नीरज कदम यांना देखिल पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर नीरज कदम याला अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणात अटक झालेल्या एकूण आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे. डॉ. कदम यांच्या घराची आणि हॉस्पिटलची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. तपासणी दरम्यान काळविटाची कातडी जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी कातडी जप्त केली आहे. काळविटाची कातडी आढळल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. वनविभागाच्या चमुने पंचनामा करत कातडी जप्त केली आहे. प्रथमदर्शनी ही कातडी मादी काळविटाची असल्याचं वनविभागाच्या अधिका-यांनी सांगितलं. जप्त केलेली कातडी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर ही कातडी कशाची आणि किती जुनी आहे, ही बाब स्पष्ट होईल, असं वनविभागाच्या अधिका-यांनी स्पष्ट केलं.

गर्भपात प्रकरणात नवे-नवे खुलासे सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. डॉक्टर कदम याच्या घरी पोलिसांनी झडती घेतली आणि यावेळी तेथून शासकीय गर्भपात करण्याच्या कामात येणारे इंजेक्शन घरी आढळल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर तपासात 25 ते 30 रजिस्टर जप्त केल्याची माहितीही उघड झाली आहे. आर्वी येथील गर्भपात प्रकरणात तपासादरम्यान अनेक बाबी समोर येत आहे. कदम यांच्या रुग्णालयासह घरात जिल्हा आरोग्य विभागाच्या टास्क फोर्ससह पोलिसांनी झडती घेतली. यात पथकाला मोठ्या प्रमाणात शासकीय औषधांचा साठा सापडला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पथकाला रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान मालाईन ड्रग्जचे 23 खोके, त्यात औषधीचे एकूण 2563 पॅकेट असून एकूण 71 हजार 764 गोळ्या आढळल्या आहे तर ऑक्सिटिन नामक 90 इंजेक्शन सुद्धा जप्त करण्यात आले आहे. ही सर्व औषधं शासकीय रुग्णालयाची असल्याची माहिती असून सर्व औषधं मुदतबाह्य आहेत. शुक्रवारी सकाळपासून सुरु असलेली तपासणी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. याच दरम्यान, रुग्णालयातील ऑपरेशन रजिस्टर, एमटीपी रजिस्टरसह काही फाईल जप्त केल्या गेले आहेत.

डॉ. कदम यांच्या आई नागपूर येथे रुग्णालयात दाखल असून तेथे त्यांचे वडील असल्याने घराच्या एका खोलीला टाळे होते. त्या खोलीत काय दडलं आहे हे अद्याप बाहेर आलेलं नाहीय. त्यामुळे या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. अटक केलेले डॉक्टर नीरज कदम हे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. कदम रुग्णालयच्या तपासणीदरम्यान सरकारी रुग्णालयात वापरण्यात येणारे औषधी आढळल्याने आता या आर्वी येथील आरोग्य विभागसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.खळबळजनक कदम रुग्णालयाच्या परिसरात अर्भकांच्या 12 कवट्या आणि 54 हाडं आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी एका खड्डयात सापडलेली ही अर्भकांची हाडं आणि कवट्या पुढील तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवली आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर सखोल चौकशी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.कवटया आणि हाडे नेमके कुणाचे आहेत? याबद्दल पोलीस तपास करत आहेत. अटकेत असलेल्या डॉ. रेखा कदम यांचीही कसून चौकशी सुरू आहे. या हॉस्पिटलला अधिकृत गर्भपात व गर्भनिदान केंद्राचा दर्जा आहे. मात्र, मृत अर्भकाची विल्हेवाट लावण्याची वैद्यकीय पध्दत असते. ती या दवाखान्यात पाळली की नाही याबाबत पोलीस साशंक आहेत. आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साळूंके म्हणाले की सापडलेल्या अवशेषाबाबत आताच निश्चित काही सांगता येणार नाही. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच ठोस निष्कर्ष काढता येईल. अशाप्रकारे जवळपास आठवड्यापासून कदम रुग्णालयाची व संबंधित गुन्हेगा-यांचे तपास सत्र सुरू आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर या तपासाचे सत्र अंतिम स्थितीला पोहोचेल. रेखा कदम व इतर दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी हिच आशा..!

✒️शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-7057185479