डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराचा समारोप

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.7मे):-आत्मरक्षा ही संकल्पना फार मोठी आणि विस्तृत आहे. या संकल्पनेत स्वतःच्या रक्षणासाठी करावयाच्या कृतीचे सिमाबंधन जगाच्या कोणत्याच पुस्तकात मांडलेल्या नाहीत. मात्र आत्मरक्षा या संकल्पनेचा परिचय प्रत्येक व्यक्तीला होणे हे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. या भावनेतून सध्याच्या असुरक्षित सामाजिक वातावरणात स्वतःचे संरक्षण प्रत्येक व्यक्तीला स्वतः करता यावे यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे 25 एप्रिल ते 4 मे दरम्यान महाविद्यालयात सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महिला अध्ययन व सेवा केंद्र, महिला तक्रार निवारण समिती आणि समाजशास्त्र विभाग मार्फत “आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराचे”आयोजन डॉ. स्निग्धा कांबळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

ह्या दहा दिवसीय शिबारामध्ये चंद्रपूर जिल्हा आष्ठेडू मर्दाणी आखाडा असोसिएशन मार्फत आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक सिहान-गणेश लांजेवार यांच्या मार्गदर्शनात लाठी-काठी, तलवारबाजी, कराटे अश्या विविध प्रकारे आत्मरक्षण करण्याचे कला कौशल्य विध्यार्थ्यांना शिकविण्यात आले.ह्या दहा दिवसीय शिबिराचा समारोप कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात, ‘आपल्या स्वतःच्या सुरक्षेबरोबर दुसऱ्यांची सुरक्षा सुध्दा तेवढीच महत्त्वाची आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने जागरूक असेल पाहिजे असे प्रतिपादन केले’. तसेच या शिबिरासाठी विशेष पुढाकार घेतलेल्या प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यानी आत्मरक्षा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असला पाहिजे, तसेच आत्मरक्षा प्रशिक्षणाचे धडे घेतलेल्या व्यक्तीचे शारीरिक,मानसिक आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढतो व हे सर्व झाल्याने व्यक्तीच्या व्यक्तीमत्व विकास होण्यासाठी फायदा होतो असे मत मांडले.

या कार्यक्रमाच्या वेळी मंचावर इंडिया चीफ एक्झामिनर सिहान- गणेश लांजेवार, प्रा. जे.एम. मेश्राम ,प्रा. शिलवंत रामटेके , उदयकुमार पगाडे , शिबिरास प्रशिक्षक म्हणून लाभलेले सेंसाई- सचिन भानारकर, सेंसाई- अक्षय कुळे, सेंसाई- मोहिनी भुते तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.या समारोपीय कार्यक्रमाचे संचालन प्रा. माला खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.योगिता रामटेके यांनी पार पाडले.