✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(25 जुन)-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या बंदर(शिवापूर) येथे कोळसा खाण सुरू करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. हा परिसर जंगलव्याप्त असून या परिसरात वन्यप्राण्यांचे भ्रमण सातत्याने होत असल्याने या कोळसा खाणीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ट्री फाउंडेशन च्या वतीने पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे.
पंतप्रधान यांच्या नावाने लिहिलेले निवेदन चिमूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले. बंदर येथे सुरू करण्यात येणारी कोळसा खाण ही वन्यप्राण्यांवर प्राणघातक असल्याची भावना निवेदनात व्यक्त केली आहे, या परिसरात वाघ,बिबट,हरीण,सांबर व अन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो, हा परिसर वन विभागाच्या मालकीचा असून ग्रीन कॅरिडोर आहे, हा कॅरिडोर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तें मेळघाट किंवा बोर अभयारण्य पर्यन्त जातो,त्यामुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक स्थलांतर होत असते,या प्रकल्पामुळे वाहतुकीचा मार्ग बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्ग बदलल्यास मनुष्य व वन्यजीव यांच्यात संघर्ष होण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प मानव व वन्य प्राणी यांच्याकरिता धोकादायक होणार असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.
या प्रकल्पामूळे स्थानिकांना रोजगार मिळेल हे स्वप्न दाखविले जात आहे,यापूर्वीच सुरू असलेल्या मुरपार कोळसा खाणीत स्थानिक लोक किती आहेत, हा संशोधनाचा विषय ठरला आहे,असे अनेक विषय या निवेदनात मांडले आहेत.
निवेदन सादर करताना ट्री फाउंडेशन चे मनिष उर्फ मंदार नाईक,युवराज मुरस्कार ,संदीप किटे,विक्रम लोणारे, सुधीर खेडीकर,तुषार रासेकर, आदित्य कडू, पवन वंजारी, रोहित बबूलकार, प्रजवल ढोक, अतुल सेलोकर, अक्षय लांजेवार, चेतन रासेकर आदी उपस्थित होते.
————––——––————–
-: पर्यावरण प्रेमींना आवाहन :-
चिमूर तालुक्यात निर्माण होऊ घातलेल्या बंदर कोळसा खाणीला सर्वच पर्यावरण संरक्षण करू पाहणाऱ्या संघटनानी स्वतंत्र रित्या निवेदन सादर केले आहे, हा लढा तीव्र करण्याकरिता सर्वच संघटना एकत्र येऊन आंदोलन गतिमान करावे,
आपआपल्या संघटना कायम ठेवून एक मंच/फेडरेशन तयार करण्यात यावे,या माध्यमातून हा संघर्ष करावा अशी अपेक्षा आहे.
आम्ही केवळ अपेक्षा ठेवून मोकळे होणार नाही ,तर आपल्या सोबत प्रसार माध्यम म्हणून सोबत राहू !
सुरेश डांगे
संपादक- पुरोगामी संदेश
मो.8605592830

पर्यावरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED