साप्ताहिक पुरोगामी संदेशचे दहाव्या वर्षात पदार्पण !

38

                        ▪️विशेष संपादकीय▪️

साप्ताहिक पुरोगामी संदेशचा दहाव्या वर्षातील प्रथम अंक वाचकांपुढे सादर करताना अत्यानंद होणे स्वाभाविकच असले तरी गेल्या नऊ वर्षातील यातना शब्दात मांडणे कठीण आहे. ही आमची भावना वाचक, हितचिंतक, वर्गणीदार, जाहिरातदार समजून असल्याची जाणीव आम्हाला आहे.

स्वातंत्र चळवळीत महत्वपूर्ण भुमिका घेणा-या चिमूर (जिल्हा-चंद्रपूर) या क्रांतीनगरीतुन प्रकाशित होत असलेल्या साप्ताहिक पुरोगामी संदेशच्या उदघाटन (दि. १३ मे 2013) करते वेळी आमच्या मनात आनंदासोबतच डोळ्यात अश्रू होते. हा प्रसंग तत्कालीन कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना आठवत असेल. अभिनवतेची कास धरून नियमित (अखंड) अंक प्रकाशित करून नऊ वर्ष आज पूर्ण झाली आहे. याबाबत आम्हाला आनंद होत असतानाच भविष्यात आम्ही स्पर्धेत टिकु का?, हा संभ्रम कायम आहे. परंतु संभ्रमावस्थेत जगण्यापेक्षा स्पर्धा करायचीच नाही. “चालत राहायचे, मार्ग सापडेल” या आशेवर आम्ही ठाम आहोत. स्पर्धा कश्यासाठी? स्पर्धेमुळे प्रेरणा मिळण्याऐवजी ताणतणाव निर्माण होत असेल तर मूळ उद्धिष्ट आणि होणारे परिणाम यातील तारतम्य पुन्हा-पुन्हा एकदा तपासून पहायला हवे. स्पर्धेमुळे काही अंशी मूल्यमापन होते, हे खरे असले तरी शेवटी हे मूल्यमापन सापेक्षच असते. हे मान्य करायला हवे. कोणत्याही स्पर्धेत सहभागी असलेल्या स्पर्धकांमध्ये एखाद्याने प्रथम क्रमांक मिळविला, याचा अर्थ तो जगातील सर्वश्रेष्ठ ठरत नाही. त्याच्यापेक्षा अधिक क्षमता असलेली एक नव्हे तर अनेक व्यक्ती या स्पर्धेत उतरलेली नव्हती. या सत्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. “रस्ता कधीच चालत नाही, रस्त्यावर आपल्यालाच चालायचे आहे.” हा नियम / ध्येय आम्ही स्वीकारले आहे. समताधिष्टीत समाज निर्मितीचा ध्यास घेऊन साप्ताहिक पुरोगामी संदेश वाटचाल करीत आहे. गेल्या नऊ वर्षात वाचकांचा प्रतिसाद उदंड मिळत आहे. बदलत्या तंत्र ज्ञानामुळे वाचकांची अभिरुची सुद्धा बदलली असल्यामुळे लिखित माध्यमासोबतच दि. १७ जून २०२० पासुन www.purogamisandesh.in वेबसाईट सुरु केली आहे.

या वेबसाईटवर दररोज विविध बातम्या, घडामोडी, वैचारिक लेख समविष्ट करण्यात येत असतात. या डीजीटल नेटवर्क वेबसाईटच्या माध्यमातुन साप्ताहिक पुरोगामी संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचला आहे. डीजीटल सोबतच मुद्रित अंक सुद्धा आता वर्गणीदारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात जनतेची सेवा करीत आहे.

सन १९९३ पासुन विविध वृत्तपत्रात काम केल्यामुळे पत्रकारिता क्षेत्रांतील चांगले-वाईट अनुभव आमचे पदरी आहेत. शासकीय नियमाचे काटेकोर पालन व वाचकांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाचे शासकीय जाहिरात यादीत पुरोगामी संदेश समविष्ट आहे आणि आम्ही (संपादक) महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृत पत्रकार म्हणून कार्यरत आहोत.

साप्ताहिक पुरोगामी संदेश यापुढे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला-संस्कृती, साहित्य व अन्य रचनात्मक विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. वाचकांमधून लेखक, पत्रकार तयार कसे होतील यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो.

गेल्या नऊ वर्षात वाचक, वर्गणीदार, जाहिरातदार व हितचिंतकांच्या भरोश्यावर आम्ही यशस्वी वाटचाल केली आहे. साप्ताहिक पुरोगामी संदेशची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताचीच असताना वाचक, वर्गणीदार, जाहिरातदार व हितचिंतकांनी याबाबत आम्हाला जाणीव होऊ दिली नाही. यापुढेही उदार अंतकरणाने सर्वच साथ देतील अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ ठरणार नाही. आमच्या या प्रवासात ज्यांनी-ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांचे आभार (आभार हे परक्याचे मानायचे असतात, इथे तर सर्वच आपले आहेत!) मानून मोकळे होण्यापेक्षा त्यांचा ऋणात राहणे आम्हाला आवडेल.

✒️सुरेश दौलतराव डांगे(संपादक,साप्ताहिक पुरोगामी संदेश)
इ-मेल purogamisandesh@gmail.com
वेबसाईट-www.purogamisandesh.in

(साभार-साप्ताहिक पुरोगामी संदेश दिनांक 13 मे 2022)