अपघातग्रस्त दांपत्याच्या मदतीसाठी अक्षय मुंदडा धावले; स्वतःच्या गाडीतून केले रुग्णालयात दाखल

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

अंबाजोगाई(दि.11मे):- बीड येथील नातेवाईकाचे लग्न आटोपून दुचाकीवरून लातूरला निघालेल्या दांपत्याचा केज तालुक्यातील कोरेगाव पाटी येथे अपघात झाला. योगायोगाने त्याचवेळी तिथून जाणारे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी अपघात पाहून गाडी थांबवली आणि तत्परतेने त्या जखमी दांपत्याला स्वतःच्या गाडीतून केजच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, जखमी दांपत्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

लातूर जिल्ह्यातील भोईसमुद्रा येथील नानासाहेब बाबुराव सालमे हे बीड मधीळ नातेवाईकाचे लग्न आटोपून पत्नीसोबत दुचाकीवरून लातूरला परत निघाले होते. वाटेत केज तालुक्यात कोरेगाव पाटी जवळ आले असता त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात नानासाहेब यांना जबर मार लागला तर पत्नी किरकोळ जखमी झाली. दरम्यान, याचवेळी तिथून जाणारे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी हा अपघात पाहिला. प्रसंगावधान राखून त्यांनी सहकारी अमोल पवार, महेश आंबाड, गौरव लामतुरे यांच्या मदतीने त्या जखमी दांपत्याला तातडीने स्वतःच्या गाडीतून केजच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि प्राथमिक उपचार मिळेपर्यंत लक्ष ठेवले. दरम्यान, जखमी दांपत्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED