महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यास कटीबद्ध असलेली संघटना म्हणजे शिक्षक भारती – नवनाथ गेंड

32

🔸म.रा.प्रा. शिक्षक भारतीची चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा सहविचार सभा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7मे):-महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षक भारती संघटना अग्रेसर आहे.मंत्रालयीन स्तरावरचे सर्व प्रश्न शिक्षक भारती सोडवित आहे.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात आपण सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करु,असा आशावाद म.रा.प्रा.शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी व्यक्त केला. मूल येथील कर्मवीर मा.सा.कन्नमवार सभागृहामध्ये शिक्षक भारतीची चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांची सहविचार सभा म.रा.प्रा.शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.याप्रसंगी ते बोलत होते.सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर होते.

प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख,विभागीय उपाध्यक्ष संजय मेश्राम,राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष रावण शेरकुरे,गडचिरोली कार्याध्यक्ष रवींद्र गावळे,शिक्षक भारती जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख,अमरदीप भूरले,राजन्ना बिट्टीवार,यमाजी मुज्जमकर,राऊत,महिला संघटीका निर्मला सोनवने,आशा दाकोटे आदी उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,फातिमा शेख,साने गुरुजी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन सभेची सुरुवात करण्यात आली.

मार्गदर्शन करताना नवनाथ गेंड यांनी म्हटले की, शिक्षक भारती ही सर्व सामान्य शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत संघर्ष करणारी व शासन दरबारी सर्व प्रश्न कायदेशीर मार्गाने रेटून धरणारी एक मात्र संघटना आहे.शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात यापुढेही जुनी पेन्शन योजना असो वा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी शिक्षक भारती प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले.

देशात व महाराष्ट्रात शांतता नांदावी सर्व धर्मात व सर्व समाजात एकोपा निर्माण व्हावा हा विचार समाजात रुजावा या उद्देशाने साने गुरुजी लिखित खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेचे वाचन राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते व शिक्षक भारतीचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन केले .याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीदिनानिमित्त शंभर सेकंद स्तब्ध राहून राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.

चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे यांनी प्रास्ताविकेतून विविध मागण्या आपण शासन दरबारी सोडवाव्या, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे, शिक्षक भारती सर्व स्तरावरील शिक्षकांची संघटना आहे. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या प्रश्नांना आपण वाचा फोडूया,शिक्षक भारती आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्य जोमाने करुया असे आवाहन केले.गडचिरोली जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्या कथन केल्या.विजय मिटपल्लीवार यांनी सावली तालुक्यातील जगदीश चिकराम या मयत झालेल्या वस्तीशाळा शिक्षकाची सानुग्रह निधी मिळाली नसल्याचे सांगत राज्याध्यक्ष गेंड सरांना या बाबतीत अवगत केले.

सहविचार सभेचे अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये वस्ती शाळेचा प्रश्न, वेतनश्रेणीचा प्रश्न, विषय शिक्षकांचा प्रश्न, निवड श्रेणीचा प्रश्न, चटोपाध्याय चा प्रश्न, नक्षलग्रस्त तालुक्यांच्या समावेश करण्याचा प्रश्न,नक्सलग्रस्त भागात कार्यरत असेपर्यंत एकस्तरचा लाभ देण्यात संदर्भात त्यांनी शिक्षक भारती लढा देत असल्याचे सांगितले.या सहविचार सभेत खाजगी प्राथमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्षपदी राबिन करमरकर यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन नवनाथ गेंड यांनी स्वागत केले.शिक्षक भारतीचे वरोरा तालुक्यातील संतोष भरडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील शिक्षक भारतीचे पदाधिकारी सुनिल दुर्गे,विरेन खोब्रागडे,मारोती चाफले,मधुकर नैताम,सिंधू गोवर्धन,आशा दाकोटे,कुळमेथे आदींनी याप्रसंगी कविता,गीत गायन केले.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर शेरकी यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा संघटक विलास फलके यांनी केले. या सहविचार सभेला दोन्ही जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी,सर्व तालुक्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.सहविचार सभेच्या आयोजनासाठी जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर शेरकी, मूल तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे,छबन कन्नाके,विजय मडावी,केमदेव कुळमेथे,सिंधू गोवर्धन,हिरोज भोयर आदींनी अथक परीश्रम घेतले.