🔹शेतकऱ्यांनी खताचा संतुलित वापर करा

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर,दि.27 जून: खरीप हंगाम सन 2020 मध्ये शेतकऱ्यांना विविध शेत पिकांसाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खताचे जसे की, युरिया, डीएपी, एसएसपी, संयुक्त खते इ.चा जिल्हास्तरावरून यथोचीत नियोजन करण्यात आलेले आहे. या वर्षी रासायनिक खताचे चंद्रपूर जिल्हासाठी एकूण 1 लाख 62 हजार 337 मे.टन खताचे नियोजन करण्यात आलेले असून त्यापैकी 1 लाख 33 हजार 110 मे. टन खताचे आवंटन शासनाने मंजूर केलेले आहे. त्यामुळे रासायनिक खताचा जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

21 जून 2020 पर्यंत जिल्ह्यामध्ये 24 हजार 89 मे. टन युरिया, 8 हजार 911 मे. टन डीएपी, 13 हजार 2 मे. टन एसएसपी, तसेच संयूक्त खते (20:20:00:13, 15:15:15, इ.) 35 हजार 64 मे. टन खत उपलब्ध झालेली असून त्याचे सर्व निविष्ठा विक्री केंद्रातून विक्री सूरू आहे.

या वर्षी जिल्ह्यामध्ये अद्यापपावेतो रासायनिक खताचा मुबलक साठा उपलब्ध झालेला आहे. त्याचे सर्व तालुक्यांमध्ये यापुर्वीच वितरण सुरू करण्यात आलेले आहे. आरसीएफ कंपनीची युरियाची रेक मागील आठवड्यातच लागली होती. त्यामधून जवळपास 2 हजार मे.टन खत शेतकऱ्यांना कृषि केंद्रा मार्फत वितरीत करण्यात आले आहे.

आतापर्यंत 53 हजार 800 मे. टन मंजूर युरियाचे आवंटनापैकी जवळपास 24 हजार 89 मे. टन युरिया खत जिल्ह्यास प्राप्त झालेले आहे.जे मागिल वर्षीच्या तुलनेत जास्त आहे.तसेच याच आठवड्यात युरियाची आयएफएफसीओ कंपनीची रेक द्वारे साधारण 3 हजार मे. टन युरिया खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत आहे. तसेच आरसीएफ कंपनीचे 20:20:00:13 व डीएपी हे खत व कोरोमंडल कंपनीचे 20:20:00:13 हे खत सुध्दा याच आठवड्यात उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांना रासायनीक खत उपलब्ध होतील किंवा नाही यासंभ्रमात राहू नये. तसेच शेतकऱ्यांनी एखाद्या विशिष्ट कंपनीचेच युरिया किंवा इतर खते मिळाले पाहिजे असा आग्रह न धरता पिकाला आवश्यक नत्र, स्फूरद व पालास याचे सुत्र जोडून खताची खरेदी करावी. या नियोजना करिता तालुका स्तरावरील कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची मदत घ्यावी. आवश्यक ती सर्व खते जिल्हा स्तरावरील यंत्रणा उपलब्ध करून देण्यास सक्षम व तत्पर असून त्याप्रमाणे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जर कोणी दुकानदार एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री करत असल्यास जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण कक्ष क्र. 07172-271034 किंवा टोल फ्रि क्र. 18002334000 यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

कृषिसंपदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED