


✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.22एप्रिल):-राज्यात बऱ्याच काळापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर संपुष्टात आला. संपकरी एसटी कर्मचारी व महाविकास आघाडी सरकारमध्ये विलीनीकरणावरून बराच संघर्ष झाला. या ४ महिन्यांपेक्षाही अधिक काळात महाराष्ट्रातील जीवनवाहिनी असणारी लालपरीची चाके थांबली होती. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांची यामुळे प्रचंड गैरसोय झाली. मात्र, हायकोर्टाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता ग्रामीण भागातील लालपरी रुळावर आली आहे.
गाव खेड्यातील, वाड्या तांड्यावरील सामान्य नागरिकांच्या प्रवासाचा प्रश्न जरी सुटला असला, तरी बस स्थानकाच्या आवारातील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांकडे, मात्र एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतेचा अभाव, महिला सुरक्षेचा प्रश्न, रात्री लोडशेडिंग झाली असता बस स्थानकात संपूर्णपणे अंधार असतो. यामुळे या समस्येकडे कधी लक्ष्य देणार? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.




