विधवा प्रथेवर हेरवाडी गावचा घाव-क्रांतीकारी पाऊल

31

महाराष्ट्र नेहमीच देशासाठी दिशा दाखवणारा प्रांत म्हणून ओळखला जातो. आता ही एक क्रांतीची ठिणगी शाहू महाराजांच्या कोल्हापूर राज्यातील हेरवाड या छोट्याशा गावाने टाकली आहे. भारतात अनेक चालीरीती होत्या.आहेत.त्या ही महिलांशी निगडित. महिलांवर अन्याय .करणाऱ्या. त्यांना मुलभूत हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या अनेक परंपरा भारतीय समाजात होत्या.पण या अनिष्ट चालीरीती वर अनेक सुधारकांनी घाव घातला.आणि त्या चालीरीती बंद पाडल्या.परंतु आजही अनेक चालीरीती समाजात आहेत. त्यापैकी एक म्हणजे विधवा प्रथा.

सध्या हेरवाड हे गाव खुप चर्चेत आले आहे. त्याचं कारण म्हणजे या गावाने एक धाडसी आणि क्रांतीकारी निर्णय घेतला आहे.तो म्हणजे गावाने *विधवा प्रथा*बंद करण्याचा एकमुखी ठराव घेतला आहे. त्यासाठी त्यांनी परंपरेची, धार्मिक कट्टरतेची चौकट सोडून विचार केला आहे. मुळात स्त्रियांच्या बाबतीतचा विचार वा एखादी परंपरा हा धार्मिक अथवा सामाजिक विषय असूच शकत नाही. तो त्यांच्या मुलभूत हक्काशी निगडित असू शकतो.विधवा विवाह,बालविवाह, सतीप्रथा,या रूढी परंपरा जशा जाचक आणि घातक होत्या अगती तशाच प्रकारची विधवा प्रथा जाचक आहे. विधवा प्रथा म्हणजे काय..ज्या स्त्री चा नवरा वारलेला आहे त्या स्रियांना विधवा म्हणून समाजात गणलं जातं.मग अशा स्रियांना कपाळावर कुंकू लावायला मनाई केली जाते. मंगळसूत्र, जोडवे,दागदागिने, भरजरी वस्त्र घालायला हरकत घेतली जाते.एवढच नाही तर मंगल प्रसंगी, एखाद्या शुभकार्यात हीला पुढे येऊ दिलं जात नाही. जर चुकून पुढे आलीच तर अशुभ मानलं जातं.पांढऱ्या कपाळाची का इथं आली असं म्हणून तिला हिनवलं जातं.तिच्या घरातील स्वतः चा कार्यक्रम जरी असला तरी तीला पुढे होता येणार नाही. अशा प्रकारच्या अनेक जाचक अटी तिच्यावर लादल्या जातात.

त्या स्त्री चा तिचा नवरा मरण्यात दोष काय?पण त्याच्या यातना मात्र तिला आयुष्यभर भोगाव्या लागतात.याऊलट पुरुष जर विधुर झाला तर त्याला कसलेही बंधने अथवा रूढी परंपरांना सामोरे जावे लागत नाही.तिला नटावं वाटत असेल.नेटनेटकं रहावं वाटत असेल.कपाळावर कुंकू भरावा वाटत असेल .बाहेर चारचौघात मानसन्मान मिरवावं वाटत असेल.मग तिच्या मनाची कुचंबना किती होत असेल.तिचं जगणं किती विवेंचनेचं असेल याचा विचार कोणी करत असेल का?ती कितीतरी वेळा कोपऱ्यात जाऊन एकटीच रडत असेल.ती कितीतरी वेळा आपल्या ओल्या झालेल्या डोळ्याच्या कडा कोणालाही न कळू देता एकटीत पुसत असेल.मग तिच्या मनाचा समाजाने विचार करायला नको का? घटनेने जगण्याचे जे मुलभूत हक्क दिले आहेत तिची पायमल्ली का होत आहे याचा विचार व्हायला हवा.

मुळात स्त्री ने स्वतः प्रगल्भ व्हायला हवे. कारण एक स्त्री च दुसऱ्या स्त्रियांना दुषणे देते.तिला पाण्यात पाहते.त्यामुळे अशी वेळ कोणावरही कधीही येऊ शकते म्हणून समोरच्या स्त्रिचा मानसन्मान दुसऱ्या स्त्री ने राखला पाहिजे.स्वतः हुन ही नको ती लक्तरं फेकून दिली पाहिजेत.स्वतः च्या अधिकाराचा वापर स्वतः ला करता आला पाहिजे. तरच स्त्री दास्यातुन स्त्री ला मुक्ती मिळेल.हेरवाडी गावाने शाहुंचा वारसा जपला .नुसता जपलाच नाही तर तो पुढे चालवला आहे. तो वारसा महाराष्ट्रच नव्हे तर देशाने पुढे चालवायला हवा.

✒️सतीश यानभुरे(मो:-8605452272)