गोंडवाना विद्यापीठाच्या सीनेट निवडणुकीसाठी नोंदणीत पदवीधरांनी सहभागी व्हावे-सीनेट सदस्य अजय काबरा यांचे पदवीधरांना आवाहन

50

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.4मे):-गोंडवाना विद्यापीठ निर्मितीनंतरची दूसरी सिनेट निवडणूक होऊ घातलेली आहे. त्यासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली असून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेक संघटनांनी नव्याने नोंदणी सुरु केली असल्याचे चित्र आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पदविधरांनी या निवडणूकीसाठी स्वतःची मतदार म्हणून नोंदणी करून आपण जवाबदार नागरीक असल्याचा परिचय द्यावा असे आवाहन सिनेट सदस्य तथा अभाविप प्रणीत आघाडीचे जिल्हा संयोजक अजय रमेशचंद्रजी काबरा यांनी केले आहे.गोंडवाना विद्यापीठ निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री मान. आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून व अथक प्रयत्नातून साकारण्यात आलेले गोंडवाना विद्यापीठ यावर्षी १० वर्ष पूर्ण करीत असून विकासाच्या वाटेवर अग्रेसर होत आहे.

आदिवासी व जंगलव्याप्त या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात गडचिरोली व चंद्रपुर हे दोन जिल्हे येतात . झाडीपट्टी रंगभूमी , वनौषधी व आदिवासी कलागुणांना वैभव प्राप्त करुन देण्यासाठी व रोजगार प्राप्त करुन देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाची भुमिका आगामी काळात महत्वपुर्ण असणार आहे. यादृष्टीने येणारी सीनेट निवडणुक व त्यात निर्वाचित सीनेट सदस्य यांचा अभ्यासपुर्ण वाटा गरजेचा व दिशादर्शक ठरणार आहे. २०१७ मध्ये गोंडवाना विद्यापीठ अधिसभेची पहिली निवडणूक पार पडली . परंतु त्यावेळी फक्त ११०१९ मतदार नोंदणी झाली होती . सुशिक्षितांचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणूकीत केवळ अकरा हजार मतदार नोंदणी असणे म्हणजे एकप्रकारे पदवीधारकांची अनास्थाच समजावी लागेल.

विद्यापीठात विविध विद्याशाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भेडसावणारे शैक्षणिक प्रश्न व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विद्यापीठात १० सीनेट सदस्य नोंदणीकृत पदवीधारकांकडुन निवडले जातात . त्यामुळे आपले सक्षम प्रतिनिधी विद्यापीठात पाठविण्यासाठी मतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे . या अनुषंगाने जास्तीत जास्त पदवीधरांनी आपली नोंदणी करून सहभाग नोंदवावा यासाठी शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून नोंदणी सुरु आहे .
नागपूर विद्यापीठाचे २०१३ पर्यंत तसेच गोंडवाना विद्यापीठाचे २०२१ पर्यंत पास झालेले पदवीधर या निवडणुकित मतदार म्हणून पात्र ठरणार आहेत. त्यामुळे यासाठी पात्र पदवीधारकांनी नोंदणीसाठी अभाविप कार्यकर्त्यांकडे आपली डिग्री व आधारकार्डसह संपर्क साधावा असे आवाहन सिनेट सदस्य अजय काबरा यांनी केले आहे.