भुकेल्यांना अन्न देणं हि संताची शिकवण – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे

71

🔸अटल आहार योजनेचा गंगाखेड मध्ये शुभारंभ

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21एप्रिल):- सर्वसामान्य माणसाला अन्न देणं हे पुण्यांचं काम आहे. तहानलेल्यास पाणी आणि भुकेल्यास अन्न देणं हा खरा मानवधर्म आहे. त्यामुळेच काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजणारे आणि तुपाची वाटी खा म्हणून कुत्र्याच्या मागे धावणारे संत महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. त्यांचीच शिकवण घेऊन आपणाला चालावे लागेल. तेव्हाचं देशातील भुकेल्यांचा प्रश्न सुटेल. अन्यथा देशात उपाशी पोटी झोपणारांची संख्या वाढेल, असे स्पष्ट मत गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.

शहरातील राम-सीता सदन येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन देण्यासाठीची अटल आहार योजनेचा शुभारंभ आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मध्यान्ह भोजन योजनेचे जिल्हा समन्वयक श्याम कातकडे, पं.स.सदस्य मगर पोले, ब्रिजेश गोरे, आप्पा शेटे, प्रा.डॉ.प्रकाश सुर्वे, प्रा.डॉ.धनपाल चव्हाण, अॅड.मिलींद क्षिरसागर, बाबा पोले यांच्यासह रासपा पदधिकारी व आ.डॉ.रत्नाकर (काका) गुट्टे मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, गंगाखेड शहरासह ग्रामीण भागात सुमारे 700 बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर आणखी गरजू कामगारांची दररोज नोंदणी वाढते आहे. गरजू लाभार्थीना हे जेवण पोहचविण्यासाठी सुसज्ज अशी एक आधुनिक मोठी व्हॅन उपलब्ध करण्यात आली आहे. एक गाडी सुमारे 700 ते 800 लोकांचे जेवण पोहचवू शकते. भविष्यात कामगारांची नोंदणी संख्या वाढल्यास दुसरी सुध्दा व्हॅन उपलब्ध करण्यात येईल. परंतु प्रत्येक गरजू कामगारांच्या पोटात सुखाचे दोन घास पोहचले पाहिजेत, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या योजनेमुळे बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी सकस आहार देण्यात येईल. त्या माध्यमातून कष्टकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसह या क्षेत्राशी निगडित इतर क्षेत्रातील कामगारांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना राज्यात लोकप्रिय ठरेल.

कामगारांचे आरोग्य, त्यांच्या पाल्याचे शिक्षण ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी घराच्या व्यवस्थेसाठी हे मंडळ त्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो कामगारांना या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. आज त्यामध्ये अणखीन एका नवीन योजनेचा समावेश होत आहे, तो म्हणजे बांधकाम कामागार मध्यान्ह भोजन योजना याचा निश्चितच सर्व कामागारांना फायदा होणार आहे. या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी असेही आवाहन मध्यान्ह भोजन योजनेचे जिल्हा समन्वयक श्याम कातकडे यांनी बोलताना बांधकाम कामगारांना केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत चक्के, गोपी नेजे, सचिन राठोड, शाम ठाकूर, प्रभाकर माळवे, चेतन पंडित, ऋषिकेश बनसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.