क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या लेकीच्या पाऊल खुणा!

29

चंद्रपुरात ओबीसी महिलांचे तिसरे फुले-शाहु-आंबेडकरी साहित्य संमेलन थाटात झाले. यासाठी आम्ही आयोजक संध्या राजूरकर, स्वागताध्यक्ष ॲड डॉ अंजली साळवे विटनकर व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. याच बरोबर संमेलनाध्यक्ष अरुणा सबाने, उद्घाटक प्रो डॉ लक्ष्मण यादव आणि सहभागी पाहुणे, वक्ते आणि संमेलनाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करणाऱ्यांचे ही अभिनंदन करणे विसरता येणार नाही. हे सर्व आयोजक, नियोजक या संमेलना विषयी काय मत, विचार व दृष्टी बाळगून आहेत, याची आम्हाला कल्पना आहेच, असा समज कोणी ठेवू नये. प्रत्येक जणांचे आप- आपले आकलन, हित, विचार असतात. पण आम्ही या संमेलनाला ऐतिहासिक दृष्टीकोनातून बघतो. तो मन, मत परिवर्तनाचे गृहीत धरतो. कारण त्याची नाळ फुले-शाहु-आंबेडकर अशी स्पष्ट अधोरेखित आहे. त्यानुसार आम्ही वेध घेत विचार करतो. त्या आमच्या आकलनानुसार आम्ही असेच म्हणतो, अशा संमेलनाचा गेल्या तीन वर्षांपासून सिलसिला चालविणे व अखंड कायम तेवत ठेवणे, हा आमच्या दृष्टीने ऐतिहासिक तर आहेच शिवाय तो बहुजन समाजाच्या इतिहास लेखनात सुवर्णाक्षरांनी कोरलेला जाणार आहे. कारण ती कृती समग्र क्रांतीच्या एक एक करीत पडत असलेल्या दमदार पाऊल खुणा आहेत. ते आपले नाते महात्मा फुले-छत्रपती शाहु व डॉ बाबासाहेब आंबेडकर या युगप्रवर्तक महापुरुषांशी सांगतात. म्हणून त्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या खऱ्या वारसदार लेकी ठरतात.

सावित्रीमाईंनी पेटविलेल्या समग्र क्रांती ज्योत तेवत ठेवण्याचे काम हिरीहिरीने या ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या रुपाने करीत आहेत. म्हणून या लेकीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

शूद्रांना सांगण्याजोगा।
आहे शिक्षणमार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व।
पशुत्व हाटते पहा’
‘विद्या हे धन आहे रे।
श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी।
ज्ञानी तो मानती जन’
‘उठा बंधूंनो अतिशूद्रांनो,
जागे होऊन उठा
परंपरेचि गुलामगिरी
ही तोडणेसाठी उठा
बंधूंनो, शिकण्यासाठी उठा ’

ही सावित्रीमाई फुले यांची काव्यवाणी आहे.त्यांचा मतितार्थ येवढाच,शुद्रांसाठी शिक्षण हे श्रेष्ठ धन आहे.त्यातून व्यक्ती जागृत होवून आपल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी तत्पर होतो.
मनूने या देशात एक मानवद्रोही समाजव्यवस्था निर्माण केली. मनुवाद्यांनी ती प्रस्थापित आणि प्रतिष्ठित केली. शेकडो पिढ्यांची आयुष्ये या मनुवादी संस्कृतीने बरबाद केलेली आहेत. अमानुषतेचा, क्रौर्याचा एवढा कळस दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीत आढळत नाही. मनुचे हे अपरंपरा क्रौर्य पाहून कवयित्री सावित्रीमाईंचे हृदय हेलावले आहे. मनुचा हा कपटी कावा लोकांना कळावा म्हणून त्या लिहित्या होतात. अभिव्यक्त होतात.अशा प्रकारे अभिव्यक्त, लिहिते होण्याचे एक प्रभावी माध्यम हे साहित्यपीठ असते. त्याचे सातत्य ही त्याला अपेक्षीत क्रांतीची गतिशीलता देत असते. ती गतिशीलता या ओबीसी महिला गेल्या तीन वर्षांपासून प्रसवा सारख्या वेदना सहन करीत आपले ठस्से उमटत आहेत. म्हणून त्या अभिनंदनास पात्र आहेत.
कोणत्याही परिवर्तनासाठी, अगोदर तसे बिजारोपण करावे लागते. मनुष्य जातीत ते विचारांचे असते. विचार प्रसुती साठी जशी शिक्षण ही प्राथमिक गरज आहे, तशीच नंतरची गरज हे त्यानुषंगाने माणसाच्या डोक्यात आपले विचार, तत्व पेरण्याची असते.त्यासाठी वाचावे लागते. त्यासाठी साहित्य सृजनाची गरज भासते. त्या सृजनाला तशी साहित्य संमेलने ऊर्जा प्रदान करीत असतात. म्हणून अभिजन जाती वर्गा पासून तर फुले-आंबेडकरी विचार प्रेरणे पासून दलित, आंबेडकरी,बौध्द साहित्य संमेलने होतात. त्याच्या प्रभावातून पुढे श्रमिक, वंचित, विद्रोही अशाही नावाच्या साहित्य संमेलनांना पेव फुटून अनुनय होतो आहे. अभिजनेत्तर बाकी साहित्य संमेलने घेणारे विविध क्षेत्रात कार्यरत दलित, आंबेडकरी, आदिवासी, ओबीसी आणि भटके-विमुक्त जाती- जमातींचेच प्रतिभावान स्त्री-पुरुष प्रामुख्याने आहेत. या निमित्ताने आम्हाला हे कधी कळलेच नाही, देशात सर्वाधिक लोकसंख्याने असलेल्या ओबीसी समाजात शिक्षण, मंथन, प्रतिभा व विविध साहित्य,कला आदी विषयी अभिरुची असताना त्या़चे स्वतंत्र साहित्य संमेलने हा होवू शकली नाहीत ? असे तर नाही, त्यांच्या मध्ये स्व-जातीय अस्मिता नाही ? किंवा जातीचे शूद्र म्हणून न्यूनगंड असावा ? दलित म्हणून अनुसूचित जाती समूहात तर तसा सर्वाधिक न्यूनगंड असायला पाहिजे होता. पण त्यांनी तो एका क्षणात झटकून नवपरिवर्तनाचा ध्यास घेतला.

आणि बघता बघता या पन्नास-साठ वर्षांत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करीत आपली तशी छाप पाडली. कारण त्यांनी आपल्या मन, मेंदूतील ब्राह्मणी गुलामी,लाचारी फेकून दिली. अर्थात त्या मागे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणा होत्या. आंबेडकरी प्रेरणा म्हणजे डोळस होणे.प्रज्ञावान होते.ऊर्जावान होणे. सिंहाचे जावे म्हणजे निर्भयी होणे. समतेची,ममतेती कास पकडणे. हे निर्विवाद सत्य आहे.त्याच वेळी ते डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या आदर्श प्रेरणा पुरुष बुद्ध, कबीर, फुले सांगतात. ते तर ब्राह्मणी धर्म शास्त्रानुसार शुद्र ओबीसी जातीची होती.म्हणजे शुद्र ओबीसी कडे बुद्ध, सम्राट अशोक पासून तर फुल्यांपर्यंत आदर्श महापुरुषांची परंपरा असताना त्यांच्यात स्व- जातीय ओबीसी अस्मिता जागत नसेल तर त्यांचे मेंदू ब्राह्मणवादाने सडून अमानवीय झाल्याचे म्हणता येईल. हे कटू सत्य आहे,बहुजन ओबीसी समाजाचे वाचन हे ब्राह्मणी पोथी, पुराण व धर्मशास्त्र राहिले आहे.आणि त्यांचे साहित्य निर्मिती रंजक ! ते व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तीमत्व घडविणे नाकारते. ते ब्राह्मणी धर्म,पोथी,पुराण व कर्मकांड कथन करते. त्याच्या कर्मकांडाचा भारी पगडा त्यांच्या अर्थात निधर्मी ओबीसींच्या मनसपटलावर पडला.त्यामुळे ते वेगळा विचार करायला आणि नवे विचार स्वीकारायला सहसा तयार होत नाही.त्यामुळे फुले दाम्पत्यासह छत्रपती शाहू महाराज आणि शुद्र पूर्वी कोण होते ? हे सांगणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी स्थितप्रज्ञ राहिले. त्यावरील धूळ साफ करण्याचे महत्त काम पाच-सहा जणींचा समूह करुन समस्त ओबीसी जाती समूहात स्व-भान जागवत असेल तर ते कार्य ऐतिहासिक नाही का ? त्या खऱ्या अर्थाने सावित्रीमाई फुले यांच्या लेकी सिध्द होत नाही का ?

असे म्हणतात,’ जिस समय जागे, वही से सबेरा ‘ या तत्वा नुसार ओबीसी महिलांचे काल संपन्न तिसरे साहित्य संमेलन, ही त्यांची जागण्याची ऊर्मी आहे.ते काम तर खऱ्या अर्थाने ओबीसी पुरुषांनी कधीचेच करायला पाहिजे होते. पण ते राजकारणाच्या नांदी लागून प्रस्थापितांचे लाचार चमचे, दलाल म्हणून सत्ता, संपत्तीच्या मोहात पडले.त्यातून त्यांनी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक जनजागृती कडे कधी लक्ष दिले नाही. आणि तसे करणाऱ्यांच्या मार्गात अनेक विघ्ने आणली. पहिल्या साहित्य संमेलना वेळी आयोजकांना तसा वाईट अनुभव आला होता.तेव्हा त्यांनी थोडे नमते घेत वेळ निभावून घेतला. तेथून त्या हुशार झाल्या मुळे विना विघ्न कालचे तिसरे फुले-शाहु-आंबेडकरी ओबीसी महिला साहित्य संमेलन थाटात पार पडले. ओबीसी महिला साहित्य संमेलन म्हणजे चुल व मुलं पर्यंत सीमित राहणाऱ्या ओबीसी महिलांना व्यवस्थे विरुद्ध बंडखोरीचे संकेत देते. त्याचे प्रतिबिंब आम्हाला जेमतेम युवा झालेल्या शिवानी वडेट्टीवार हिच्या भाषणातून झलकले. ती म्हणते , आता ओबीसी समाजाला आपले दैवत ब्रम्ह-विष्णू-महेश या ऐवजी फुले- शाहु-आंबेडकर यांना ठरविले पाहिजे.विद्येची देवी सावित्रीमाई फुले हिला स्वीकारले पाहिजे. तेच आमचे खरे दैवत आहेत. ते या मुलीला कळते पण ते मंदिरात हनुमान चालीसा वाचणाऱ्या पुरुषांना कळत नाही. कारण त्यांचे वैचारिक व सांस्कृतिक अधिष्ठान नाही.संमेलनाध्यक्षा अरुणा सबाने यांचे मंचा वरील खुले भाषण ,मूल्यहिन वाटले.त्यांचा भर हा संघी नरेंद्र मोदी प्रमाणे,’ सब का साथ,सब का विकास ‘ अशा भ्रमातील होते.तर छापिल अध्यक्षीय भाषणात त्यांनी चंद्रपुराला वैभवशाली केलेल्या बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे यांचा व तेथे झालेल्या अद्भुत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीचा उल्लेख टाळलेला दिसतो.आम्ही समजतो , तो ओघाने न कळत झाला असेल.पण या संमेलनाचे लोण उत्तर भारतात घेवून जाण्याची ग्वाही दिल्लीहून आलेले प्रखर ओबीसी वक्ते प्रा डॉ लक्ष्मण यादव यांनी दिले.असे यादव ओबीसी समाजाला मिळाले असते तर आज देशातील राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक व आर्थिक चित्र काही वेगळेच दिसून आले असते.देश पुन्हा मनुवादाचा मगरमिठीत सापडला नसता.ती शृंखला तोडण्यासाठी पुन्हा नव्या उमेदीने सावित्रीबाईंच्या लेकी कलम घेवून नव्या प्रासंगिक सृजनाच्या वाटेने व्यवस्थेच्या सर्जनासाठी तयार झाल्या आहेत.त्याचे आम्ही ब्राह्मण पीडित बहुजन समाजाने स्वागत केले पाहिजे.

” आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी,
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए.

✒️मिलींद फुलझेले(नागपूर,संपादक दैनिक “बहूजन सौरभ”)मो:-७७२१०१०२४७