जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे क्रांती आंदोलन अनुयायी बनून पुढे मार्गस्थ करणे आवश्यक!

101

वारकरी विचारधारेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार आणि प्रसार करण्याचे काम संत नामदेव यांच्या नंतर संत तुकाराम महाराजांनी केलेले दिसून येते.संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा प्रभाव हा इतर धर्मीय मंडळी यांच्यावर सुद्धा झालेला दिसून येतो.कारण इंग्रज गव्हर्नर याने स्वतः 24000रु तरतूद करून गाथेच्या प्रती छापून घेतल्या.इंग्रजीत भाषांतर करून गाथा समजून घेतला.अनेक इतरधर्मीय सुध्दा आज हभप असून कीर्तन प्रवचन करतात. डॉ यु पठाण,फादर फ्रान्सिस दिब्रिटो,सारखे इतर धर्मीय विचारवंत वारकरी विचारधारेला अंगीकृत करून प्रचार प्रसार करत असत.आपल्या प्रत्येकांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग यांचे नियमितपणे अर्थ समजून वाचन करुया. त्याविचारधारेवर चालण्याचा प्रयत्न करुया.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1608 देहू जिल्हा पुणे येथे झाला आहे.त्यांच्या आईचे नाव कनकाआई तर वडिलांचे नाव बोल्होबा अंबिले होय.त्यांचे मुळ घराणे हे मोरे होते,जे मौर्य वंशाच्या संबंधित असावे,असे अभ्यासक मानतात.त्यांचा मोठाभाऊ सावजी व धाकटा कान्होबा होता.संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीचे नाव जिजाबाई होते,तिला ते आवडी या नावाने बोलवित.ती आप्पाजी गुळवे,पुणे यांची कन्या होती.अप्पाजी हे पुणे येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. संत तुकाराम महाराज यांना महादेव,विठोबा,नारायण व भागूबाई ही चार अपत्ये होती. संत तुकाराम महाराज यांच्या घरात महाजनकी होती.महाजन म्हणजे सावकारांना कर्ज देणारे. म्हणजे त्यांच्या श्रीमंतीची कल्पना येते.ज्यावेळी दुष्काळ पडला,लोक हैराण होते.त्यावेळी त्यांनी लोकांच्या दुःखावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न आपल्यापरीने केला. स्वतः ते अभ्यास करत. भामचंद्र डोंगर देहू याठिकाणी सात दिवस चिंतन,सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण केल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला.आपल्या वाटणीतील सर्व शेतकरी यांचे कर्ज संपूर्णपणे माफ केले.यास अनेकजण साक्षात्कार झाला असेही म्हणतात.ही घटना जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या कर्तृत्व यास अधिक उजळ करणारी आहे.

संत तुकाराम यांनी संत नामदेव यांची प्रेरणा घेऊन हे कार्य करायला सुरुवात केली आहे,असे ते नोंदवतात. त्या संबंधित अभंग ..
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे।सवे पांडुरंगे येऊनिया।
सांगितले काम करावे कवित्व ।वावगे निमित्त बोलो नये।।

संत तुकाराम यांनी अनेक अभंग लिहून तसेच कीर्तन, प्रबोधन या माध्यमातून क्रांतिकारक विचाराची मांडणी केली.त्यांच्या कीर्तनात प्रमाण/दृष्टांतही सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील होती .तसेच कर्मकांड, वेद, पुराण, ब्रह्म,माया,भवसागर यावर त्यांनी कडाडून टीका केली.

वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।इतरांनी वाहवा भारमाथा।

तुका म्हणे कैचे ब्रह्म ।
अवघा भ्रम विषयाचा ।।
स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय या मूल्यावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.हे करत असताना मनुस्मृती/वर्णधर्मानुसार त्यांना त्यांच्या शूद्र जातीमुळे हे करता येत नाही, असे ब्राह्मण पंडितांनी सांगितले.पण त्यांनी त्यास न जुमानता आपले कार्य सुरूच ठेवले.

याबाबत संत तुकाराम म्हणतात,
‘घोकावया अक्षर।
मज नाही अधिकार।
सर्वभावे दीन।
तुका म्हणे याति हीन।।
किंवा
शुद्रवंशी जन्मलो ।
म्हणोनि दंभे मोकलीलो।
बरा देवा कुणबी केलो।
नाही तरी दंभेची असतो मेलो।।

हा भेदाभेद चुकीचा आहे याबाबत ते म्हणतात,
अवघी एकाचीच वीण।
तेथे कैचे भिना्भिन्न?।।
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।भेदाभेदभ्रम अमंगळ।
कोणतीही अंधश्रद्धा पाळू नये,पंचाग,राशी,दिशा,भविष्य,
पिंडदान ,तीर्थक्षेत्र ,भोंदूबाबा,
नवस हे सर्व थोतांड आहे.त्यावर त्यांनी अभंग याद्वारे वार केले.
पंचांग या संदर्भात,
तुका म्हणे हरीच्या दासा।
शुभ काळ अवघ्या दिशा।

तसेच पिंडदान बाबत
भुके नाही अन्न।
मेल्यावरी पिंडदान।
हे तो चाळवाचाळवी।
केले आपणची जेवी।।
तीर्थयात्रा बाबत
काय काशी करिती गंगा।
भीतरी चांगा नाही तो?
जाऊनिया तीर्था काय तुवा केले?
चर्म प्रक्षाळिले वरी वरी।।
मूर्तीपूजा बाबत
शेंदूर लावूनिया धोंडा ।
पाया पडती पोरे रांडा।
नवसे कन्यापुत्र होती ।
तरि का करणे लागे पती?
आजच्या बाबांचे आश्रम, डेरा,मठ,केंद्र याबाबत,
ऐसें कैसे झाले भोंदू।
कर्म करोनि म्हणती साधू।
अंगा लावूनिया राख ।
डोळे झाकुनी करिती पाप।
दाऊनी वैराग्याची कळा।
भोगी विषयाचा सोहळा।
तुका म्हणे सांगो किती।
जळो तयाची संगती।
किंवा ऐसें संत झाले कळी।
तोंडी तंबाखूची नळी।।
यावरून आजचे आसाराम, रामपाल,रामरहिम,वीरेंद्र दीक्षित ही कोण आहेत हे लक्षात आले आहे.
संत तुकाराम महाराजांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला,
असाध्य ते साध्य करिता सायास।करण अभ्यास तुका म्हणे।
ओले मूळ भेदी खडकाचे अंग।
अभ्यासाती सांग कार्यसिद्धी।
तसेच खरे संत व साधू कसे ओळखावे व आपण कसे वागावे,काय करावे याबाबत,
“जे का रंजले-गांजले ।
त्याशी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेच जाणावा।”
शेती,शेतकरी हिताबाबत ,
मढे झाकोनिया करिती पेरणी।कुणबियाची जाती लावलाइ।।
व्यवसाय,उद्योग याबाबत.. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ।
उदास विचारे वेच करी।
उत्तमची गती तो एक पावेल।उत्तम भोगील जीवखाणी।
स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्याकडून मार्गदर्शन घेत,त्यांचे आशीर्वाद घेत.जगद्गुरू यांनी लोकांचे प्रबोधन करून त्यांच्यात स्वराज्यप्रती आत्मीयता निर्माण केली. त्यांच्या पाईकांचे अभंग यातून निश्चितच सैनिकासोबत रयतेला प्रेरणा मिळते.
छत्रपती ज्यावेळी त्यांचा गौरव करतांना नजराणा भेट करतात,त्यावेळी नम्रपणे तो नाकारून त्यांना पुढील उपदेश करतात.
“आम्ही तेणे सुखी ।
म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी।
तुमचे येर वित्त धन ।
ते मज मृत्तिके समान।।
कंठी मिरवा तुळशी।व्रत करा एकादशी।म्हणवा हरीचे दास।
तुका म्हणे मज ही आस।

संत तुकाराम यांचे वारकरी धर्माचे कार्य प्रचंड प्रमाणात होत होते. समाजात क्रांतिकारक बदल ही घडत होते.लोक संत तुकाराम यांच्या कीर्तन, प्रबोधन यास ऐकून त्याप्रमाणे वागत होते.अशा महान क्रांतिकारक संत तुकाराम यांना मात्र मंबाजी भट,रामेश्वर भट, सालोमालो ही ब्राह्मण मंडळी प्रचंड प्रमाणात त्रास देऊ लागली.त्यांना धमकावणे,अपमानित करणे, कीर्तनात व्यत्यय आणणे सुरू केले होते.पुढे तर त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम यांच्या बाबत धर्मसभेकडे त्यांची लिखित तक्रार केली. धर्म सभेने संत तुकाराम शुद्र जातीचे असतांना ही लेखणी हाती घेऊन अभंगरचना केली.वाणीने कीर्तन ,प्रबोधन,उपदेश करतात,म्हणून त्यांना शिक्षा दिली.त्यांची अभंगगाथा इंद्रायणीत बुडवली.पण लोकांच्या मुखतगत असणारे अभंग ते बुडवू शकले नाही. जगद्गुरू संत तुकाराम,संताजी जगनाडे व अनेक वारकरी यांनी पुन्हा ते अभंग गाथा स्वरूपात लोकांच्या घरात पोहोचले.

जगद्गुरू संत तुकाराम याना संपविण्यासाठी सनातनी भटांनी प्रयत्न चालू ठेवले.एका महिलेला पाठवून त्यांचे चारित्र्य बदनामीचा प्रयत्न केला.पण हा ही डाव फसला.कारण परस्रिया सदा बहिणी माया हे ते जगत होते..

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथेत काही अभंगात या दुष्ट लोकांनी भेसळ केली,काही अभंग चोरून स्वतःचे नाव लावले.
याबाबत संत तुकाराम यांचाच दाखला आहे.
कालवूनी विष ।
केला अमृताचा नाश।
ऐशा अभाग्याची बुद्धी।
सत्यलोपी नाही शुद्धी।।
किंवा
लावूनी कोलीत।
माझा करतील घात।
ऐसें बहुताचे संधी।
सापडलो खोळेमधी।

संत तुकाराम महाराज संपत नाहीत,त्यांचे कार्य अधिकच गतीने वाढत आहे,आपले डाव फसत आहेत.मग त्यांनी पुढचा डाव टाकला व साधला असे वाटते. त्याला नाव दिले, ‘वैकुंठगमन’. संत तुकाराम महाराज यांच्या 9 मार्च 1650 या धुळवडीच्या दिवशीचे वैकुंठगमन? याबत सत्यता वेगळी असू शकते. कारण कान्होबाची साक्ष व प्रासंगिक अभंग हे तसेच पत्नी जिजाबाईची त्याठिकाणची अनुपस्थिती,त्यानंतर त्यांना देहू गावतून हाकलून देणे,सदू मांग याची सालोमालोला रक्ताची कपडे घेऊन येतांना पाहिल्याची साक्ष. याबाबत अनेक
विचारवंत,संतसाहित्य संशोधक,लेखक यांनी पुरावे दिले आहेत.
सोबतच राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज म्हणतात,
*मेला की मारला कळेना।*
*म्हणती वैकुंठा गेला।*
किती तरी वेळा घात असा सुजनांचा अमुच्याने झाला।।
आणि हा प्रयत्न सतत होत आहे.कारण आमचं मन, ,मनगट,मणका आणि मस्तक घडविणारा संत तुकाराम गाथा ,त्यातील अभंग आम्हाला जाणीवपूर्वक सांगितले जात नाही. कारण त्यापेक्षा इतर ग्रंथ यांचे वाचन,पारायणे केली जातात.याबाबत आम्ही जागरूक राहून हे गाथेतील विचार,अभंग आमच्यासह पुढील पिढीत संस्कारित करणे गरजेचे आहे.
हे अभंग आम्हाला संताजी जगनाडे यांच्यामुळे पुन्हा वाचायला, अभ्यास करायला मिळत आहेत.संत तुकाराम म्हणतात .
‘आमचा एक विठ्ठल प्रचंड।
इतर देवाचे न पाहू तोंड।।’
विठ्ठलावाचोनी ब्रह्म जे बोलती।
ते वचन संती मानू नये।”
‘एका गावे आम्हीं विठोबाचे नाम।अनिकांपे काम नाही आता।।’

✒️लेखक:-रामेश्वर तिरमुखे(जालना,राज्यप्रभारी,सत्यशोधक वारकरी महासंघ,महाराष्ट्र)मो:-9420705653