जागतिक पुस्तक दिन

आज २३ एप्रिल आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. विल्यम शेक्सपिअर, मिग्युअल सर्वांटीस, इंका गार्सीलोसो या जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्वांटीसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनिस्कोची सर्वसाधारण सभा झाली ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला. वाचन संस्कृतीच्या चर्चेविना पुस्तक दिन साजरा होऊच शकत नाही चला तर मग वाचन संस्कृती विषयी चर्चा करू आणि पुस्तक दिन साजरा करू. आजच्या मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत चालले आहे. पूर्वी विद्यार्थ्यांमध्ये जशी वाचनाची आवड होती तशी आवड आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही. आजच्या सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या युगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी कमी होत चालली आहे. साहित्य संमेलनामध्ये पुस्तकांची विक्री कमी होऊ लागली आहे. पूर्वी गजबजाणारी वाचनालये आता ओस पडू लागली आहेत. ग्रंथालयातील पुस्तके वर्षानुवर्षे एका जागेवरून हलत नाही. आजची पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने पुस्तकांपासून दूर होत चालली आहे. सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे विद्यार्थी अवांतर वाचन विसरत चालले आहेत. सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे.

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पुस्तक दिनासारख्या उपक्रमांचे आयोजन व्हायला हवे. आजच्या युगात ज्ञान ही खूप मोठी शक्ती आहे याचाच आपल्याला विसर पडला आहे. वाचनामुळे आपल्याला इतिहासाचे ज्ञान, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध घेता येतो. ज्ञान मिळवण्याचे प्रभावी साधन म्हणजे वाचन. सातत्याने वाचन केल्यावर आपली ग्रहण क्षमता आणि स्मरणशक्ती अधिकाधीक सशक्त होऊन बुद्धिमत्ता अधिकाधीक प्रगल्भ होते त्यातून माणसाच्या विचार पातळीचा चोहोबाजूंनी विकास होतो. वाचनामुळेच माणसाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होतो. चांगलं वाचल्यावर आणि चांगलं ऐकल्यावर आपले विचार विवेकशील व प्रगल्भ होतात, त्यातून आपली मनोभावना शुद्ध होते. आपली भाषा तसेच वक्तृत्व विकसित होते. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्व बहरते. वाचन ही जीवनाला उन्नत करणारी बाब आहे यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलवण्यात वाचनाचा मोठा वाटा असतो त्यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करायला हवे. मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात रमले पाहिजे. चांगल्या पुस्तकांचा, विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जातो. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेला माणूस हत्या, आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतो. आजकालच्या तरुणांना खूप ताण असतो हा ताण कमी करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे वाचन. डॉ बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते आणि सशक्त मस्तक कोणासमोरही डोळे झाकून नतमस्तक होत नसते.

स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यासारख्या महापुरुषांच्या जीवनाला वाचनामुळेच कलाटणी मिळाली. ऐतिहासिक पुस्तकांमुळे वाचकांच्या मनात राष्ट्रनिष्ठा निर्माण होते. कथा कादंबरी यामुळे वाचकांच्या मनात माणुसकीचा भाव जागृत होतो. काव्य वाचनातून आपल्या मनात संवेदनशीलता निर्माण होते. थोरांची चरित्रे वाचून प्रेरणा मिळते. वर्तमानपत्र वाचल्याने सामाजिक जाणिव निर्माण होते. एकूणच वाचनामुळे माणूस सर्वगुणसंपन्न होतो. त्यांच्यात नैतिक मूल्यांची रुजवण होते. आज वाचनाअभावी समाजातून नैतिक मूल्ये हरवत चालली आहे. त्यामुळे नव्या पिढीने पुन्हा एकदा वाचन संस्कृतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. आपल्या आणि समाजाच्या भल्यासाठी वाचन संस्कृती टिकवायलाच हवी. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे तरुण पिढीला वाचवायचे असेल तर त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवायलाच हवे, त्यासाठी पुस्तक दिनासारखे उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरतील.

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED