हॉटस्पॉट झोनमधून अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल

13

पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क

चंद्रपूर,दि.25 जून:

मुंबई सारख्या हॉटस्पॉट शहरातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन व्यक्तींनी अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केला. या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेचे 1860 चे कलम 188, 269,270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे 51(बी), साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, दिनांक 13 जून रोजी मुंबईवरून एकाच कुटुंबातील पती-पत्नी असे दोन व्यक्ती चंद्रपूर मध्ये दाखल झाले होते. परंतु शहरांमध्ये प्रवेश करतांना शकुंतला लॉन येथे आरोग्य तपासणी व नोंदणी करणे गरजेचे आहे. किंवा याबद्दलची माहिती महानगरपालिकेला देणे गरजेचे आहे. परंतु या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारची तपासणी अथवा माहिती जिल्हा प्रशासनाला दिली नाही. यासंदर्भात दिनांक 20 जून रोजी जिल्हा कोरोना नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथे माहिती प्राप्त झाली. तसेच या दोन व्यक्तींनी दिनांक 21 जून रोजी फादर डेच्या निमित्ताने स्वतःच्या राहत्या घरी कार्यक्रम आयोजित केला होता, अशी माहिती नागरिकांकडून प्रशासनाला देण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची माहिती  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2, रामनगर मनपा चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी भारत यांनी रामनगर पोलीस स्टेशनला दिली. यानंतर रामनगर पोलीस स्टेशन मध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी रीतसर परवानगी  घेऊनच जिल्ह्यात प्रवेश करावा  तसेच  प्रवेश केल्यानंतर  प्रशासनाला माहिती द्यावी व प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.