गांधीहत्येचे झालेले प्रयत्न आणि गांधीहत्या

29

महात्मा गांधींवर अनेकदा जीवघेणे हल्ले करण्यात आले. याची माहिती खूपच थोड्या लोकांना आहे. विशेष म्हणजे 5 वेळ हल्ले झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कधीच सुरक्षा घेतली नाही. गांधींच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर एकूण 7 वेळा हल्ले झाले त्यापैकी 5 हल्ल्यांचे कागदोपत्री पुरावे अस्तित्वात आहेत. या पाचही हल्ल्यात पुण्यातील कट्टरवादी संघटनेचा संबंध होता. या फसलेल्या पाच हल्ल्यानंतर शेवटच्या प्रयत्नात गांधींची हत्या झाली. आपण थोडक्यात ह्या हल्ल्यांबद्दल जाणून घेऊ.

गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न हा 25 जून 1934 रोजी करण्यात आला. गांधी हरिजन यात्रेच्या निमित्ताने पुण्यात आले होते. नगरपालिका भवनात ते भाषण करणार होते. आणि नगरपरिषदेकडून त्यांचा सत्कार होणार होता. गांधींना बघायला प्रचंड गर्दी झालेली होती. महात्माजी आले ती बघा त्यांची गाडी असा आवाज सुरु होताच तिथे गांधींच्या स्वागतासाठी सज्ज असणार्‍या स्काऊट बँड पथकाने गाणे वाजवणे सुरु केले. अचानक बँड चा आवाज दबून मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. जिथून आवाज झाला त्या दिशेने गांधी नाही तर अण्णासाहेब भोपटकर आले होते. त्या मागोमाग गांधी कार्यक्रम स्थळी आले. गांधींची गाडी समजून दुसरीकडेच बॉम्ब फेकण्यात आला होता. गांधींनाही कार्यक्रम संपल्यानंतर ही गोष्ट सांगण्यात आली. त्यांना दुःख झालं परंतु आपल्या भाषणातून त्यांनी त्या बॉम्ब फेकणार्‍याप्रती गाढ सहानुभूतीच व्यक्त केली. बॉम्ब फेकून आरोपी पळून गेला होता. सरकारने त्यावर बक्षीस लावलं होत पण तो कधीच सापडला नाही.

दुसरा हल्ला गांधींवर जुलै 1944 साली पाचगणी येथे झाला. हा हल्ला नथूराम गोडसे याने केला होता. गांधीजी आगाखान पॅलेस तुरुंगात होते. तिथून मे 1944 मध्ये सुटका झाल्यानंतर गांधींना मलेरिया झाल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. विश्रांतीसाठी गांधी पुण्याजवळच्या पाचगणी येथील ’दिलखुष’ बंगल्यात थांबले. त्यावेळी पुण्यातून खास बस करून अठरा-वीस लोक पाचगणी ला आले आणि त्यांनी दिवसभर गांधींविरोधात निदर्शने केली. गांधींना हे जेव्हा कळले तेव्हा या गटाचा नेता असलेल्या नथूराम गोडसेला त्यांनी चर्चेसाठी बोलावलं पण तो चर्चेचं निमंत्रण नाकारून निदर्शने करीत राहिला. त्याच दिवशी संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी नथूराम गोडसे हातात कट्यार घेऊन गांधीविरोधी घोषणा करत गांधींकडे धावला. त्याचवेळी पुण्यातील सुरती लॉजचे मणिशंकर पुरोहित आणि सातार्‍याचे डी.भिलारे गुरुजी यांनी नथुरामला मध्येच अडवलं. त्याच्याजवळचं शस्त्र काढून घेतलं. भिलारे गुरुजींनी त्याला झटापट करत खाली पाडलं. पण गांधींनी त्यांना बोलावून हल्लेखोराला मारहाण करू नका त्याला माझ्याजवळ घेऊन या म्हणजे मला त्याच्याशी बोलता येईल असं सांगितलं. या घटनेवेळी त्याच्यासोबतची सर्व मंडळी पळून गेली होती. पुण्याहून गांधीविरोधी निदर्शने करणार्‍यांमध्ये विष्णू करकरे, थत्ते, बडगे आणि गोपाळ गोडसे सुद्धा होते. पुढे झालेल्या गांधींच्या हत्येत हे सर्व लोक आरोपी होते.

तिसरा हल्ला गांधींवर सप्टेंबर 1944, मध्ये झाला. गांधी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून मुंबईला जाणार होते. ते मुंबईला जाऊ नये म्हणून नथुराम गोडसे व एल. जी. थत्ते यांनी एक गट तयार करून सेवाग्राम आश्रमाच्या दारासमोरच धरणे दिले होते. यावेळी नत्थुराम गोडसेला आश्रमवासियांनी गांधींकडे जातांना थांबवलं होतं. त्याच्याकडे एक जंबिया सापडला. तेथे उपस्थित अधिकार्‍याने त्याला अटक केली. प्यारेलाल या घटनेविषयी पत्रातून सांगतात की अटक करणार्‍या अधिकार्‍याने तुला हुतात्मा व्हायचं आहे का? असं विचारलं असता त्याने उत्तर दिले की, ’गांधींना संपवलं की आमच्यातला एक जण हुतात्मा होणारच.’ ती व्यक्ती नथूराम गोडसे होती. पोलिसांच्या अहवालातही या गोष्टींना दुजोरा मिळतो. विशेष म्हणजे ह्यावेळी फाळणी झालेली नव्हती, 55 कोटी पाकिस्तानला द्यायची गोष्ट सुद्धा नव्हती. मग का गांधींवर हे हल्ले करत होते?

गांधींवर हल्ल्याचा चौथा प्रयत्न 29 जून, 1946 रोजी झाला. 29 जून च्या रात्री गांधींना घेऊन पुण्याला जाणार्‍या गाडीला नेरुळ आणि कर्जत स्थानकांच्या मध्ये अपघात झाला. इंजिन ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे गाडी रुळावरून घसरून खाली यावी या हेतूने गाडीसमोर रुळावर मोठे दगड रचून ठेवण्यात आले होते. गाडी दगडांवर धडकली परंतु ड्रायव्हर सावध असल्याने त्याने ब्रेक दाबले. त्यामुळे धक्का बसण्याआधीच गाडीचा वेग कमी झाला. इंजिनाची चाके व एक्सेल यांचं बरंच नुकसान झालं तरी मोठी दुर्घटना टळली. दुसरं इंजिन पाठवून ती गाडी पुण्याला नेण्यात आली. रेल्वेच्या नोंदीनुसार गांधींना घेऊन जाणार्‍या स्पेशल रेल्वे शिवाय नेहमीची दुसरी कुठलीच गाडी त्यादिवशी त्या मार्गावर नव्हती. म्हणजेच ते दगड फक्त गांधी ज्या गाडीने येणार होते त्याच गाडीसाठी ठेवण्यात आले होते. पाचव्यांदा गांधींवर मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. 20 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस मध्ये गांधी होते. सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी मदनलाल पहावा आणि विष्णू करकरे प्रार्थना मंचाच्या दोन्ही बाजूला गन कॉटन पेटविणार आणि दिगंबर बडगे गांधींवर गोळी झाडेल व त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकेल.

शंकर किस्तैय्या मंचाच्या समोर येऊन गांधींवर समोरून गोळी झाडेल व मंचाकडे हातबॉम्ब फेकेल अशी गांधींना मारण्याची त्यांची योजना होती. प्रार्थना सुरु झाल्यावर नारायण आपटे, गोडसे, करकरे टोळीतील सर्व सदस्य आपल्या जागेवर मैदानात आले. पाहवाने गन कॉटन ची लादी खिडकीच्या भिंतीवर ठेवून तयार ठेवली होती. परंतु आपण पकडले जाऊ या भीतीने बडगेने सोबत आणलेले दोन्ही पिस्तूल आणि बॉम्ब ज्या टॅक्सितून ते लोक आले होते त्या टॅक्सित लपवून ठेवले. सर्व तयारीची खूण मिळताच पाहवाने गण कॉटनचा फ्युज पेटवला. गांधी सभेला उद्देशून भाषण करत होते तितक्यात अचानक मोठा स्फोट होऊन खूप धूर आणि धूळ उडाली. भिंतीचा मोठा भाग खाली कोसळला. बाकी सदस्य पुढची कृती होण्याची वाट बघत होते. पण कुणी गोळ्या झाडल्या नाहीत की करकरे व गोपाळ गोडसेने जवळचे बॉम्ब फेकले नाहीत. गांधींनी लोकांना शांत केलं. त्यावेळी पहावा एकटा धरला गेला बाकी सदस्य पळून जाण्यात यशस्वी झाले. या पाहवाच्या जबानी प्रमाणे बॉम्बस्फोटामागे गांधीहत्या करण्याचा हेतू होता. मदनलाल पहावाने आपल्या सर्व साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली पण पोलीस त्यांना पकडू शकले नाही.

पोलिसांनी मदनलाल पहावाला पकडले. या बाँबस्फोटाची बातमी 21 जानेवारीस वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली. ती वाचून प्रो. जे. सी. जैन मुंबई प्रांताचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांना भेटण्यास गेले. जैन यांना पहावाची माहिती होती. स्वतः पहावा जैन यांना गांधीचा खून करणार असल्याबद्दल बोलला होता. जैन यांनी त्याला असे न करण्याबाबत समज दिली आणि पहावा होकार देऊन निघून गेला. पण 20 जानेवारीच्या बाँबस्फोटात मदनलाल पाहवाला पकडले आहे ही बातमी वाचल्यावर जैन यांची गांधींच्या खुनाबाबत खात्री झाली. म्हणून ही माहिती सांगण्याकरिता जैन हे मोरारजी देसाई यांना भेटले आणि त्यांनी मोरारजी देसाईंना त्यांच्याजवळील माहिती सांगितली. मोरारजींनी स्वतः अमदाबादला जाऊन सरदार पटेलांना ही माहिती दिली. मोरारजी देसाई यांनी सांगितले की, जेव्हा जैन यांनी दिलेली माहिती मी पटेलांना सांगितली तेव्हा सरदार पटेल मला म्हणाले, माझ्याही सूत्रांकडून मला ही माहिती समजलेली आहे. मोरारजी देसाई यांनी ही माहिती पटेल यांना 22 जानेवारीला दिली. मदनलाल पाहवाला 20 जानेवारीस अटक झालेली होती आणि त्याने पोलिसांना आपल्या कटातील इतर काही साथीदारांची नावे सांगितली होती. मदनलालने बाँबस्फोट केला त्यानंतर बरोबर आठ दिवसांनी महात्मा गांधींचा खून करण्यात आला. 20 जानेवारीला गांधींच्या प्रार्थना सभेत बाँबस्फोट झाला, गांधींना मारण्याचा प्रयत्न झाल्यावर तरी गृहखात्याला पर्यायाने सरकारला ह्या चर्चेतील गांभीर्य लक्षात यायला पाहिजे होते. मदनलाल पहावाने नावे सांगितलेल्या त्याच्या साथीदारांना त्वरित अटक होणे जरुरी होते. गांधींच्या नकळत सुद्धा त्यांना सुरक्षा पुरविणे आवश्यक होते. सर्व माहिती आणि पुरावे असतांना आधी अनेकदा गांधींवर हल्ला केलेल्यांना त्वरित अटक का करण्यात आली नाही? का मारेकर्‍यांना अनेक प्रयत्न करू देण्यात आले? हे प्रश्न अनुत्तरीतच राहीलेत.

या बॉम्ब हल्ल्याच्या फक्त 10 दिवस नंतर म्हणजे शुक्रवार 30 जानेवारी 1948 ला सायंकाळचे 5 वाजून 17 मिनिटं झालेली असतांना गांधीजीं प्रार्थनास्थळी आलेले होते. मंचाकडे जात असतांना एक करड्या निळ्या रंगाचं शर्ट घातलेला तरुण गर्दीतून वाट काढत त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. त्या तरुणाने हात जोडून म्हंटले, नमस्ते बापू. त्या गर्दीतील लोकांना काही कळायच्या आत नथूराम गोडसेने बारीक टोकदार नळीचे स्वयंचलित पिस्तूल काढून तीन फुटांवरून गांधींच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या आणि शेवटी गोडसे महात्मा गांधींची हत्या करण्यात यशस्वी झाला. फाळणी, 55 कोटी असं काहीही कारण नसतानासुद्धा त्यावेळी गांधींवर का हल्ले करण्यात आले याच खरं कारण मात्र मारेकरी सांगत नाहीत.1934 सालापासून गांधींवर होणार्‍या हल्ल्यांची शृंखला शेवटी त्यांच्या हत्येवर थांबली. ज्यासाठी गांधींनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले ते स्वातंत्र्य गांधी फक्त 6 महिने अनुभवू शकले हे किती क्लेशदायक आहे.

(‘मजबुती का नाम म.गांधी’ या आगामी पुस्तकातुन)

✒️लेखक:-चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६