मध्य गोदावरी उपखोर्‍यातील पाणी गेवराई मतदार संघाला मिळण्याचा मार्ग मोकळा

30

🔸अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.6मे):-मध्य गोदावरी उपखोर्‍यातील पाणी वापराच्या बृहत आराखड्यात गेवराई तालुक्यातील ११ प्रकल्पांचा समावेश करावा यासाठी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी गेवराई तालुक्याचा समावेश बृहत आराखड्यात करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मध्य गोदावरी उपखोर्‍यातील पाणी गेवराई मतदार संघाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही गेवराई तालुक्याला सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध करण्यासाठी आग्रह धरला.

मध्य गोदावरी नदीच्या उपखोर्‍यातील हक्काचे पाणी गेवराई विधानसभा मतदार संघाला मिळावे म्हणून सातत्याने अमरसिंह पंडित यांनी वेळोवेळी आवाज उठविला. तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात लवादाकडून पाणी उपलब्ध होवू शकले नाही. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून लवादाकडून १९.२८ टीएमसी पाणी मध्य गोदावरी नदीच्या उपखोर्‍यात उपलब्ध झाले मात्र काही जाचक अटीमुळे गेवराई तालुका या पाणी वापरापासून वंचित राहत होता. त्यामुळे माजी आ.अमरसिंह पंडित यांनी हक्काचे पाणी मिळावे यासाठी या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी शासनाकडे केली होती. बुधवार, दि.४ मे राजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये या बाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीला अमरसिंह पंडित यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.संजय दौंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर चव्हाण यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह धरला.

मारफळा, वाघदरा, अर्धमसला, तांदळा, भाटेपुरी, जातेगाव, सिरसदेवी, पौळाचीवाडी, चकलांबा, पाचेगाव व माटेगाव या अकरा ठिकाणी साठवण तलाव मंजुर करावेत, गोदावरी नदीपात्रातील पाणी बंद नलिकेद्वारे सिंदफणा नदीपात्रात सोडून सिंदफणा आणि गोदावरी नद्यांच्या खोर्‍यांच्या मधोमध भौगोलिक उंचवट्याचा योग्य वापर करून नविन कालवा प्रस्तावित करण्याची मागणीही माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केली. या नविन कालव्यामुळे यापूर्वीचे सर्व प्रकल्प व जुन्या सिंचन योजनांमध्ये पाणी सोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे गेवराई विधानसभा मतदार संघात हरितक्रांती होईल असेही पंडित यांनी सांगितले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील याप्रकरणी अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपस्थित अधिकार्‍यांना देवून पाणी वापराच्या बृहत आराखड्यात गेवराईचा समावेश करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे मध्य गोदावरीच्या उपखोर्‍यातील पाणी गेवराई विधानसभा मतदार संघाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले.