पतसंस्था ही लोक चळवळ झाली पाहिजे – काकासाहेब कोयटे

26

🔹जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था चिमूरच्या इमारतीचे उदघाटन

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.9मे):- सहकारी पतसंस्थेतच पैशाची गुंतवणूक करा, पतसंस्थेत गुंतवणूक केल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल. पतसंस्था ही लोक चळवळ झाली पाहिजे. तीन वर्षात जिजाऊ पतसंसंस्था ही स्वतःची इमारत तयार करणारी माझ्या पाहणीतील महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे. कमी वेळात सदर संस्थेने चांगले उपक्रम राबविले. ही बाब अत्यंत उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन काकासाहेब कोयटे यांनी केले.

चिमूर जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था चिमूरच्या इमारतीचे उदघाटन समारंभात कोयटे बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सांगळे यांनी सांगितले की, विदर्भाने जसा महाराष्ट्र घडविला, जिजाऊंने शिवबाला घडवून महाराष्ट्र राज्याला न्याय दिला तसे जिजाऊ पतसंस्था विकास व उन्नती करेल. पतसंस्थेमार्फत नवनवीन उपक्रम व योजना राबवून कर्ज ज्याचेकडून वसूल होते त्यांनाच कर्ज दयावे.

यावेळी दहा व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सांगळे, उदघाटक महाराष्ट्र राज्य फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, प्रमुख अतिथी ठाणेदार मनोज गभने, सहकार निबंधक एस. बी. सहारे, कुशल व्यावसायिक सुनील मैद, श्यामजी बंग, आदर्श शिक्षक वसंतराव कडू, शाखा व्यवस्थापक कन्यका बँक, विवेक कमलाकर, जेष्ठ नागरिक संघाचे भीमराव ठावरी, पतसंस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी तसेच वसुली अभिकर्ता उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्था अध्यक्ष सुभाष शेषकर, संचालन डॉ. चंद्रभान खंगार यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. गजानन बन्सोड यांनी मानले. बहुसंख्य जणांच्या उपस्थितीत नवीन इमारतीचे उदघाटन सोहळा संपन्न झाला.