बीडमध्ये 3 हजार गर्भ गायब? नोंदणी व प्रसूतीच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत

28

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.12मार्च):-स्त्रीभ्रूण हत्येचा काळा ढाग लागलेल्या बीड जिल्ह्यात, कोरोना काळात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2020-21 या वर्षात पोर्टलवर नोंदणी केलेल्या गर्भवतींची संख्या आणि प्रसूती झालेल्या मातांची संख्या, याच्यामध्ये मोठी तफावत आढळून आली असून यामध्ये जवळपास 3 हजार गर्भ गेले कुठे? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळात सोनोग्राफी सेंटरकडे झालेले दुर्लक्ष व त्यानंतर मुलीचा जन्मदर घटल्याचा आलेला अहवाल, यावरून गर्भलिंग निदान करून अवैध गर्भपात झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. अवैध गर्भपात सारख्या गंभीर समस्येकडे आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देखील, सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

कोरोना काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्याने, मुलींचा जन्मदर घटल्याचे PCPNDT च्या राज्य समितीच्या अशासकीय सदस्या डॉ.आशा मिरगे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद सांगितले होते. त्यानंतर आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र याच कोविड काळात गर्भवतीच्या नोंदणी व प्रसूतीच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याच समोर आलं आहे. बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात 48 हजार 838 गर्भवतींची नोंदणी आरोग्य विभागाकडे झाली आहेत. तर त्यापैकी खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये, याच काळात 45 हजार 642 महिलांची प्रसूती झाली. त्यामुळे राहिलेले 3 हजार 500 गर्भ गेले कुठे? असा प्रश्न सामजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे, तसे गर्भलिंग निदान करून गर्भपात केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.