✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.26 जून):जिल्हाप.चंद्रपूरच्या पुढाकाराने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये परसबाग तयार करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण संजय जोल्हे यांचे मार्गदर्शनात सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्य करीत आहे.
बालविकास प्रकल्प अधिकारी पोंभुर्णाचे अमोल मेरगळ, विस्तार अधिकारी सुरेश राठोड,तालुक्यातील सर्व सरपंच,ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका,मदतीनिस तसेच ग्रामीण विकास दूत सुमित तिवारी यांच्या समन्वयाने उमेद अभियानाच्या माध्यमातून 25 जून ते 15 जुलै दरम्यान पोषण पंधरवाडा अंतर्गत पोंभूर्णा तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये परसबाग लावण्यात येत आहे.
परसबागेचा प्रमुख उद्देश म्हणजे स्वच्छ आणि ताज्या भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊन यातून सकस आहार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना देणे होय. यामध्ये 3 ते 6 वयोगटातील लाभार्थी, स्तनदा माता, गरोदर माता त्यांच्या आहारात पालेभाज्यांचा वापर करून कुपोषणाचे प्रमाण कमी करणे होय. या परसबागेमध्ये प्रामुख्याने चवळी, पालक,कोथिंबीर, मेथी, टोमॅटो,वांगी, मिरची इत्यादी अनेक पालेभाज्या व फळभाज्या घेतल्या जात आहे.
परसबागेसाठी गावातील सरपंच,बालविकास प्रकल्प अधिकारी,पर्यवेक्षिका, ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच उमेदच्या सर्व गावातील कृषी साथी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभत असते.