✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि 29 जुन):लॉकडाउनच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये कळमना, कॉटन मार्केट बंद होते. मालाला योग्य भाव मिळत नव्हता. पाच ते दहा रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटोची विक्री सुरू होती. परिणामत: शेतकऱ्यांनी स्वत:हून ट्रॅक्टर चालवित टोमॅटोचे पीक संपविले. आता स्थिती पूर्ववत झाली. असे असताना टोमॅटोचा प्रचंड तुटवडा निर्माण होऊन किरकोळ बाजारात प्रतिकिलो दर तब्बल ऐंशी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. दोनच दिवसांपूर्वी वीस रुपये किलो दराने मिळणारे
टोमॅटो अचानक एवढे फुगल्याने ग्राहकही चक्रावून गेले आहेत.
शहराची लोकसंख्या लक्षात घेता दररोज दहा ते बारा गाड्या टोमॅटोची आवश्यकता असते. एका गाडीमध्ये २५० ते ३०० क्रेट असतात. एका क्रेटमध्ये एकूण २५ ते २८ किलो माल असतो. सध्या टोमॅटोच्या दररोज तीन ते चार गाड्या येत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. व्यापारी आवश्यकतेनुसार टोमॅटो बोलवत आहेत. संगमनेर, चेन्नई येथून टोमॅटो येणे बंद झाले आहे.
स्थानिक टोमॅटो उत्पादकांनी स्वत:च माल संपविला आहे. त्यामुळे मदनपल्ली, बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक होत आहे. ठोक बाजारात दहा किलो टोमॅटो घेतल्यास पन्नास रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे. कॉटन मार्केटमध्ये टोमॅटोची विक्री साठ रुपये प्रतिकिलो आहे. तर शहरातील विविध भागांमध्ये भरणारे आठवडी बाजार, लहान बाजारपेठ आणि दारावर येणारे ठेलेवाले ऐंशी रुपये प्रतिकिलो दराने विक्री करत असल्याची माहिती महात्मा फुले सब्जी बाजार आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली.
किरकोळ विक्रेत्यांचे गणितच वेगळे
शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या भाजी बाजारातील किरकोळ विक्रेते दुप्पट-तिप्पट वाढ करून विक्री करतात. प्रत्येक ग्राहक कॉटन मार्केट वा कळमना येथे जाऊन भाजीपाला घेऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात दर कमी असला तरी त्यात कार्टेल (संगनमताने साखळी) करून दरवाढ केली जाते. परिणामत: ग्राहकांना अव्वाच्या सव्वा किंमतीत भाजीपाला खरेदी करावा लागतो.
या दरवाढीचा कुठलाही फायदा शेतकऱ्याला होत नाही. जो काही नफा होतो तो किरकोळ विक्रेत्याच्या खिशात जातो. सद्य:स्थितीत टोमॅटोसह काही भाजीपाल्यांचा तुटवडा असल्याने ऐंशी रुपये किलोने विक्री जोरात सुरू आहे. बाजाराशेजारील लोकवस्तीचा दर्जा पाहूनही किरकोळ विक्रेता नफ्याची मार्जिन ठरवित असतात. त्यामुळे सोमवारी क्वॉर्टर भाजी बाजारामध्ये साठ रुपयांत मिळणारी किलोभर भाजी गोकुळपेठेतील बाजारात ऐंशी ते शंभरच्या घरात मिळते.

किरकोळ बाजारातील प्रतिकिलो दर
टोमॅटो : ८० रुपये
कारले : ४० रुपये
चवळी शेंग : ४० रुपये
गवार शेंग : ४० रुपये
चवळी : ४० रुपये

पालक : ४० ते ६० रुपये
मेथी : ८० रुपये
ढेमस : ८० रुपये
पानकोबी : ६० रुपये
फुलकोबी : ८० रुपये

कृषिसंपदा, नागपूर, पर्यावरण, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ, हटके ख़बरे

©️ALL RIGHT RESERVED