रक्तदान शिबीराचे आयोजन

30

🔹पारंपारिकता जपत मुंदडा कुटुंबियांचा सामाजिक उपक्रम

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23फेब्रुवारी):-शहरातील ख्यातनाम व्यापारी स्व. मदनलाल द्वारकादासजी मुंदडा यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुटूंबियांकडून दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी गंगाखेड शहरात श्री हुजूर साहेब रक्तकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील प्रसिद्ध व्यापारी मदनलाल मुंदडा याचे 14 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले. व्यवसायासोबतच शहरातील सामाजिक , धार्मिक व राजकीय उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. हीच बाब लक्षात घेता कुटूंबियांनी त्यांच्या बाराव्या निमित्त पारंपारिक कार्यक्रमांव्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला. चर्चेतून रक्तदान शिबीर घेण्याबाबत विचार पुढे आला. याला कुटूंबियांनी एका क्षणाचाही विलंब न करता होकार दर्शविला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक जाणिवेची बीजे रोवली जातील व पुरोगामी व सक्षम समाजनिर्मितीकडे पाऊल पडेल असा विश्वास मुंदडा कुटूंबियांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हे रक्तदान शिबीर राहत्या घरी, मुंदडा निवास, नवा मोंढा, गंगाखेड येथे संपन्न होणार आहे. तरी या शिबिराचा लाभ शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन मुंदडा कुटूंबीय तसेच रक्तपेढीकडुन करण्यात आले आहे.

या शिबीराच्या यशस्वीतेसाठी श्री हुजूर साहेब रक्तकेंद्राचे सूर्यवंशी सर, सामाजिक कार्यकर्ते अमोल अवकाळे, सुनिल पवार, ओंकार क्षीरसागर, प्रदीप सर हे अथक परिश्रम करत आहेत.