झुंड : वास्तववादी आक्रंदनाचा एल्गार

31

जागतिक स्तरावर युद्धाचा भडका उडणार या वातावरणात भारतातील वास्तववादी जीवनाचे ज्वलंत आक्रंदन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मोठ्या खुबीने ‘झुंड’ ह्या चित्रपटात मांडले आहे. विकासाच्या मोठमोठ्या बाता करणाऱ्या सरकारला वंचित व शोषित समाजातील मुलांची भयावहता किती मोठी आहे हे विदारक चित्रण झुंड या चित्रपटातून मांडल्याबद्दल नागराज मंजुळे व त्यांच्या सर्व टीमचे लाख लाख अभिनंदन.

विजय सरांच्या कार्यकर्तृत्वाच्या सर्वस्वी दृष्टिकोण, झोपडपट्टीतील वाहवत गेलेल्या मुलांमधील ज्वाजल्य भावना व कौशल्य हेरून मुलांना फुटबॉल सारख्या फेमस अशा खेळास तयार करणे हेच नागपूरच्या इतिहासातील महत्त्वाचे काम आहे.

समाजाने नाकारलेल्या दीनदुबळ्या, गरीब, वंचित, आदिवासी अशा समाजांची नाळ झोपडपट्ट्यातून जोडलेली आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खेडी सोडा व शहराकडे प्रस्थान करा हा संदेश आपल्या बांधवांना दिला होता. या संदेशाच्या अनुषंगाने अनेक माणसे शहरांमध्ये आली. पण शहरात आल्यावर त्यांना राहण्याचा मोठा प्रश्न पडला. त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी छोटी वस्ती करून आपलं जीवन जगायचं आणि एक नवीन स्वप्न पहायचं हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. गावातील जातीयतेने होरपळून निघालेले जीवन शहरात नवी उर्मी घेऊन उंच भरारी घेण्यासाठी संघर्ष करत आहेत.देशभरात झोपडपट्टीच्या आडोशाने आपले संसार फुलवले. झोपडपट्टीत राहणारा घटक हा वंचित आहे. त्यामुळे या झोपडपट्ट्याला विकासापासून दूर ठेवले . अनेक वाईट चालीरिती चरस, गांजा ,अफू, चोरी, खून यांचे विविध वाईट परिणाम झोपडपट्टीतील बालमनावर होत होते.

त्यांची बोलीभाषा, त्यांची आक्रमकता, शब्दातील आग हे लहानपणापासून त्यांच्या ओठावर येत होती. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या झोपडपट्ट्या मोठ्या शहरात कितीतरी वर्षापासून तशाच अवस्थेत आहेत. यावर चिंतन न करता या झोपडपट्ट्याच्या दुर्गंधीचे डबके म्हणून ढुंकूनही न पाहणारी पांढरपेशी जमात स्वतःच्या आयुष्याचे तुणतुणे वाजवतात. अशा दुःखमय व आक्रमकतेच्या मुलांना योग्य वाळणावर आणले.

विजय हा नक्कीच एक खंबीर व मजबूत बनण्याचा माणूस आहे. अमिताभ बच्चन या नायकाने विजयचे पात्र अत्यंत लिलीयापणे साकारलेले आहे. त्यांच्या कलेमध्ये कुठेही मोठेपणाचा अहंकार दिसत नाही.हे अत्यंत महत्त्वाचे वाटते.तसेच या चित्रपटातून जे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक वास्तव अधोरेखित केले आहे . ते अत्यंत मोठ्या खुबीने साकार केले आहे. नागपूरच्या कलाकारांनी नागपूरच्या भूमीतच एका मोठ्या हिंदी चित्रपटातून आपली कला जगासमोर मांडणे हेच या चित्रपटाचे यश आहे .या चित्रपटांमध्ये असलेले कथानक यामध्ये काही मर्यादा असल्या तरी विजयने केलेला संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे . त्या काळामध्ये मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचे मोबाईल वापरण्याची वृत्ती नव्हती. पण तो प्रकार या चित्रपटात वापरलेला आहे . हे दिग्दर्शकाला काहीतरी सुचवायचे असेल असे मला वाटते.

भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परिवर्तनाची नवी वाट दाखवणारे महामानव म्हणून देशांमध्ये आणि जगामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही एक समाज परिवर्तनाचा नवा आयाम असतो. पण या चित्रपटामध्ये भीमजयंतीत वापरलेली गाणी यामधून समाजाला वेगळा संदेश जाऊ शकतो का हा प्रश्न मला पडला आहे. यामधून दिग्दर्शकांना काहीतरी सांगायचं आहे हे मान्य केले असेल, तरीपण यामध्ये जर परिवर्तनवादी गाणी वापरली असती तर ते अधिक योग्य झाले असते.नागराज मुंजळे हा एक उत्तम सृजनशील आविष्काराचा नवा कलंदर गंभीर दिग्दर्शक आहे. स्व:ताच्या वाटेला आलेल्या संघर्षमय जीवनाला मोठ्या खुबीने मांडण्याची कला अप्रतिम मनावी लागेल.अनेक चित्रपटातून त्यांनी जगण्याच्या जिद्दीची व समाजातील वास्तवाची मांडणी केली आहे. समाज आज बदलला नाहीतर असे अनेक तरुण वाईट सवयीने आपले जीवन उद्ध्वस्त करतील. त्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन मिळाले तर ही झुंड समाजाचा नवा आरसा दाखवू शकते. समाज परिवर्तन घडवून आणू शकते.

झुंड ही एक न्यायाची लढाई आहे .विचार वेदनांचा आक्रोश आहेत. मानवाला हीनपणा मानणाऱ्या मुर्दाड समाजाला आरसा दाखवणारा ऊर्जावान पथ आहे .झुंड हा चित्रपट बनवून नागराज मंजुळे यांनी हिंदी चित्रपटातील साचेबंद व्यवस्थेला मोठे हादरे दिलेले आहेत.हिंदी चित्रपटाला नवीन बुध्दिवादी सौंदर्य दिले आहे.सैराट फेम आर्ची व परश्या, अंकुश मसराम आणि त्यांच्या टीमने जी मेहनत घेतली ही अत्यंत वाखाणण्याजोगी आहे.

या चित्रपटातील डायलॉग,मेकअप, संगीत व प्रकाशयोजना अप्रतिम अशीच आहे. आदिवासी तरुणीला स्वतःच्या पासपोर्टसाठी करावा लागणारा संघर्ष हा डोळ्यात अंजन घालणारा आहे. या चित्रपटात वेदना, विद्रोह ,नकार, आकांत ,भय,भांडण,परिवर्तन, भावना,समर्पण, यांचा समन्वय आहे . बदलत्या राजकीय व सामाजिक चिंतनाला नवी दिशा दाखवणारा हा पथदर्शक चित्रपट आहे. झुंड हा चित्रपट वास्तववादी आक्रमणाचा एल्गार आहे .पुन्हा नागराज मुंजळे यांनी आपले सामाजिक आशियाचे चित्रपट निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या परिवर्तनवादी झंझावाताला जागतिक पातळीवर घेऊन जावे हीच मंगलमय सदिच्छा…

ता.क. : एग्जिट ला डेग्जिट करून लोकशाहीचा हातोळा कुणावर पडणार याची वाट पहा. विजय जनतेचाच होईल हे मात्र नक्कीच….

✒️संदीप पाटील(नागपूर)मो:-९६३७३५७४००