दोन हजार आशा स्वयंसेविका व १३६ गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ

29

चंद्रपूर :
कोरोना काळात महत्त्वाची भमिका बजावणार्‍या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांची अनेक दिवसांपासून असलेली मागणी पूर्णत्वास आली आहे. या दोघांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आशांच्या मानधनात दोन हजार तर गटप्रवर्तकांना तीन हजार रुपयांची वाढ देण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दोन हजार चार आशा व १३६ गटप्रवर्तकांना मिळणार आहे.
कोविड-१९ मुळे राज्य सरकारने आर्थिक स्थिती नसताना देखील वित्तमंत्री अजित पवार यांनी या मानधन वाढीसाठी १५७ कोटी ७0 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. सप्टेंबर १९ मध्ये राज्यातील आशा, गटप्रवर्तकांनी संप केला होता, तत्कालीन सरकारने आशांना दोन हजार रुपए मानधन वाढ करण्याचा आदेश काढला होता. मात्र, त्याकरिता आर्थिक तरतूद केली नव्हती. तर गटप्रवतर्गकांना वाढीपासून वंचित ठेवण्यात आले होते. आयटक संलग्न आशा, गटप्रवर्तक संघटना व कृती समितीने ३ जुलै रोजी बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारला दिला होता. या पार्श्‍वभूमीवर शासनाने मानधनवाढ केली आहे. या मानधनवाढीचा लाभ राज्यातील ७२ हजार आशा व ३ हजार ५00 गटप्रवर्तक मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान ही योजना केंद्रातंर्गत असून आशा गटप्रवर्तकांना कामागारांचा दर्जा देऊन भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा लागू करण्याचे आश्‍वासन दिले होते. कोविड १९ मध्ये आरोग्य कर्मचार्‍यांसोबत आशा व अंगणवाडी कर्मचारी जनतेला उत्तम सेवा देत आहे. असे असताना अधिवेशनात आशा, गटप्रवर्तकांना लाभ देण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने आशा स्वयंसेविकांना दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, मागणी आयटक संघटनेचे पदाधिकारी, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी केली आहे.