गंगाखेड तालुक्यातील भारनियमन बंद करा

23

🔸आ. गुट्टे काका मित्र मंडळ व रासप च्या वतीने तहसिलदारांना दिले निवेदन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23एप्रिल):-सध्या सुरू असलेल्या भारनियमनामुळे गंगाखेड तालुक्यातील जनता त्रस्त झाली असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शहर व परिसरातील नागरिक यामुळे संतप्त झाले आहेत. या होणाऱ्या भारनियमनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमूग, ऊस, भाजीपाला व इतर उन्हाळी पिकांचे भरपूर नुकसान होत आहे. भारनियमनामुळे शेतातील कृषी पंपांना दिवसातून किमान 10 तास पूर्णक्षमतेने विद्युत पुरवठा करणे गरजेचे असतानाही तो होत नाही.त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.अगोदरच कोरोनामुळे त्रस्त झालेले सर्व स्तरातील नागरिक आता कुठे सरसावत असताना ह्या भारनियमनाच्या संकटाला बळी जावे लागत आहे.

हीच बाब गांभीर्याने लक्षात घेऊन गंगाखेड तालुक्यातील गावठाण भारनियमनमुक्त करून कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने किमान 10 तास वीजपुरवठा देण्यासंदर्भात 08 दिवसाच्या आत नियोजन लावावे अन्यथा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मा.तहसीलदार गंगाखेड यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, कार्यकारी अभियंता महावितरण परभणी व उप अभियंता महावितरण उपविभाग गंगाखेड यांना ही निवेदन दिले आहे.यावेळी उपस्थि रा.स.प. जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, नगरसेवक सत्यपाल साळवे, पंचायत समितीचे माजी सभापती मगर पोले, पंचायत समिती सदस्य नितीन बडे, गंगाखेड विधानसभा अल्पसंख्यांकचे अध्यक्ष एकबाल चाऊस, गंगाखेड विधानसभा ओबीसी सेलचे अध्यक्ष ब्रिजेश गोरे, रासपचे ज्येष्ठ नेते विलास गाढवे, एकनाथ गेजगे, महेश आप्पा शेटे, राजू खान, शेख खालीद, भास्कर ठावरे, बालासाहेब चाफेकानडे आदी उपस्थित होते.