बहिणीबाबत अपशब्द; चाकूने वार करून गुन्हेगाराची हत्या

8

🔹इमानवाड्यातील जाटतरोडी येथील घटना

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(29 जून):बहिणीबाबत अपशब्द बोलल्याने दोघांनी चाकूने वार करून गुन्हेगाराची हत्या केली. ही थरारक घटना इमामवाड्यातील जाटतरोडी परिसरात रविवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण असून, पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. गिरीश देवराव वासनिक (वय ३१,रा. इंदिरानगर, जाटतरोडी), असे मृताचे तर अभिषेक बोरकर (वय ३०) व नीलेश अंबुडरे (वय ३०),अशी मारेकऱ्यांची नावे आहेत.
अभिषेक बोरकर व गिरीश मित्र होते. काही महिन्यांपूर्वी अभिषेक याने गिरीश याचा वैरी सचिन वासनिक याच्यासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे गिरीश संतापला होता. शनिवारी गिरीश याचा मित्र नीलेश हा कारागृहातून जामिनावर बाहेर आला. रविवारी नीलेश याने गिरीश याला अतुल भोयर याच्या घरी दारु प्यायला बोलाविले. तिघे दारु पित असतानाच अभिषेकही तेथे आला. सचिन याच्यासोबत हातमिळवणी केल्याने गिरीश याने अभिषेक याला शिवीगाळ केली. त्यानंतर बहिणीबाबत गिरीश हा अभिषेक याला अपशब्द बोलला. अभिषेक संतापला. त्याने गिरीश याला मारहाण करायला सुरूवात केली. गिरीश याने चाकू काढला. अभिषेक याला मारण्याचा प्रयत्न केला. अभिषेक याने गिरीश याच्या हातातील चाकू हिसकावला.त्यामुळे गिरीश घराबाहेर आला. अभिषेक याने गिरीश याला खाली पाडले. चाकूने गिरीश याच्या छातीवर सपासप वार केले. त्यानंतर दगडाने गिरीश याच्या डोके ठेचले. यावेळी अभिषेक याच्यासोबत नीलेश यानेही गिरीश याला मारहाण केल्याचे कळते. घटनास्थळीच गिरीश याचा मृत्यू झाला. दोघेही पसार झाले. घटनेची माहिती मिळताच इमामवाडा व गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून गिरीश याचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रवाना केला.