भारतीय भूमितील सर्वोत्तम जागतिक मार्गदर्शक तथागत गौतम बुद्ध होय

42

अनेक विचारवंत,मार्गदर्शक विचारांची सुरुवात करताना, जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे म्हणून तथागत गौतम बुद्ध यांचा उल्लेख करून अभिवादन करतात.त्या सर्वोत्तम महानायकाला आपण अधिक डोळसपने, तटस्थपणे फक्त समजून घेऊया.सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव महामाया तर वडीलाचे नाव शुध्दोदन होते.शुध्दोदन हे शाक्य गणाचे प्रमुख होते. तर कोलीय गणातील अंजन यांच्या कन्या महामायादेवी आणि महाप्रजापती या दोघी शुध्दोधनाच्या पत्नी होत्या. महामाया प्रसूतीसाठी देवदह या आपल्या माहेरच्या नगरीकडे जात असताना वाटेतच लुबींनी या गावी प्रसूत झाल्या.ही घटना वैशाख पौर्णिमा इ स पु 563 झाली म्हणजेच सिद्धार्थ गौतम यांचा जन्मदिन होय.तर त्यांचे परीनिब्बान इ स पू
483 मध्ये झाले. म्हणजे एकूण 80 वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले.
बुद्ध साहित्याचे अभ्यासक, संस्कृतपंडित, इतिहास संशोधक डॉ.आ.ह साळुंखे त्यांच्याविषयी सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध या ग्रंथात म्हणतात.

“बुध्द कोणी परका नाही. कोणत्याही अर्थाने परका नाही. वैरी तर नाहीच नाही.खरेतर तो आपल्याच अंतःशक्तीचे साकार रूप आहे. *आपल्याच सर्वस्वाचे अस्सल सार आहे*. *आपण पूर्णपणे फुलल्यावर जसे दिसू अगदी तंतोतंत तसा बुद्ध आहे.* किंबहुना आपण त्याचे अविकसित पूर्वरुप आहोत आणि तो आपले विकास उत्तररूप आहे.”डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध यांच्या विषयी, *जगाच्या इतिहासामध्ये* *समता,स्वतंत्रता बंधुता व न्याय हया तत्त्वांचा प्रचार प्रसार करनारे तथागत बुद्ध हे पहिले व्यक्ती होते.*
तर शुद्धोधन राजा यांच्या विषयी *बुद्ध आणि धम्म* या ग्रंथात
डॉ बाबासाहेब आंबेडकर लिहतात,”Suddhodana was a wealthy person.The Lands he held were very extensive and the retine under him was very large”यावरून शुध्दोधन राजा त्यांच्याशेती,संपत्ती,महसूल,विषयीची जाणीव होते. तसेच त्या काळातील गणव्यवस्था तसेच शाक्य कुल बाबतचा आजच्या वर्तमान व्यवस्थेशी संबंध पाहिला तर तथागत हे शेतकरी कुणबी घराणे यांच्याशी संबंधित होते.हे सहज लक्षात येते.गौतम बुद्ध यांच्या जीवन-कार्याला समजून येताना काही संकल्पना समजून घेऊया.

*तथागत*-
ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केले आहे,तो तथागत. यथा-तथा ‘जसे आहे तसे’. तथा हा शब्द तथ्य सत्य व वस्तुनिष्ठता दर्शविणारा आहे.तथागत ची फोड
तथा- सत्या, तथ्यापर्यंत – गत – गेलेला. ज्याने तथ्य जसेच्या तसे जाणले आहे,तो तथागत होय.
*बुध्दम शरणम गच्छामी*- नेतृत्वाचा स्वीकार करतो.
*धम्म शरणम गच्छामी*-विचारधारा स्वीकार करतो.
*संघम शणमं गच्छामि*- संघटनचा स्वीकार करतो.
या तीनही गोष्टी आपण समजून घेतल्या तर आपण अधिक बुद्धीमान-ज्ञानी होयूया.
बुद्ध साहित्याचे अभ्यासक
डॉ आ ह साळुंखे म्हणतात,
आपले करंटेपण झटकुया.
डोळे उघडू या. त्याला डोळे भरून पाहूया.त्याच्या जीवन प्रवाहाने हिरवेगार होऊया.
बुद्ध शरणम गच्छामि म्हणूया.
तसे म्हटल्याने आपण बाटणार नाही,की विटाळणार नाही.
भ्रष्ट होणार नाही,की पतित होनार नाही.तसे म्हटल्याने आपण विवेकाच्या हाकेला ओ देऊ, जीवनाच्या सादाला प्रतिसाद देऊ!
*भगवा*:- हा शब्द मूळ तिपीटकामध्ये 8758 वेळा आलेला आहे. तर अट्टकथा,टीका व तिपिटक यात एकत्रित विचार केल्यास तो एकूण 17942 वेळा आलेला आहे.म्हणजेच हा मूळ शब्द बुद्ध साहित्य यातील आहे.
भिख्खू वापरत असलेले *चिवर* याचा रंग हा भगवा आहे.
*सर्वोत्तम*: – भारतीय महापुरुषामध्ये सर्वात उत्तम असे, ज्याला इंग्रजीत BEST किंवा one of the Best म्हणतो. चांगला माणूस म्हणून सुखी जीवन जगण्यासाठी सर्वात उत्तम दृष्टी देनारे,या नात्याने ते सर्वोत्तम भूमिपुत्र आहेत.
तथागत यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक विचारात *पंचशील* समजून आपण अंगीकृत करावे, यासाठी आहे.पाली भाषेतील शील व त्याचा अर्थ पाहूया.
*1* पानातिपाता वैरमणी सिक्खापदम समाधियामी.
(कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही.)
*2*.आदीन्नदाना वैरमनी सिक्खा पदम समाधियामी.
(चोरीने किंवा दुसऱ्याची मालमत्ता लबाडीने, बळजबरीने संपादन करण्यापासून अलिप्त राहतो)
*3.* मुसावादा वैरमणी सिक्का पदम समाधीयामी-
(असत्य भाषणापासून अलिप्त राहतो.)
*4* सुरामेरय मज्ज पमादठाणा वैरमनी पदम समाधियामी. (मादक पेयापासून अलिप्त राहणे.)
*5*.कामे सुमेच्छारा वैरमनि सिक्खा पदम समाधीयामी.
(कामवासनेपासून अलिप्त राहते)
जगातील बहुतेक धर्माचे सार हे या पंचशील आचरणात आहे,
असे म्हणायला हरकत नसावी.
कारण मानवता,समता,बंधुत्व, स्वातंत्र्य,न्याय,विज्ञान व चिकित्सा या तत्वांचा अवलंब यात दिसून येतो. तसेच *अष्टांगमार्ग* ही समजून घेणं गरजेचं आहे.जी आदर्श जीवन पध्दती आणि अनेक धर्माचा आदर्श सिद्ध होते.
*अत:दीप भव*
म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा!
आपण स्वतः प्रकाशित होण, ज्ञानी होण,जाणून घेणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याबाबत तथागत गौतम बुध्दांचा एक उपदेश आहे,
“एखादी गोष्ट ऐकीव माहितीवरून स्वीकार करु नका.परंपरा आहे म्हणून स्वीकार करु नका.एखादी गोष्ट पिटकातून आली आहे, एवढ्यावरून स्वीकार करू नका, बाह्यरुप,अंदाज बांधुन,सुंदर रुप पाहुन स्वीकार करू नका.
श्रमण आपला गुरु आहे,असा विचार करून स्वीकार करु नका. तुम्ही जेव्हा स्वतः होऊन अनुभव घ्याल,की या गोष्टी अकुशल आहेत,या गोष्टी सदोष आहेत, या गोष्टीची जाणकारानी निंदा केलेली आहे,या गोष्टी घेतल्या असता अहिताला आणि दुःखाला कारणीभूत होतात,तेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा त्याग करा!
जेव्हा तुम्ही स्वतःहून असा अनुभव घ्याल की या गोष्टी हितकारक आहेत,या गोष्टी निर्दोष आहेत,या गोष्टीची जाणकारांनी प्रशंसा केली आहे, *या गोष्टी घेतल्या असता हिताला* व *सुखाला कारणीभुत* *होतात,* *तेव्हा त्या स्वीकारा आणि त्यांना अनुसरून आचरण करा*

*चरथ भिक्खवे चारिकं*
*बहुजन हिताय,*
*बहुजन सुखाय*
*लोकानुकंपाय अतानू हिताय*
*आदि कल्याण मध्य कल्याणं अंत कल्याण*
सतत लोकांच्यामध्ये जावून त्यांना ज्ञान देणे,मार्गदर्शन करत राहणे,त्यासाठी चालत रहावे.
लोकांवर अनुकंपा करनारा,
लोकांच्या हिताचा हा विचार आहे.जो सुरुवात,मध्य आणि शेवटीही कल्याणकारी आहे. हा विचार समजून घ्यावा.एका प्रसंगी बुद्ध म्हणतात,
कोणत्याही भिख्खूचे बोलणे चिकित्सा करण्यापूर्वीच नाकारू नये आणि उद्धटपणाने
तर मुळीच तसे करू नये. *दुःखावर मात करणे हे तथागतांचे उद्दिष्ट होते.*
“ज्यांच्या कडे आपल्यापेक्षा काही विशेष आहे त्यांच्याशी ईर्षा न करता,ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही कमी आहे,त्यांचा अवमान न करता आणि जे आपल्याशी समान आहेत त्यांच्याशी स्पर्धा न करता ,तू जगामध्ये श्रेष्ठत्वाकडे गेलास’ असे तथागत म्हणतात. तुलनात्मक जर विचार केला वर्षातील चार महिने सिंहावलोकन करून,चर्चा, प्रशिक्षण,विश्लेषण,मेडिटेशन करून बौद्ध भिख्खू यांना आठ महिने नियोजनानुसार प्रचार प्रसार करावा लागत असे.
हेच पूढे वारकरी धर्मात चारिका म्हणजे दिंडीत होत असे. मुक्कामच्या प्रत्येक ठिकाणी कीर्तन म्हणजे उपदेश असतोच.अनेक बाबीमध्ये साम्य आपणास जाणवेल.संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग यावर बुद्ध विचारांचा प्रभाव आहे. *तोडावया अवघा चेष्टांचा संबंध*।
*शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे*॥
– संत तुकाराम महाराज.
*बुद्ध अवतारी।आम्ही झालो संत।*
*वर्णावया मत।नामा म्हणे।*
– संत नामदेव महाराज
*हाती न घेता तलवार।*
*बुध्द राज्य करी जगावर।*
*कारण एक।प्रभावी प्रचार*।।
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
स्वातंत्र्य,समता,बंधुत्व,न्याय ही मानवी मुल्ये संपुर्ण जगाला देणारा भारतभुमीचा सर्वोत्तम भूमिपुत्र .त्यांच्या कृतीविचारांचा प्रभावाने महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्म,वर्धमान महावीर यांनी जैन धर्म यांची निर्मिती झाली.तर 1900मध्ये कॅलिफोर्निया येथे तथागत बुद्ध या विषयावर भाषण देतांना *स्वामी विवेकानंद* म्हणतात,
“तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही. बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता, तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही.असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा.जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही.उभा राहिला. तेवत राहिला…”
बुद्ध यांनी पहिला उपदेश-प्रवचन हे फक्त पाच लोकांपुढे दिले होते.त्यानंतर लोक विचाराने जोडत गेले.आज बुद्ध विचारांचे जगभरात अनुयायी निर्माण झालेले आहेत. बुद्ध धम्म हा कोणतेही कर्मकांड नसलेला समतेच्या,मानवतेच्या आणि विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेला धर्म आहे.
बुद्ध सतत चिकित्सा स्वीकारत. चर्चेत ते म्हणतात,आनंदा माझ्या माघारी संघाला वाटल्यास त्याने बारीक सारीक नियम रद्द करावेत. याचाच प्रत्यय आपणास भारतीय समाजातील बौद्धिक स्वातंत्र्याचा इतिहास अभ्यासताना येतो. तसेच भारतीय राज्यघटना यात काही नियम तरतूद यात घटनादुरुस्ती तरतूद यातून येतो.
नालंदा,तक्षशिला ही विश्वविद्यालय त्यांचा दर्जा याबाबतचा इतिहास जागृत पणे अभ्यास करावा.भारतातील दोन हजार लेण्यांपैकी दीडहजार लेण्या महाराष्ट्रात आहेत.
राजा आणि सम्राट यातील फरक आपल्याला समजला पाहिजे बरं! *सम्राट अशोक यांचा इतिहास जाणून त्यांनी तथागत यांच्या कृतीविचारांचा अंमल आपल्या साम्राज्यात केला होता.म्हणून तर *GDP हा सर्वोच्च 32%* होता. यावरून साम्राज्याची सुबत्ता लक्षात येते.आपल्या देशाची राष्ट्रीय प्रतिके,चलनी नोटा, राजमुद्रा यात सम्राट अशोकांचा सारनाथ येथील स्तंभाचा उल्लेख केला आहे.परदेशात ही *तथागत बुद्ध,सम्राट अशोका* यांच्या भूमीतुन आलेलो आहोत, असे सांगितले जाते. तथागताच्या उपदेशातून जगभर हा विचार क्रांतीच्या स्वरूपात रुजला, फुलला.परंतु प्रतिक्रांतीमध्ये पुश्यमित्र शुंगाने कपटाने ,पुढे त्याच्या अंध भक्तांनी धम्मावर अनेक हल्ले केले. बुद्ध भिख्खू यांच्या कत्तलीसुद्धा केल्या आहेत,धम्मात भेसळ करण्यासाठी अनेकांना भिक्खू बनवून सुध्दा पाठविले!
बुद्धानंतर 400 वर्षानी आलेली मनुस्मृती हिने चिकित्सा बंद करून कर्मकांड याचे स्तोम माजविले.परंतु क्रांतिकारी विचार आजही जगभरात वाढलेला आहेच.
विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 क्रांतिकारक बुद्ध धर्माचा स्वीकार केला.हिंदू धर्मात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकंसह स्वीकारला.मग सहज प्रश्न पडतो की 13 ऑक्टोबर 1956 पर्यन्त येथे बौद्ध कोण कोण होते ?
जर विचार शाबुत मेंदुने केला तर प्रश्नाचे उत्तर मिळतील!
का अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तत्कालिन लोकांनी तो स्वीकारला,म्हणून आम्ही कथित स्पृश्य म्हणवून घेणारे त्या पवित्र-धम्मालाच अस्पृश्य Untouchable समजून आपला करंटेपना दाखवत तर नाही ना !
कारण 1916 ला कृष्णराव केळूसकर गुरुजी जे मराठा बहुजन होते. त्यांनी स्वलिखीत बुद्धचरित्र बाबासाहेब आंबेडकर यांना ते मॅट्रिक पास झाले होते म्हणून भेट स्वरूपात दिले होते.
भन्ते आनद कौसल्यानं व डॉ. आंबेडकर संवादात,
भन्ते तुम्हाला बुद्धाची कोणती मुद्रा सर्वात जास्त आवडते.
भन्ते उत्तर देतात,
*ध्यानस्थ मुद्रा!*
भन्ते बाबासाहेब आंबेडकर यांना हाच प्रश्न विचारतात.
तुम्हाला कोणती मुद्रा आवडते ? त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर
*चारिका करायला निघालेले बुद्ध*”

बुद्ध ,(नेतृत्व) धम्म (विचारधारा) आणि संघ(संघटन) याबाबत आपल्याला अनुयायी बनून कार्य करावे लागेल.आपण निश्चितच त्यासाठी वेळ बुद्धी पैसा आणि श्रम याने साथ सहयोग कराल असा विश्वास वाटतो.
शेवटी डॉ आ ह साळुंखे यांच्या शब्दांत म्हणतात,
*सूर्य होता आले नाही,*
*तरी सूर्यफूल व्हावे.*
*मस्तक त्याच्याकडे असावे,*
*त्याच्या अलोकात पहावे!*
*बुद्ध होता आले नाही,*
*तरी बुद्धफुल व्हावे*
*ह्रदय त्याच्याकडे असावे’*
*त्याच्या स्फूर्तीत जगावे*!!

✒️लेखन:-रामेश्वर तिरमुखे(राज्यकार्याध्यक्ष,सत्यशोधक वारकरी महासंघ,महाराष्ट्र)मोबा.9420705653
ramtrimukhe@gmail.com