ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर ऊस गाळपासाठी प्रशासन जागे

30

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.13मे):-तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून देऊन आत्महत्या केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बुधवारी सायंकाळी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उसाचे पूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने चालू ठेवले जातील, शेतकऱ्यांनी संयम बाळगावा असे आवाहन केले. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात अतिरिक्त उसाबाबत विविध संघटनांकडून प्रशासन, राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग आली असून या अतिरिक्त उसाचे गाळप कसे करणार? असा प्रश्न उस उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

बीड जिल्ह्यात या वर्षी सुमारे ८० हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली. साखर कारखाने, कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यात कोणताही ताळमेळ नसल्याने नेमकी किती लागवड झाली, पाऊस पडेपर्यंत किती गाळप होऊ शकते? याची आकडेवारी जिल्हाधिकारीही देऊ शकते नाहीत. त्यामुळे सर्व पातळीवर गोंधळाची परिस्थिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येडेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात अतिरिक्त उसाबाबत कारखान्याने गाळप करावे, वाहतूक आणि साखर उताऱ्यातील तुटीला सरकार भरपाई देईल, अशी ग्वाही दिली होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत कारखाना, प्रशासनाच्या बैठका झाल्या. मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न सुटलेला नाही. साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेपेक्षा अधिक उसाची लागवड असल्याने आणि काही कारखान्यांनी फायद्यासाठी सभासद नसलेल्यांच्या उसाचे गाळप केले. जिल्ह्यातील सात साखर कारखाने सुरू असून पाऊस पडेपर्यंत या कारखान्यातून तीस लाख मेट्रीक टनांपर्यंत गाळप होण्याची अपेक्षा आहे. तरीही जिल्ह्यात आठ ते नऊ लाख मेट्रीक टन ऊस शिल्लक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.