महिला तलाठी चंदाताई ठाकरेंना मिळाला आदर्श तलाठी पुरस्कार

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.2मे):-चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपूरी तालूक्यातील चौगान या साजाच्या महिला तलाठी चंदाताई ठाकरे(राऊत) यांना यंदाचा आदर्श तलाठी पुरस्कार दि.१ मे 2022 ला महाराष्ट्र दिनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला . मान्यवरांच्या उपस्थितीत (पाच हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देवून) सन्मानित करण्यात आला.

ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के ,तहसीलदार उषाताई चौधरी व मंडळ अधिकारी नरेश बोधे यांचे मार्गदर्शनाखाली महिला तलाठी चंदा ठाकरे यांनी सन 2021-22 या वर्षात
मुदतपूर्व शासकीय वसुलीचे 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण करून तब्बल 65 अतिक्रमण प्रकरणे शोधून नियमानुकुल करण्यास प्रस्ताव पाठवले व ती अतिक्रमणे नियमाकुल करण्यात आली.

या शिवाय गरजू लाभार्थींना पट्टे मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. एव्हढेच नाही तर शेतकरी व विद्यार्थी यांचे सोबत त्यांची नेहमीच सौजन्यपूर्वक वागणूक राहिली आहे. एक आदर्श महिला तलाठी म्हणून ब्रम्हपुरी तालुक्यात चंदा ठाकरे यांची ओळख आहे. विशेष म्हणजे आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त झालेल्या चंदाताई ठाकरे या प्रथम महिला तलाठी आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करून कौतुक केले जात आहे.