कामगारांचा हक्काचा दिवस १ मे

28

१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. १९ व्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातील कामगारांना रोजगार मिळू लागला. रोजगार मिळाला पण कामगारांची पिळवणूक मात्र वाढली. कोणत्याही सुविधान न देता तुटपुंजी मजुरी देत कामगारांना १२ ते १४ तास राबवून घेण्यात येऊ लागले. त्यामुळे कामगारात असंतोष निर्माण झाला. या असंतोषातूनच कामगार एकत्र आले व कामगार संघटनांची निर्मिती झाली. या संघटनांनी कामगारांची पिळवणूक थांबवण्यासाठी काही ठराव केले. त्या ठरावात केलेल्या प्रमुख मागण्या…

१) कायद्याने आठ तासांचा दिवस
२) लहान मुलांना कामावर लावण्यास बंदी
३) महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४) रात्रीचे व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५) कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६) कामाचा मोबदला वस्तूरूपाने न देता नगद द्यावा
७) समान कामासाठी समान वेतन

या मागण्या २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून करण्यात आल्या. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका व कॅनडातील संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे व धरणे आंदोलनाची सुरवात केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी झालेल्या गोळीबारात १ आंदोलनकारी ठार झाला. त्याचा निषेध म्हणून जगभरातील कामगार संघटना रस्त्यांवर उतरल्या. त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला. यात ८ पोलीस मृत्यू पावले, तर ५० पोलीस जखमी झाले. या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८८९ रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने पॅरिस येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केली. त्या परिषदेत १ मे १८९० हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत १ मे हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. तेंव्हापासून १ मे हा जागतिक कामगार दिन म्हणून जगभरात उत्साहात साजरा केला जातो.

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय ऐक्याचा, स्वातंत्र्याचा, मानवाकडून मानवाचे होणाऱ्या पिळवणुकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला आहे. १९०५ च्या १ मे या कामगार दिनाच्या पत्रिकेत लेनिनने लिहिले आहे, ” कामगार – कामगारात, राष्ट्रा – राष्ट्रात, धर्मा – धर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटारुंचा आणि जुलूमशहांचा फायदा होतो. कारण ते कामगार वर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवरच जगत असतात. ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीडिश, आर्मेनीयम आणि तातार, पोलिश आणि रशियन, लॅटिन आणि जर्मन असे सारे भेदभाव विसरून समाजवादाच्या झेंड्याखाली आपण सारे आगेकूच करूया. सर्व देशातील कामगारांची ही ऐक्य शक्ती आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती १ मे ला आपल्या दलाची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बळ संघटित करते.” लेनिनचा हा विचार घेऊन जगभरातील कामगार संघटना आज मार्गक्रमित करीत आहेत. आ

ज जगभरातील कामगार संघटनांपुढे नवे आव्हाने आहेत.जागतिकीकरणाची लाट व २१ व्या शतकातील कामगारांचे प्रश्न, बदललेली परिस्थिती, मस्तवाल झालेले भांडवलदार या नव्या आव्हानांचा मुकाबला कामगार संघटनांना करावा लागणार आहे. काळाचे हे आव्हान कामगार संघटनांनी स्वीकारले पाहिजे. जनतेच्या जगण्याला व कामगारांच्या हक्काला मिळालेले हे आव्हान आहे. याचा मुकाबला संघटित व असंघटित कामगारांच्या एकजुटीनेच होऊ शकतो. कामगार एकजुटीचा विजय असो! जगभरातील कामगारांना कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५