गडचिरोली जिल्हयातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

15

 

🔸जनजीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेवून तातडीने उपाययोजना राबविण्याचे प्रशासनाला निर्देश

गडचिरोली(पुरोगामी नेटवर्क)

*गडचिरोली (दि:-23जून)* : जिल्हयाचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हयातील कोरोना स्थिती नियंत्रणात असून जिल्हयातील जनजीवन सुरळीत करण्यासाठी विशेष खबरदारी घेवून उपाययोजना राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. जिल्हा स्तरावरील विविध यंत्रणांचा आढावा त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. लोकांच्यात कोरोनाची भिती संपलेली दिसत आहे. मात्र त्यांनी खबरदारी घेणे सोडून दिल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास मदत होईल. लोकांनी कोरोना संसर्ग होवू नये म्हणून आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे असे त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. प्रशासन सर्व कामांना टप्प्याटप्प्याने मंजूरी देत आहे. जिल्हयातील प्रशासनाच्या, पोलीस विभागाच्या व आरोग्य यंत्रणेच्या चांगल्या कामामुळेच कोरोनाला सामाजिक संसर्गापासून रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत असे ते पुढे म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम उपस्थित होते.

राज्य सरकार १ जुलै पासून रेड झोन तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्र सोडून इतर ठिकाणी आंतरजिल्हा प्रवास सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत विचारविनिमय करत आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील. कारण आता कामगार, मजूर पुन्हा आपल्या कामावर परतत आहेत. विविध साहित्य, वस्तू व्यापाऱ्यांना खरेदी करण्यासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन १ जुलै पासून काही प्रमाणात लॉकडाऊन मध्ये सूट देण्याच्या तयारीत आहे असे त्यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. असे असले तरी कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर, शाररीक अंतर राखून काम करण्याची सवय प्रत्येकाला लागणे अत्यावश्यक आहे. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी काळजी घेणे आवश्यकच आहे असे ते यावेळी म्हणाले.

राज्यातील मंगल कार्यालय यामध्ये वातानूकुलित यंत्र न लावता सर्व कार्यालये ५० व्यक्ती व ५ वाजंत्री यांच्या परवानगीत सुरू करण्याच्या लेखी सूचना काढत आहोत. कारण पावसाळा सुरू झाला आहे यावेळी त्यांना लग्न सोहळा सुरक्षित ठिकाणी पार पाडता यावा म्हणून शासनाकडून हा निर्णय घेतला जात असल्याचे पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याव्यतिरीक्त राज्यातील नाभिक व्यवसायिकांच्या प्रश्नावरही लवकरच तोडगा काढत आहोत. नॉन एसी केशकर्तनालय सुरू करण्यासाठी परवानगी येत्या आठ दिवसात देण्याबाबत चर्चा सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

*जिल्हयात सहा हजार घरकुलांचे प्रकल्प अधिकाऱ्यांना उद्दीष्ट* : गडचिरोली जिल्हयातील आदिवासी भागात तीनही प्रकल्प अधिकाऱ्यांना दोन दोन हजार घरकुलांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. आदिवासी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून येणारा निधी खर्च करावा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज बैठकित दिल्या. आदिवासी लोकजीवन सुधारण्यासाठी आवश्यक आणि गरजेच्या योजनांच राबवाव्यात असेही त्यांनी निर्देश दिले.

*जिल्हयातील पीक कर्जाचे उद्दीष्ट वाढवा* : जिल्हयातील शेती आणि खातेदारांच्या प्रमाणात पीक कर्ज वाटप होत नाही. प्रत्येक बँकांनी यामध्ये जिल्हा बँक व व्यावसायिक बँकांनी आपले उद्दीष्ट वाढवून शेतकऱ्यांना कर्ज पूरवठा केला पाहिजे. शेतकामासाठी यामध्ये बियाणे खरेदी, रोवणी, देखभाल, औषधे, खत व मजूरी अशा कामांना शेतकऱ्यांना वेळेत कर्जपूरवठा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी बैठकित सांगितले. जर बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असतील तर शेतकऱ्यांनी तक्रारी डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयात कराव्यात. यानंतर संबंधित बँकेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाकडून याबाबत एक पोर्टल सुरू करण्यात येत आहे. यातून शेतक-यांनी बँकेकडे केलेल्या अर्जाची स्थिती जिल्हाधिकारी यांना पडताळता येणार आहे. याची सुरूवात या आठवडयात प्रशासनाकडून केली जाणार आहे. यामुळे अकारण पीककर्ज नामंजूर करण्यावर आळा बसणार आहे.

*जिल्हयात दोन आत्याधुनिक स्पर्धा परिक्षा आभिसिका उभारणार* : गडचिरोली व अहेरी येथे जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी डीजिटल आत्याधुनिक आभ्यासिका सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी पत्रकार पकरषदेत माहिती दिली. यामध्ये आदिवासी विद्यार्थी व सर्वसाधारण विद्यार्थी यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. जिल्हयातील चांगले अधिकारी निर्माण होण्यासाठी व शिक्षणाची गोडी स्थानिक युवकांनी लागण्यासाठी याप्रकारे कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

*जिल्हयातील मेडिकल कॉलेज पुढिल सत्रात सुरू होणार तर परिपूर्ण मेडिकल लॅबची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात* : जिल्हयात मंजूरी मिळालेले मेडिकल कॉलेज अंतिम टप्याीरत असून पुढिल शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष सुरू होईल असे त्यांनी सांगितले. याबाबत कॅबिनेटमध्ये अंतिम चर्चा पुढिल काळात केली जाणार आहे. तसेच जिल्हयातील प्रयोगशाळाही लवकरच सुरू करण्यासाठी प्रक्रिया पुर्ण करत आहोत. यासाठी आवश्यक मनुष्यबळ मिळणेकरीता प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. कोरोना चाचण्यासह इतर आजारांवरील चाचण्याही यामुळे जिल्हयातच तात्काळ केल्या जाणार आहेत.

*पीएम किसान योजनेतून शेतकरी वळता कामा नये* : आधार लिंक करणे बाकी किंवा दूरध्वनी जोडणी बाकी या शुल्लक कारणावरून पीएम किसान योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

*जिल्यात रोजगार प्रशिक्षण केंद्र उभारणार* : गडचिरोली जिल्हयात स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून सुसज्य प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. साधारण सहा महिन्यांचा कालावधी असलेले विविध व्यवसायांचा यामध्ये आंतर्भाव केला जाणार आहे.

सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार आनंदराव गेडाम, नामदेवराव उसेंडी, हरिराम वरखडे उपस्थित होते.