🔸1 ते 7 जुलै कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन

7

🔹शेतकऱ्यांनी कृषी विभागा मार्फत होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर दि. 27 जून: हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी तसेच कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. यास अनुसरून शेतकऱ्यांमध्ये परिणामकारक प्रचार व जनजागृती करण्यासाठी दि.1 जुलै ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषी विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून गाव बैठका, शिवार भेटी, व शेतीशाळेचे आयोजन करून कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

या सप्ताहामध्ये खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ, आत्मा, कृषी मित्र हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच सर्व कृषी व कृषी संलग्न विभाग जसे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग, सहकार, ग्रामविकास,पणन इत्यादी विभागाच्या सहकार्याने त्या-त्या विभागाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

कृषी संजीवनी सप्ताह दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून योजनांची माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.