लोकशाही कमजोर असलेले देश अराजकतेच्या वाटेवर!

102

श्रीलंका भारताचा शेजारी देश. निसर्गाचे भरभरून दान लाभलेला देश मात्र सध्या हा देश भयानक परिस्थितून जात आहे. श्रीलंकेत सध्या अराजकता माजली असून सत्ताधारी पक्षा विरुद्ध लोक रस्त्यांवर उतरून हिंसक आंदोलन करत आहे. हे आंदोलन इतके पेटले आहे की या आंदोलनात काही लोकांचा बळी गेला आहे. आंदोलक इतके क्षुब्ध झाले आहेत की ते पोलीस, लष्कर कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. श्रीलंकन नागरिकांचा रोष तेथील राजकीय नेत्यांवर आहे. त्यामुळेच ते राजकीय नेत्यांना लक्ष करत असून अनेक खासदारांच्या घराला नागरिकांनी आगी लावल्या असून पंतप्रधान महेंद्रा राजपक्षे यांचे घरही आंदोलकानी पेटवून दिले आहे.

पंतप्रधानांसह अनेक खासदार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी लपून बसले आहेत. नागरिकांना शांत करण्यासाठी पंतप्रधान महेंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे तरीही आंदोलक शांत होण्याच्या मनस्थितीत नाही. श्रीलंकेची आजची जी अवस्था झाली आहे त्याला तेथील राजकारणीच जबाबदार आहेत. त्यातही सत्ताधारी राजपक्षे घराणे हे श्रीलंकेच्या आजच्या दुरावस्थेला जबाबदार आहे. मागील पन्नास वर्षांपासून श्रीलंकेवर या राजपक्षे घराण्याचे वर्चस्व आहे. मागील काही वर्षांपासून या कुटुंबाने श्रीलंकेत प्रचंड भ्रष्टाचार केला असून श्रीलंकेतील महत्वाच्या पदांवर याच कुटुंबातील व्यक्ती आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे, पंतप्रधान महेंद्र राजपक्षे आणि अर्थमंत्री बासिल राजपक्षे हे तीन बंधू श्रीलंकेच्या महत्वाच्या पदांवर कार्यरत होते. सत्तेवर आल्यापासून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे चीनचे राष्ट्रपती शी जिनिपिंग यांच्या जवळ गेले आणि तिथेच श्रीलंकेचा घात झाला. गोटाबाया राजपक्षे यांनी चीनकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले. चीननेही श्रीलंकेमध्ये मोठी गुंतवणूक करतो असे भासवून श्रीलंकेला जादा व्याजदराने कर्ज दिले. पर्यटन हा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. श्रीलंकेला ७० टक्के महसूल पर्यटनातून मिळतो मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे श्रीलंकेचे पर्यटन ठप्प झाले आहे.

त्यामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोमात गेली. अर्थव्यवस्था डबघाईला आली त्यामुळे त्यामुळे महागाई वाढली जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले. जनतेला एकवेळेचे अन्न मिळणेही मुश्किल झाले असताना राजकीय पक्ष विशेषतः सत्ताधारी पक्ष मात्र सुस्त होते. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असा कोणताही निर्णय सरकार घेत नव्हते त्यामुळे जनतेच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि त्याचा परिणाम म्हणजे आज श्रीलंका आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. राजकीय पक्ष निष्क्रिय असेल तर त्याचा काय परिणाम होतो हे श्रीलंकेने जगाला दाखवून दिले आहे. आज श्रीलंकेत जे घडत आहे तेच नजीकच्या काळात पाकिस्तान आणि नेपाळमध्येही घडू शकते कारण तेथील सरकारनेही चीनच्या कच्छपी लागून चीनकडून भरमसाठ कर्ज घेतले आहे. हे कर्ज फेडण्याची क्षमता या देशांकडे नाही जर उद्या चीनने कर्ज फेडण्याचा तगादा या देशांकडे लावला तर कर्ज फेडण्यातच या देशाची गंगाजळी संपून जाईल आणि जनतेला एक वेळचे अन्न मिळणेही मुश्किल होईल. आजच या देशात महागाई गगनाला भिडली आहे जर ही परिस्थिती अशीच राहिली तर पाकिस्तान आणि नेपाळचाही भविष्यात श्रीलंका होऊ शकतो. भारतासोबतच स्वातंत्र्य झालेली ही राष्ट्रे आज अराजकतेच्या खाईत लोटली गेली आहेत. ज्या देशात लोकशाही कमजोर आहे व तेथील अर्थव्यवस्था जर जर्जर झाली असेल तर त्या देशात अराजकता निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तान आणि नेपाळची स्थिती यापेक्षा वेगळी नाही.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५