गेवराई तालुक्यात ‘सनस्ट्रोक’च्या रूग्णांमध्ये वाढ

28

🔸कामाशिवाय बाहेर पडू नका, उन्हात जाताना पुरेशी काळजी घ्या, डॉ. राम दातार यांचे आव्हान

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.3मे):- तालुक्यात उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे. वाढलेल्या तापमानाचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. उन्हाच्या काहिलीमुळे नागरिक हैराण झाले असून सनस्ट्रोकमुळे रुग्णालयात रूग्णांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, कामाशिवाय बाहेर पडू नका, उन्हात जाताना पुरेशी काळजी घ्या, असे आवाहन डॉ. राम दातार यांनी केले आहे. सकाळी दहा वाजताच उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानाची सरासरी वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून उन्हाच्या अशा तीव्र झळा नागरिकांनी अनुभवल्या नाहीत. परिणामी सरकारी, खासगी रूग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. कामानिमित्त, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमांसाठी हजेरी लावावी लागते. वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांना हलका ताप, चक्कर येणे, डोकेदुखी, जुलाब याचा त्रास होऊ लागला आहे. दुचाकीस्वारांना उन्हाचे चटके सहन करून प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातील कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. कंदुरीचे कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू आहेत. गेवराई तालुक्यातील यात्रांना मोठी गर्दी असते. त्वरीता देवीच्या यात्रेला ही सुरुवात झाली आहे. भर उन्हात यात्रेत गर्दी दिसून येत आहे. मादळमोही, तलवडा , सिरसदेवी, उमापूर, चकलांबा, रोहीतळ, जातेगाव परिसरात मोठी यात्रा भरते. औरंगाबाद विभागात ४२ अंशावर तापमान गेले आहे, असे असले तरी यात्रेत, कंदुरीच्या कार्यक्रमात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

उन्हात जाण्याच्या आधी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, कान, डोके पांढर्‍या शुभ्र रुमालाने झाकून घेऊन उन्हापासून बचाव करावा. शक्यतो घराबाहेर पडू नका. उन्हातून घरी आल्यास लगेच साधे किंवा थंड पाणी, थंड पेय पिऊ नका. उन्हाच्या त्रासामुळे काही तक्रारी जाणवल्यास लगेच डॉक्टरांना भेटा.

– डॉ. राम दातार