🔹संपर्काच्या माध्यमातून कोरोना नियंत्रित करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक🔹

18

🔸चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून मदतीचे 50 हजार कॉल पूर्ण

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28जून ): कोरोना आजार गेल्या तीन महिन्यांच्या टप्प्यात वेगवेगळ्या पद्धतीने सूचना आणि संपर्काने लक्षात राहण्यासारखा आहे. शासकीय यंत्रणेचा या काळातील सामान्य माणसाची संपर्क महत्त्वाचा ठरला. सार्वजनिक नकाशावर केवळ आणि केवळ शासकीय यंत्रणाच जेव्हा एक हाती लढत होती. तेव्हा 50 हजार नागरिकांशी सुखदुःखाचा, मदतीचा संवाद साधणारे 50 हजार कॉल जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले. 24 तास चालणाऱ्या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांचे काल जिल्हा प्रशासनामार्फत कौतुक करण्यात आले.

परवा सायंकाळी 50 हजारावा कॉल लागला तेव्हा या संपर्क केंद्रात स्वागत करणाऱ्यांनी प्रथम परस्परांचा टाळ्या वाजवून उत्साह वाढवला. कॉल लागत नाही ही कॉल सेन्टर बद्दलची तक्रार असते. परंतु लागलेल्या 50 हजार कॉल्समधून काही दूरध्वनींनी अनेक भेदरलेल्या, घाबरलेल्या, असाह्य जनतेला साथ दिली आहे. अशा कितीतरी आठवणी या कर्मचाऱ्यांकडे आहे. तुमच्या माझ्या सारख्या सामान्य घरातील जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हे दायित्व पार पाडले आहे.

कोविड-19 या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे आजारापासून जिल्हातील नागरिकांचे संरक्षण करणे व त्यांना आजाराविषयी माहीती पोहोचविण्याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे नेतृत्वात नियंत्रण कक्ष व संपर्क केंद्र दिनांक 23 मार्चला स्थापन करण्यात आले. यामागील प्रमुख उद्देश जिल्ह्यातील नागरिकांना आजाराविषयी माहीती पोहचविण्याचे व त्यांच्या अडचणी सोडविणे आहे. सदर संपर्क केंद्रानी दिनांक 25 जूनला जिल्हातील एकूण 50 हजार नागरिकांना संपर्क साधण्याचा टप्पा गाठलेला आहे. त्यानिमित्य जिल्हा संपर्क केंद्रामध्ये सदर प्रक्रियेत सहभागी सर्व जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्याचा गौरव करण्याकरीता सोशल डिस्टसिंगचे पालन करुन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा धनवाडे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, बालसंगोपन अधिकारी डॉ. संदीप गेडाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्रकाश साठे, कॉल सेंटरचे कक्ष अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी कोणतीही कार्य पूर्णत्वास नेत असताना टीम वर्क खूप महत्त्वाचे असते. या सर्व टीम वर्क मुळेच आज जिल्ह्यातील 50 हजार नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निराकरण करू शकलो असे मत व्यक्त केले. या जिल्हा संपर्क केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील अडकलेले परराज्यातील, परजिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्या सोडविल्या जात आहे. कोरोनाच्या काळामध्ये आवश्यक असणारी माहिती पोहोचविण्याचे कार्य यशस्वीरित्या संपर्क केंद्राच्या माध्यमातून करीत आहे.

प्रास्ताविकात वैद्यकीय अधिकारी तसेच संपर्क केंद्राचे कक्ष अधिकारी डॉ.किशोर भट्टाचार्य यांनी संपर्क केंद्रामध्ये काम करणारे कोणीच व्यावसायिक कॉल करणारे नसुन सर्व विविध विभागातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत.परंतु सामाजिक जाणिवेतून सर्वांनी कोविड-19 या महामारीच्या काळात एकत्र येऊन 50 हजार कॉल्सचा आकडा पुर्ण करुन दाखविला हि अभिमानाची गोष्ट आहे.

कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ प्रशासन अधिकारी अजय टेम्पलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल कळस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशश्वीतेकरीता कनिष्ठ प्रशासन अधिकारी विलास मांडवकर, सुनिल कळस्कर, कल्पना सुर्यवंशी, नंदकिशोर लिंगलवार, गौतम भेले, सुनिल चिकटे व इतर अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.