विकासकामे मंजुर करून आणतो म्हणूनच ठणकावून उद्घाटनेही करतो

44

🔹विजयसिंह पंडित यांचेकडून विरोधकांना टोला

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.8मे):- श्रेय घेण्याची आमदारांची विकृत वृत्ती आहे, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ढोंगी लोकप्रतिनिधी विकास कामे केल्याचा आव आणून जनतेची दिशाभूल करत आहेत, किमान जिथे निरापराधांनी जीव गमावले त्या जागी तरी घाणेरडे राजकारण न करण्याची सद्बुध्दी ईश्‍वर त्यांना देवो अशी सडकून टिका विजयसिंह पंडित यांनी केली. भोजगाव जोडरस्त्यावरील सुमारे एक कोटी रुपये किंमतीच्या पुल बांधकामाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. तालुक्यात सत्ता नसतानाही विकासाची कामे मंजुर करून आणतो म्हणूनच आम्ही कामाचे उद्घाटन करतो असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

गेवराई तालुक्यातील मौजे भोजगाव जोड रस्त्यावरील पुल अमृता नदीच्या महापुरात वाहून गेला होता. या घटनेत दोघां निष्पाप नागरीकांचा मृत्यु झाला होता, माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या विनंतीवरून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या कामासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजुर होताच आ.लक्ष्मण पवार यांनीही त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. शनिवार, दि.७ मे रोजी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी भोजगाव पुल बांधकामाचे उद्घाटन केले. यावेळी आपल्या भाषणात विजयसिंह पंडित यांनी आ.पवार यांच्या श्रेय वादावर खरपूस टिका केली. याप्रसंगी रा.काँ.पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, ह.भ.प.निंबाळकर महाराज, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, भरतराव खरात, नारायणराव नवले, गणपत राठोड, बळीराम खरात, राहुल खरात, गणेश वडघणे यांच्यासह आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनी जरी स्वतःची जबाबदारी झटकली असली तरी शिवछत्र परिवाराने ही जबाबदारी स्विकारून भोजगावकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न मार्गी लावला. विरोधक केवळ टिका करण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत. स्वतः निष्क्रीय असल्यामुळे आमचे नाव घेतल्याशिवाय त्यांचे भाषण पूर्ण होत नाही. भोजगाव पुलाचे काम दर्जेदार होणार असून पावसाळ्यापूर्वी हा पुल रहदारीसाठी उपलब्ध असेल असा विश्‍वासही त्यांनी आपल्या भाषणात दिला. माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्याचे कणखर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गेवराई विधानसभा मतदार संघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सिंचन आणि दळणवळण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे होत असल्यामुळे निष्क्रीय विरोधक एकत्र येवून आमच्यावर टिका करताना दिसत आहेत. परंतु जनता सुजान असून त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सुनिल देशमुख, दत्ता संत, नितीन संत, श्रीरंग संत, शिवाजी शिंदे, पद्माकर संत, पाराजी काळे, नंदु संत, अण्णासाहेब संत, रामदास पवार, दिनकर संत, मुक्ताराम दातार यांच्यासह पंचक्रोषीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भोजगाव ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते