युवकांनो, ‘त्यांच्या’ साठी नको, ‘स्वतः’ साठी भांडा.. -चंल

28

संपूर्ण देशात सध्या भोंग्या-पोंग्याचे राजकारण सुरु आहे. पक्षीय नेते आपल्या पगारी घरगड्यासारखे देशातील युवकांना आदेश देत आहेत. धर्माची काळजी दाखवत आहेत. परंतु जो नेता तुमची, तुमच्या भविष्याची काळजी करेल, त्याबद्दल सरकारशी भांडेल त्याच नेत्याच्या मागे युवकांनी जाण्यात अर्थ आहे.

देशातील सर्व प्रश्न जणू सुटले आहेत आणि आता फक्त धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढणे हाच देशातला एकमेव प्रश्न बाकी असल्यासारखे वातावरण तयार करण्यात येतंय. कोर्टाने आदेश दिला धार्मिक स्थळांवरील भोंगे काढा. सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे काढलेच पाहिजेत या मताचा मी आहे. परंतु सध्यस्थितीत हा भोंग्यांचा विषय अजिबात महत्वाचा नाही. कोणत्या विषयाला आपण प्राधान्य दिले पाहिजे हे आजच्या युवकांनी लक्षात घेतलं की सर्वपक्षीय राजकारण्यांची बघा कशी गोची होते. भोंगे काढण्यात यावेत हे सांगण्यासाठी लाखो रुपये खर्चून औरंगाबादला सभा घेण्यात आली. राज ठाकरे म्हणाले, ‘भोंगे काढा, तिच्या मायला होऊनच जाऊ द्या एकदा.’ राज ठाकरेंना बोलायला काय जातंय हो? बाकी हिंदुत्ववादी सोडा आपण फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांचा विचार करू. एक तर मनसैनिकांची कधीच सत्ता नव्हती, अजून पुढेही संधी दिसत नाही. कोणते महामंडळ नाही. कार्यकर्त्यांची कमाई नाही. बहुतांश कार्यकर्ते स्वतः च्या खिशातून पक्ष चालवत आहेत. आधीच २ वर्षांच्या भीषण लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्यांचे जमा होते नव्हते ते सर्व गेले. प्रचंड हाल झाले. त्यातून आता कुठे सावरत आहेत तर हे नेते सुचू देत नाहीत. राज ठाकरेंवर गुन्हे दाखल झाले त्यांच्यासाठी १०० वकील तयार राहतील. उद्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले, कोण येणार? कोण खर्च करणार? सगळं आपल्या घरच्यांना करावे लागणार.

केसेस लागल्या तर नोकऱ्यांमध्ये अडचण येईल, परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळणार नाही ह्यासुद्धा अडचणीं आहेतच. राज ठाकरेंच्या हजार कोटींच्या संपत्तीतून होतील काही लाख खर्च, पण आपलं काय? राज ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव भोंगे काढायला येणार नाहीत पण त्यांच्या आदेशापायी ह्या बिचाऱ्यांचे हाल होणार. हा विचार करून अस्वस्थ होतं.राज्यात दंगे भडकून त्यात कार्यकर्त्यांचे जीव गेले तर त्याला जबाबदार कोण? मनसैनिकसुद्धा महाराष्ट्राची अस्मिता जपणारेच लोक आहेत, परंतु त्यांनासुद्धा इतर महाराष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या दावणीला बांधण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आहे.

अगोदर राज ठाकरे यांची भले राजकारणात अपयशी ठरले असतील परंतु महाराष्ट्राची अस्मिता बाळगणारा हिंमतवान नेता अशी प्रतिमा होती. वाटत होतं की कुणी कितीही दबाव आणला तरी हे दबणार नाहीतच कधी. बाकी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याशी राजकारणापायी वाद होत राहतील, परंतु महाराष्ट्राची अस्मिता हा माणूस सोडणार नाही. पंरतु भ्रमनिरास झाला. इडी-आय टीला घाबरून हा माणूस स्वतः च्याच दोन वर्षांपूर्वीच्या भूमिकेपासून इतका मोठा यु टर्न घेईल असा विचारही केला नव्हता. संपत्ती राज ठाकरेंची, त्यावर टाच आणणार केंद्र सरकार आणि राज ठाकरेंची संपत्ती वाचविण्यासाठी कामाला कुणाला लावत आहेत तर सर्वसामान्य हिंदू युवकांना. हे असे फालतू कामासाठी हिंदू युवकांना वापरून घेतांना ह्यांना हिंदुत्व आठवत नाही? प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतोच, तो असावा, परंतु कोणताही धर्म दुसऱ्या धर्माच्या छातीवर बसून आपला धर्म मांडायला सांगत नाही.

विरोधी पक्षनेते फडणवीसांनी सुद्धा मुंबईत लाखो रुपये खर्चून सभा घेतली. कर्कश आवाजात अक्षरशः किंचाळतच त्यांनी आपले भाषण संपविले. या भाषणात बाबरी पाडताना मी होतो, शिवसैनिक नव्हते वगैरे गोष्टी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच सांगितल्या. संपूर्ण भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरचा निशाणा साधला, त्यांची १५ वेळा आठवण काढली, पण शरद पवारांचे एकदाही नाव घेतले नाही. तिकडे राज ठाकरेंनी भाषणात १५ वेळा शरद पवारांचे नाव घेतले, पण उद्धव ठाकरेंचे एकदासुद्धा घेतले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे फडणवीसांची सभा संपल्यानंतर १० मिनिटांनी इकडे राज ठाकरेंनी आपली सभा सुरु केली. म्हणजे हे सर्व ठरवून केल्यासारखे वाटले. बरं, करा. करायलाच पाहिजे. हे राजकारण आहे. ह्यात आरोप प्रत्यारोप होतच राहतात. परंतु ह्या दोन्ही सभांचे समान वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरे आणि फडणवीस या दोघांनीही एका शब्दाने देशातील महागाई, बेरोजगारी, कोळसा टंचाई व त्यामुळे निर्माण झालेली विजेची टंचाई, देशभरात रद्द करण्यात आलेल्या ५७० ट्रेन, डिझेल -पेट्रोल दरवाढ, ढासळती अर्थव्यवस्था, क्षुल्लक दरात रोज विकल्या जात असलेल्या सरकारी कंपन्या याबद्दल चकार शब्द काढला नाही. भोंग्यांना प्राधान्य दिलं ठीक आहे पण देशात इतर कोणतेच प्रश्न नव्हते ज्यांचा तुम्हाला साधा उल्लेखसुद्धा करावासा वाटला नाही?

ह्यांना आपल्या समस्यांशी काहीच घेणेदेणे नाही मग आपण का ह्यांच्या भडकावण्याला बळी पडायचं? चला, यांनी बेरोजगारीवर हल्लाबोल केला आणि रोजगार संधी निर्माण करण्यास सरकारला भाग पाडले. महागाई वर सरकारला तोडगा काढायला लावला. कोळसा टंचाईमुळे होणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना केल्या. पेट्रोल-डिझेल, सिलिंडरचे दर सरकारला कमी करायला भाग पाडले. तर सर्वसामान्य लोक स्वतः हुन तुमचं ऐकतील. पण तसलं काहीच न बोलता फक्त स्वतः च्या सोयीचे राजकारण होणार असेल तर सर्वसामान्यांनाही आपली सोय बघावी लागेल ना?

ह्या घडत असलेल्या घटनांचा बारीक विचार केला की, लक्षात येतं की देशाला कसे बेमालूमपणे अराजकतेकडे नेले जात आहे. सरकारी कंपन्या विकून आणि काही मोजक्याच उद्योगपतींच्या हातात देशाच्या आर्थिक नाड्या देऊन येथे बेरोजगारी हेतुपुरस्सर वाढू दिली गेली. बरोजगारीची वाढ माहिती पडू नये म्हणून बेरोजगारीचे आकडेच देणे बंद केले. महागाई ने लोकांचे जगणे मुश्किल केले. दांभिक धर्मवाद निर्माण केला गेला. मुस्लिमांविषयी द्वेष पेरणे सुरु केले. हिंदू अस्मिता-संस्कृतीच्या नावाने धार्मिक कट्टरता पेरली गेली. आता ह्या कट्टरवाद्यांना त्यांच्या एका इशाऱ्यावर नाचविण्यासाठी जसे पाहिजे तसे कच्चे मटेरियल तयार होत आहे. हे कच्चे मटेरियल म्हणजेच महागाईने कंटाळलेला आणि काहीही काम-धंदा नसलेला, एका विशिष्ट धर्माचा द्वेष करणारा कट्टरवादी -बेरोजगार युवक. ह्या युवकांना आता पाहिजे तसे धर्माच्या नावाने वापरले जाईल. या युवकांना त्यांच्या जाळ्यात फसू न देणे हीच आपली जबाबदारी आहे.

राज ठाकरेंनी काल पत्रकार परिषदेत जसे सांगितले की, हे आंदोलन ३६५ दिवस चालणार आहे. जोपर्यंत मस्जिदीवरचे भोंगे निघणार नाहीत तोपर्यंत त्याच्या दुप्पट आवाजात तिथेच हनुमान चालीसा म्हटली जाईल. इतकी ताकद, ऊर्जा, जोखीम जर सर्वसामान्य हिंदूंच्या प्रश्नांकरिता खर्च केली तर? तसाच हा समाज ह्यांच्या मागे जाईल. जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल डिझेल वरचा टॅक्स कमी करत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून भोंगे वाजवणार, बेरोजगार हिंदूंसाठी रोजगारांची निर्मिती या केंद्र आणि राज्य सरकारने करावी याकरिता ३६५ दिवस आम्ही आंदोलन करू असे हे लोक बोलत नाहीत. ते बोलत नाहीत पण आपल्यालासुद्धा महागाई-बेरोजगारीपेक्षा भोंगे-पोंगे महत्वाचे वाटतात हे दुःखद आहे. तुमचा दोन वर्षांपूर्वीचा महिन्याचा किराणा, सिलिंडर आणि पेट्रोल चा बजेट काय होता आठवा, आणि आजचा बजेट बघा म्हणजे फरक लक्षात येईल.
बरं, हे राज्य सरकारसुद्धा अश्यांना बोलण्यासाठी स्वतः हुन संधी उपलब्ध करून देते असेच कधीकधी वाटते. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश प्रत्येकच राज्याला बांधील असतो. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत तर राज्य शासनाने सर्व धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढून टाकायचे. आणि लगेच भाजपशासित राज्यांमध्ये भोंगे का काढले जात नाहीत अशी संधी घ्यावी. पण नाही. देशातील मीडिया राज्यातील विरोधी पक्षाला जितके महत्व देतोय तितकेच महत्व जर केंद्रातील विरोधी पक्षाला दिले तरी देशात खूप मोठा फरक पडू शकतो, परंतु अशी अपेक्षा करणे याकाळात व्यर्थ आहे.

कधीकधी असं वाटतं की, भाजपला महाराष्ट्रातच सगळ्या सुधारणा, कायद्यांची अंमलबजावणी, सुव्यवस्था पाहिजे आहे, अरे बाबांनो आधी आपले सरकार ज्या ज्या राज्यांमध्ये आहे तिथे ह्या मागण्या करा नंतर महाराष्ट्रात करा. भाजप चे सरकार असलेल्या गुजरात-मध्य प्रदेशात ही भोंगे काढण्याची मागणी भाजप वाले करत नाहीत. मागेसुद्धा महाराष्ट्रात गाईचे मांस बंद करा म्हणून भाजपने ओरड केली आणि भाजप शासित गोव्यात सर्रास गाईचे मांसविक्री सुरू होती आणि अजूनही आहे. एक आणखी आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राची तुलना वारंवार उत्तर प्रदेश सोबत केली जात आहे. कशाच्या बाबतीत तर भोंगे काढण्याच्या बाबतीत. अहो, रोजगाराच्या बाबतीत करा, विकासाच्या बाबतीत करा. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत करा. तिथले लाखो मजूर महाराष्ट्रात येतात महाराष्ट्रातले तिथे का जात नाहीत याबद्दल तुलना करा. ती तुलना हे कधीच करणार नाहीत. जितके प्रयत्न महाराष्ट्र पेटविण्यासाठी होत आहेत त्याच्या अर्धे प्रयत्न उत्तर प्रदेश पेटविण्यासाठी झाले असते तर आतापर्यंत अर्धा उत्तर प्रदेश पेटला असता. उद्या भोंगे उतरतील, मग त्यानंतर पुढे काय? हिंदू-मुस्लिम दोन्ही धार्मिक स्थळावरचे भोंगे उतरवायला लावणार मग त्यांनी हिंदू धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढले म्हणून हे महाराष्ट्र सरकार हिन्दुद्वेषी आहे म्हणत पुन्हा भांडत राहणार. असेच फालतू प्रश्न घेऊन हे लोक तुम्हाला रस्त्यावर नाचवत राहणार.

राज्यकर्त्यांना सत्ता कशासाठी दिली जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, विरोधी पक्षाचे काम आहे सरकारला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास भाग पाडणे. पण हे महत्वाचे प्रश्न सोडून हे नेते आज सत्तेवर येण्यासाठी, सत्ता वाचविण्यासाठी, स्वतः ची संपत्ती-प्रतिष्ठा वाचविण्यासाठी किंवा आपल्या मालकांसाठी (नेत्यांसाठी) एकमेकांशी भांडत आहेत. त्यांना खुशाल भांडू द्या. या भांडणात आपल्याला बोलावलं असता एकच सांगा की, तुम्ही तुमच्या मालकांसाठी, स्वतः ची संपत्ती वाचविण्यासाठी तुफान भांडा, आम्हाला फक्त तेव्हा बोलवा जेव्हा तुम्ही आमच्यासाठी (सर्वसामान्यांसाठी) भांडाल.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६