आयएएसचं स्वप्न बघणा-यांनी आधी आत्मपरीक्षण करावे

31

🔹आपल्यातील गुण-दोषात तारतम्य साधावे

भारतीय नागरी सेवा अंतर्गत आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची निवड केल्या जाते. ही नोकरीसाठी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. आयएएस अधिकारी बनणे अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. भारतात दरवर्षी 100 पेक्षा कमी अधिका-यांची अत्यंत कठीण अशा तीन टप्प्यातील परीक्षा घेऊन निवड केली जाते. यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असते. भारतातील आयएएस ची परीक्षा जगातील फ्रान्स देशानंतर दुस-या क्रमांकाची अवघड परीक्षा म्हणून गणली जाते. इ.स.1858 मध्ये आयएएस ही परीक्षा इम्पीरियल सिव्हिल सर्विस म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर 26 जानेवारी 1956 मध्ये या परीक्षेचे रुपांतर भारतीय प्रशासकीय सेवा म्हणून करण्यात आले. भारतीय प्रशासकीय सेवा ही भारत सरकारची प्रमुख प्रशासकीय नागरी सेवा आहे आणि या परीक्षेला सिव्हिल सर्विसेस एक्झामिनेशन म्हटले जाते. त्याचबरोबर ही परीक्षा दरवर्षी यूपीएससीकडून घेण्यात येते.

आयएएस अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो. त्या पदाच्या वर केवळ मंत्री असतात. भारतात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेंतर्गत केवळ तीन पदांची भरती होते. ज्यात आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिका-यांचा समावेश आहे. नागरी सेवा परीक्षेत अर्थात यूपीएससी टॉप रँकने यशस्वी होणा-या उमेदवारांची निवड आयएएस अधिकारी पदासाठी होते. त्यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी असते. या परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी असते. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी किमान वयोमर्यादा २१ वर्षे आहे. या परीक्षेची तयारी करायची असेल तर ती या वयापासूनच करावी. कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३२ वर्षं असून उमेदवार जास्तीत जास्त ६ वेळा ही परीक्षा देऊ शकतो.

दहावीनंतरच या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. यूपीएससीच्या तयारीसाठी अनेक खासगी तसेच शासकीय संस्थाही कार्यरत आहेत. दररोजचे वर्तमानपत्र आणि नियतकालिक वाचणं अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमचे सामान्य ज्ञान अद्ययावत राहते. दहावीनंतर असा विषय निवडा, ज्यात तुम्हाला रस आहे आणि हाच विषय तुम्ही सिव्हिल सर्व्हिससाठी निवडू शकाल. पसंतीचा विषय आधीच ठरल्याने तुम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. यूपीएससी परीक्षेत एकूण २५ विषयांमधून आपल्याला विषय निवडायचा असतो. तोच विषय निवडा, जो तुम्हाला अभ्यासाला सोपा जाईल. वेळेचे योग्य नियोजन करा. एक रुटीन तयार करा आणि त्याप्रमाणे तयारीला लागा. अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका.

सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करणे आणि त्यांचे पालन करणे हे प्रामुख्याने आयएएसचं काम असतं. जिल्ह्यात आयएएस जिल्हा दंडाधिकारी, जिल्हाधिकारी किंवा आयुक्त असू शकतो. याव्यतिरिक्त बढतीनंतर कॅबिनेट सचिव, सहसचिव, अप्पर सचिव, उपसचिव आदि पदेही मिळतात. भारतीय नोकरशाहीत सर्वोच्च पद कॅबिनेट सचिवचं असतं, जो संसदेलाही उत्तरदायी असतो. याव्यतिरिक्त आयएएस ऑफिसरची सरकारच्या विविध विभागांवर, कंपन्यांमध्ये महामंडळांमध्ये प्रमुखपदी नियुक्ती होते. उदाहरणार्थ, एमएमआरडीए, म्हाडा इत्यादी.

आयएएस अधिकारी बनणा-या कोणत्याही उमेदवाराला ७ व्या वेतन आयोगानुसार दरमहा २,५०,००० रू. वेतन दिले जातात. त्याशिवाय त्यांना प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वैद्यकीय लाभ इत्यादी भत्तादेखील देण्यात येतात. तसेच आयएएस अधिका-यांना राहण्यासाठी घर, संरक्षण, घरातील नोकर, कार इत्यादी इतर सुविधा देखील दिल्या जातात.

मुलाखत हा आयएएस परीक्षेचा शेवटचा टप्पा असतो. यूपीएससी मुख्य परीक्षा पास होणा-या उमेदवारांनाच यात बोलावले जातात. याद्वारे उमेदवाराची मानसिक क्षमता तपासली जाते यामुळे वैयक्तिक निर्णय घेण्यात तो किती सक्षम आहे हे दिसून येते. यासह उमेदवाराचे सामान्य ज्ञान देखील तपासले जाते. मुलाखत परीक्षेसाठी २७५ गुण ठेवण्यात आले आहेत. जर उमेदवार या मुलाखत चाचणीत उत्तीर्ण झाले तर त्यांची नियुक्ती आयएएस अधिकारी पदावर केली जाते.

आपल्यापैकी आयएएस ऑफिसर होण्याची इच्छा प्रत्येकाला असते. यासाठी अनेकजण मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने अभ्यासही करत असतात. यूपीएससी क्रॅकही करतात. मात्र असे विद्यार्थी काही वेळा आयएएसच्या मुलाखती दरम्यान अपयशी होतात. याचं प्रमुख कारण म्हणजे असे विद्यार्थी देशात चाललेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य रितीने देऊ शकत नाहीत. म्हणूनच मुलाखतकारांचा असा समज होतो की अशा उमेदवारांमध्ये आयएएस होण्याची पात्रता आणि गुण नाही. तुमच्यात एका आयएएस ऑफिसरचे गुण आहेत की नाही हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर चिंता नको? आज तुमच्यात अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही एक आयएएस होण्यायोग्य आहात की नाही हे ओळखू शकाल.

यूपीएससी परीक्षेची तयारी करताना तुम्ही गंभीर असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही गंभीर नसाल किंवा तुमचं ध्येय निश्चित नसेल तर तुम्ही वेळ वाया घालवत आहात. तुमच्या मेहनत आणि फक्त मेहनतीनेच तुम्ही यात यशस्वी होऊ शकता. या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक असणं आवश्यक आहे. या परीक्षेची तयारी करणं सोपी गोष्ट नाही. मेहनत आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी असेल तर वेळापत्रक बनवा आणि त्याचे प्रामाणिकपणे पालन करा. म्हणूनच जर तुमच्यात प्रामाणिकता हा गुण असेल तर तुम्ही आयएएस होण्यासाठी परफेक्ट उमेदवार आहात.

जर तुम्हाला समाजात किंवा आपल्या आजूबाजूला काही लोक दुःखी दिसत असतील किंवा त्यांना काही समस्या आहे असं जाणवत असतील आणि तुम्ही त्यांना मदत करत आहात तर हा गुण तुमच्यासाठी फायद्याचा आहे. तुमच्यातील प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता तुम्हाला आयएएस ऑफिसर बनवू शकते. तसेच कॉमनसेन्स असणं ही सर्वात मूलभूत गोष्ट आहे. मात्र ही सर्वांमध्ये असेलच असं नाही. जर तुमच्यामध्येही कॉमनसेन्स म्हणजे कुठे, कधी आणि काय बोलावं किंवा कसं वागावं? याची समज असेल तर तुम्ही एक परफेक्ट आयएएस ऑफिसर होऊ शकाल.

✒️शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,,यवतमाळ)भ्रमणध्वनी-7057185479