धारूर येथील व्यापार्‍यावर प्राणघातक हल्‍ला, हात-पाय बांधून फेकून दिले

32

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.26एप्रिल):-धारुर येथील आडत व्यापारी- मारुतीराव गायके हे गंभीर जखमी, हातपाय बांधलेल्या आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने धारूर परिसरातील व्यापार्‍यांमध्‍ये खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, अशी व्यापारी वर्गातून मागणी होत आहे. व्यापाऱ्याला चोरीच्या उद्देशाने जबर मारहाण झाल्याची चर्चा आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी ( दि. २५) रात्री आडत व्यापारी मारुतीराव गायके हे केज येथे गेले होते.

रात्री उशिरापर्यंत परत आले नसल्याने नातलगांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी रात्री एक वाजण्याच्या सुमारास केज रस्त्यावर शोध घेतला. कासारी पाटीजवळ मारुती गायके यांची दुचाकी पडलेली दिसली. शोधाशोध केला असता काही अंतरावर हातपाय बांधलेल्या व गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत ते आढळून आले. मारुती गायके यांच्या पाठीवर व मांडीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. त्यांना तात्काळ धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. आटोळे यांनी सांगितले की, “व्यापारी गायके घरी परत आले नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला. केज रस्त्यावर कासारी पाटीजवळ ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. अद्यापही ते बेशुद्ध अवस्थेत असून तपास सुरु आहे.