🔸जिल्ह्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा 24 लाखांवर साठा जप्त🔸

14

🔹अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

✒️चंद्रपूर (नरेश निकुरे,कार्य. संपादक)

चंद्रपूर(दि.26 जून):अन्न व औषध प्रशासन ( महाराष्ट्र राज्य)  चंद्रपुर या कार्यालयाने कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी 174 आस्थापनांची सखोल तपासणी केली आहे. प्रतिबंधीत अन्नपदार्थ जसे खर्रा, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व पानमसाला अशा एकूण 34 प्रकरणात 1257.99 किलोग्रॅम किंमत  24 लाख 11 हजार 573 रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. वेगवेगळ्या आस्थापना विरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आले आहे. या संबंधित पुढील तपास सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अन्न व्यावसायिक खर्रा, गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थ उत्पादन, साठा, वितरण, विक्री वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 59 अंतर्गत कारवाई केल्या जाणार आहे. तसेच सहा वर्षाचा कारावास व रुपये पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकतो याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन( महाराष्ट्र राज्य) चंद्रपूर यांनी केले आहे.