सिक्स मिनीट वॉक टेस्ट’मधून कळणार रुग्णांची माहिती

37

पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क

 

*एक मिनीट सिट अप टेस्टचाही पर्याय*

*दत्तपुर प्रतिबंधित क्षेत्रात झाली पहिली तपासणी*

वर्धा, दि 23 जून :
सध्या अनेक रुग्ण कोरोनाची लक्षणे नसलेले आढळून आले आहेत. लक्षणे नसलेल्या प्रत्येकाची टेस्ट करणे शक्य होत नसल्यामुळे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने शिफारस केल्यानुसार सिक्स मिनिट वॉक टेस्टच्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजून कोरोना संसर्गासाठी गंभीर जोखमीच्या असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. आज दत्तपुर येथील प्रतिबंधित क्षेत्रात याचा पहिला प्रयोग करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहून याची माहिती जाणून घेतली.

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वेगवेगळ्या मोहिम राबविल्या जात आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह, संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्या मोठी आहे. तसेच एखादा रुग्ण आढळल्यास प्रतिबंधीत
केल्या जाणारा परिसरही मोठा असतो. सध्या कोरोनाची अनेकांना लक्षणेदेखील दिसत नसल्याचे पुढे आले आहे. अशा स्थितीत रुग्णांचा शोध घेणे देखील अवघड होते. प्रत्येकाची चाचणी करणे शक्य होत नाही.

अशा परिस्थितीत रुग्ण आढळल्यानंतर
प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांची आणि विलगिकरणात असलेल्यांची माहिती संकलीत ठेवण्याचे कार्य आशा सेविकेकडून केले जाते. त्यामुळे त्यांना अशी माहिती
घेण्यासोबतच रुग्णांचीही माहिती मिळावी, याकरीता सिक्स मिनीट वॉक टेस्ट, एक मिनीट सिट अप टेस्टची माहिती देण्यात आली. या टेस्टच्या माध्यमातून रुग्णांची माहिती संकलीत केली जाणार आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे
वरकरणी दिसत नसली तरीही रुग्णांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

दत्तपूर येथील कन्टेनमेंट झोनमध्ये वैद्यकीय जनजागृती मंच आणि आय.एम.ए.च्या
संयुक्त विद्यमाने याचे प्रात्याक्षिक करून दाखवत आशा सेविकांना माहिती देण्यात आली. यावेळी ४६ जणांची सिक्स मिनिट वॉक टेस्ट घेण्यात आली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी बोरकर, डॉ. किमया गंधे, आयएमएचे डॉ.संजय मोगरे, डॉ. विपीन राऊत, डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. सचिन पावडे
उपस्थित होते.

*— अशी आहे टेस्ट —*
यामध्ये सिक्स मिनीट वॉक टेस्ट किंवा वन मिनीट सिट अप टेस्ट असे दोन पर्याय आहेत.
यात सिक्स मिनीट वॉक टेस्टमध्ये सलग सहा मिनीट चालायचे आहे. तर वन मिनीट सिट अप टेस्टमध्ये एक मिनीट उठाबशा काढायच्या आहेत. जे चालू शकत नाही, त्यांना वन मिनीट सिट अप टेस्टचा पर्याय देण्यात आला आहे. टेस्ट पूर्वी
आणि टेस्टनंतर शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सिमीटरने तपासले जाणार आहे. ऑक्सिजनची पातळी ९४ च्या खाली असल्यास व्यक्ती गंभीर परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याची शक्यता असल्याने त्यास उपचारार्थ
दाखल केले जाणार आहे. यामध्ये कोविडच नव्हे तर अस्थमा, दमा, हृदयरोग, इतर फुफ्फुसाचे आजार, न्यूमोनिया या आजाराचीही माहिती मिळू शकते. त्यामुळे हाय रिस्ककडे जावू शकणा-या व्यक्तीवर विशेष देखरेख ठेवता येऊ शकते.

*रुग्णाची लवकर माहिती मिळणे शक्य होते* : *जिल्हाधिकारी भीमनवार*
आयसीएमआरने शिफारस केलेली ही चाचणी आहे. अनेकादा आजाराची लक्षणे दिसत नाहीत. सहा मिनीट चालल्यास ऑक्सिजनची पातळी माहिती होऊन आजाराविषयी
माहिती मिळते. यातून रुग्णाची लवकर माहिती मिळणे शक्य होते. पुढील काळात इतर प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ही टेस्ट करण्याचा प्रयत्न राहील, असे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.