प्रत्यक्ष अनुभवाचे महत्त्व

व्यक्ती आपल्या जीवनात आयूष्यभर काहीतरी शिकत असतो. व्यक्तीची ही शिकण्याची प्रक्रिया वाचन, मनन, चिंतन या क्रियांमधून घडत असते. आपण कळत नकळत काहीतरी शिकत असतो.आपणाला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपण यशस्वी होण्यासाठी करत असतो. पण आपणाला मिळालेले बहूतांश ज्ञान हे केवळ ऐंकीव , वर्णनात्मक असते. अशावेळी मग आपणाला एखाद्या गोष्टीचे ज्ञान किंवा समस्येचे उपाय माहीत असूनही माञ आपणाला ते वापरता येत नाही.त्यामुळेच मग आपण अयशस्वी होतो.यावरचा उपाय म्हणजे आपणाला असलेल्या ज्ञानाची प्रत्यक्ष पडताळणी घेणे म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव घेणे महत्त्वाचे असते.ज्याप्रमाणे कोणत्याही शास्त्रामध्ये सिद्धांतांची मांडणी करतांना अगोदर मिळालेल्या माहीतीची पडताळणी प्रयोगातून किंवा प्रत्यक्ष अनूभव घेऊन केली जाते आणि नंतर सिद्धांतांची निर्मिती होते.म्हणजेच कोणत्याही ठिकाणी यशस्वी होण्यासाठी मिळालेल्या माहितीचे प्रत्यक्ष अनुभव घेणे महत्त्वाचे असते.

एकदा शिक्षक म्हणून कार्यरत असतांना नवोदय परिक्षेकरीता पहील्यांदा पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली.माझी पहीलीच वेळ असल्यामुळे मला फार गोंधळल्या सारखे वाटत होते. सहकारी शिक्षक मिञांनी तसेच परिक्षेच्या प्रमुखांनी परिक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन बैठकीचे आयोजन केले. त्यात माझ्या शंकांचे निरसन झालं आणि दडपण कमी झाले.तरीही मनात माञ एक भीती जाणवत होती.कारण मार्गदर्शन करतांना केवळ वर्णनात्मक माहीती मिळाली होती.त्या मिळालेल्या ऐकीव माहितीच्या आधारे मला परिक्षा योग्य पणे पार पाडायची होती. परिक्षेच्या दिवसी मिळालेल्या माहितीचा मी प्रत्यक्षपणे वापर केला आणि मला अनुभव आला. परिक्षेची जबाबदारी सुरळीत व योग्यपणे पार पाडली.आता माझ्या मनातील परिक्षेची भीती आपोआपच नाहीशी झाली होती.

आपल्या जीवनात आपणाला एक व्यक्ती म्हणून विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. त्या भूमिका पार पाडतांना आपण पुष्कळ वेळा सुरूवातीला अयशस्वी होतो माञ नंतर जेव्हा आपण पुन्हा प्रयत्न करतो तेव्हा माञ यशस्वी झाल्याशिवाय आपण राहत नाही .कारण आपणाला प्रत्यक्ष अनुभव मिळालेला असतो.म्हणूनच जीवनात वर्णनात्मक माहिती सोबतच प्रत्यक्ष अनुभवही महत्वाचे आहे. याचं एक उदाहरण सांगतो, लहानपणीची गोष्ट आहे साधारणतः चौथ्या पाचव्या वर्गात शिकत असतांनाची. घरी टिव्ही नसल्यामुळे घरापासून खूप लांब अंतरावर असलेल्या एका व्यक्तीच्या घरी सर्व मोहल्ल्यातील मुले टिव्ही बघायला जायचे.सर्व मिञ मंडळी आणि मोठे व्यक्तींसोबत आठवड्यात एखाद्या दिवसी मी सुद्धा टिव्ही बघायला जायचो.गावातील एका विवाहित महीलेची हत्या झालेली होती आणि संपूर्ण गावभर अफवा उडाली होती की, ती बाई राञी 12 वाजेनंतर स्वतःच्या घरापूढे केस मोकळे सोडून मोठ्याने ओरडत असते.तिच्यामूळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मलाही खूप भीती वाटत होती आणि त्या महिलेचे घर ओलांडूनच आम्हाला टिव्ही बघायला जावे लागत असे.टिव्ही बघायला जाण्यासाठी सोबतीला बाकीचे जेष्ठ लोक व मित्र मंडळी असल्यामुळे मला भीती कमी वाटायची. एके दिवसी नेहमीप्रमाणे मी टिव्ही बघायला गेलो असता, टिव्ही बघता बघता मी झोपी गेलो. माझ्या सोबतचे सर्व मिञमंडळी मला तिथेच झोपलेला सोडून आपापल्या घरी परतले होते. मला जाग आली तेव्हा जळपास राञीचे एक वाजले होते. मी स्वतःला तिथे एकटा बघून घाबरून गेलो होतो. घरी जर गेले नाही तर सकाळी वडीलांचा मार नक्कीच पडणार याची खाञी होती.मार वाचण्यासाठी मी घरी परतण्याचा निश्चय केला.इकडे मनात भुताच्या त्या अफवेने काहूर माजवली होती मी पूर्णपणे हादरलो होतो.मी जायला निघालो आणि धावत पळत सुटलो त्या भुताटकीचं घर जवळ येताच भीतीचे शहारे माझ्या अंगावर येवू लागले.मी भीतीनं कापत होतो आणि कसलाही विचार न करता वेड्याप्रमाणे धावत सूटलो आणि एकदम बाबांच्या अंथरूणावर जाऊन पडलो. राञभर मनात एकच विचार येत होता आता कधीही टिव्ही बघायला जायचं नाही.
माञ दिवस उजाळताच मनातील भीती कमी झालेली होती मी दोन तीन दिवसांनी मी त्या भुताटकी घराबाहेर जाऊन निरीक्षण केल. माझ्या मनातील भीती आता पूर्णपणे दूर झालेली होती. यानंतर जेव्हा कधी मी टिव्ही बघायला जायचो आणि यायचो तेव्हा सर्वात समोर मीच असायचो.

कारण मला आता प्रत्यक्ष अनुभव आलेला होता की भूत प्रेताच्या कथा ह्या निव्वळ कल्पना असतात. हे मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाने शिकवले होते. अशाप्रकारे जीवनात आपणाला प्रत्यक्ष अनुभवच खर्‍या अर्थाने शिकवत असतात तसेच घडवत असतात.

✒️अरविंद आर. टिकले(राष्ट्रीय विद्यालय भिवापूर)मो:-9623904726

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED