” चिकित्सक मांडणीतून भ्रम दूर करीत वास्तवाशी अवगत करणारा लेखप्रपंच : ‘शोषित मुक्तीच्या लढाया …!”

नागपूर येथील शिक्षक, कवी, समीक्षक, लेखक संदीप गायकवाड यांचा ” शोषित मुक्तीच्या लढाया : भ्रम आणि वास्तव” हा वैचारीक लेखसंग्रह वाचतांना शोषित, पिडीत, वंचीतांसाठी काम करणा-या लोकांनी खरच मनापासून त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न केले आहेत का ? की निव्वळ भ्रम निर्माण केला?  याचा परिचय होतो . यातील एक मुद्दा म्हणजे, गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजासाठी केलेल्या आठ मागण्यापैकी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाच्या  मागणीला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गेलेले म.गांधी हे विरोध दर्शवितात .बाबासाहेब मागणीवर ठाम असता ही मागणी बाबासाहेबांनी मागे घ्यावी म्हणून म.गांधींनी आमरण उपोषण करून बाबासाहेबांवर दडपण आणल्या गेलं. या तडजोडीतूनच पुणे करार निर्माण झाला. हे यामागील वास्तव आहे. परंतु आम्ही अस्पृश्यनिवारणासाठी प्रयत्न करू म्हणणा-यां काँग्रेस व म.गांधीनी केवळ भ्रम निर्माण केला . केवळ देखावा निर्माण केला. शोषितांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जर कुणी काही केले असते तर डाँ. आंबेडकरांसारख्या अनेक महापुरुषांना व्यवस्थेविरुद्ध लढा उभारावाच लागला नसता . यास्तव विविध विषयावर या पुस्तकात सखोल चर्चा केलेली आढळते . बौद्ध धम्म, संविधान, लोकशाही, नवीन शैक्षणीक धोरण, कोरोनाची जागतिक स्तरावरील महामारी आणि त्याचे विविध दुष्परिणाम, जागतिकीकरण आणि आंबेडकरवादी कविता ,स्त्री मुक्तीचा लढा,सावित्रीमाई फुले, या विषयीची गायकवाड यांनी केलेली सखोल, समर्पक समीक्षा म्हणजेच हे पुस्तक होय . ब्लर्ब प्रा.दीपककुमार खोब्रागडे यांचा आहे .मुखपृष्ठ सुधीर कांडळकर यांनी समर्पक रेखाटले आहे.

         अस्पृश्यता निवारण, वर्णव्यवस्था घालविणे, अनिष्ठ गोष्टींना आळा घालणे यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि त्यातील वास्तव व भ्रम काय ? याची चिकित्सक मांडणी करून लेखक लोकांचा भ्रम दूर करीत वास्तवाशी अवगत करू पाहतात.

एकूण चोवीस लेखांचा यात अंतर्भाव केलेला असून विविध विषयावरील चिंतनात्मक मांडणी केलेली आहे.

◾️ ” भारतीय संविधान : आव्हाने व उपाय ” या प्रकरणात सर्वसामान्य लोकांचे हक्क व अधिकार सुरक्षित व अबाधित रहावे या उद्देशाने देशात लोकशाही शासनव्यवस्था टिकून राहिली पाहिजे यासाठी संविधानाची निर्मिती 2 वर्षे 11महिने 18 दिवस या कालावधीत संविधानकर्त्यांनी केली आहे .  395 कलमे व 8 परिशिष्टांचा समावेश असलेले संविधान दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला समर्पीत करण्यात आले व दि.26 जानेवारी 1950 रोजी अमलात आले .

स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय ही चार तत्वे म्हणजे संविधानाचा पाया आहे . यात प्रत्येक व्यक्तीला आपल्या मर्जीनुसार जीवन जगण्यासाठी विशिष्ट मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य बहाल केले आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे . आर्थिक,सामाजिक,व राजकीय समानता प्रस्थापीत करण्यासाठी दिलेली समान संधी . गरीब व श्रीमंत असा भेद न करता सर्वांना समान न्याय मिळावा  आणि धर्म,वंश,जात,लिंग किंवा जन्मस्थान  या कारणावरून भेदभाव न करता सर्व भारतीयांना मैत्रीपूर्ण व सुख शांतीने राहता यावे .या दृष्टीने बंधुभाव हे मुल्य जोपासले पाहिजे . सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजनैतीक या क्षेत्रात समता प्रस्थापित झाली पाहिजे. यानुसार लोकशाही व्यवस्थेचा कारभार चालावा ही अपेक्षा प्रतिपादीत करून त्याकरीता लोकांना काही अधिकार व कर्तव्य सुद्धा बहाल केले आहे .लोकशाहीची व्याख्या करताना बाबासाहेब म्हणतात …” रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणा-या शासनव्यवस्थेच्या प्रकारास आणि पद्धतीस लोकशाही म्हणतात .” यानुसार अपेक्षीत असे बदल घडून येणे आवश्यक आहेत .

       संविधानातील स्वातंत्र्य, समता,बंधुभाव व न्याय या मूल्यांवर आधारीत खरच आज लोकशाही व्यवस्थेचा कारभार पारदर्शकपणे चालतोय का ? की त्यांची उपेक्षा होत आहे ?धर्मनिरपेक्ष या तत्वाची अंमलबजावनी राजकारणाच्या रणांगणात कितपत होते आहे ? हा ही मुद्दा येथे महत्वाचा वाटतो . अन्याय, अत्याचार, छळ, दंगली,पिळवणूक येथे होत नाही का ? शासकीय क्षेत्राचे झालेल्या खाजगीकरणात युवकांना रोजगाराची कितपत संधी उपलब्ध करून दिली जात आहे ? अशी अनेक आवाहने भारतीय संविधानासमोर उभी आहेत . यावर उपाय काय ? तर लेखक यात नमूद करताना म्हणतात की , भारताची एकात्मता जोपासली पाहिजे, संविधान उर्जेची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे, अधिकाराचे उल्लंघन होऊ देऊ नये, भेदभाव व वाद न करता लोकांनी बंधुभावाने वागले पाहिजे . संविधानाचा जागर व रक्षण केले पाहिजे . तरच लोकशाही यशस्वी होईल . ज्यांच्यासाठी लोकशाही व हे संविधान आहे त्यांनी आपले अधिकार व कर्तव्य जाणले व जपले तर सर्व व्यवस्था सुरळीत चालू शकते. नागरिकांनी कोणत्याही मुठभर लोकांच्या बहकाव्यात न येता आपले जीवन जर सुजान होऊन संविधानातील तरतुदीनुसार जगले तर, ही परिस्थिती देशात उद्भवणार नाही . असे मत लेखक व्यक्त करतात . लेखकांनी या विषयाची सखोल व मुद्देसूद पद्धतीने मांडणी केलेली आहे .  लोकशाही ही चार स्तंभावर उभी आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि प्रसारमाध्यमे (वृत्तपत्र) . पण नागरिकांनी ज्यांना आपले प्रतिनिधी म्हणून संसदेत,विधीमंडळात निवडूण पाठविले ,ते आपली जबाबदारी व कर्तव्य योग्यपणे पार पाडताना दिसतात का ? शासन संविधानाची योग्य त-हेने अंमलबजावनी करून लोकशाहीपुरक राज्यकारभार करताहेत का ? या तीनही संस्थांचे एकमेकांच्या कार्यपद्धतीवर लक्ष आहे का ? चवथा स्तंभ आपली जबाबदारी निरपेक्षपणे आणि पारदर्शकपणे पार पाडतो आहे का ? या बाबींचा अंतर्भाव सुद्धा मला महत्वाचा वाटतो . आजची परिस्थीती बघता समाजमन भयग्रस्त अवस्थेत जीवन जगते आहे, असे वाटायला लागते .एकही गोष्ट लोकांच्या मनायोग्य घडताना दिसत नाही.

         ◾️डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा  मानतावाद :  या विषयावरील चर्चा करताना , जगातील पहिला मानवतावादी विचारवंत म्हणून तथागत बुद्ध यांनी आपल्या धम्मज्ञानातून माणसाला नवे आत्मभान दिले आहे .अत्तदीपभव चा जागर केला .  काळाच्या प्रवाहात अनेक धर्म निर्माण झालेत . तसेच तथागत बुद्ध , येशू ख्रिस्त, गुरुनानक,चक्रधर स्वामी, हजरत महमंद पैगंबर, बस्वेश्वर, संत कबीर, संत तुकाराम महाराज यांनी समाजातील वाईट विचारांवर जोरदार हल्ला चढविला . भारतात असलेली अन्यायकारी व विषमतावादी समाजव्यवस्थेने पंच्याऐंशी टक्के स्व:बांधवाना अमानवीय कार्याने गुलाम करून ठेवले होते . या व्यवस्थेविरोधात डाँ.आंबेडकरांनी देश,विदेश पातळीवर महाआंदोलने केलीत. माणूसपणासाठी अहोरात्र झटलेत . तद्वतच प्लेटो, अँरीस्टाँटल,प्रोटोगोरस, बुकानान यांनीही मानवतावादावर चिंतन केले आहे . यावरून एक स्पष्ट होते की, मानवाने माणसासारखे वागणे म्हणजे मानवतावाद होय .बुद्ध म्हणतात, ‘मानव हा जळता अग्नी आहे . विकार हे या अग्नीमुळे पाण्यासारखे उकळतात. अग्नी चेतवता येतो किंवा शांतही करता येतो . तसेच तो मंद ठेऊन त्याचा मानव कल्याणासाठी उपयोग करता येतो . अस्पृश्य लोकांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांना जेव्हा धर्मपरिवर्तनाची गरज भासली तेव्हा त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास केला . चिंतन,मनन करून शेवटी बौद्ध धम्माची निवड करून दि .14 आँक्टोबर 1956 साली लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन, वैश्विक  मानवतावादी विचाराशी जोडण्याचे महत्कार्य केले .
ही फार मोठी रक्तविरहीत क्रांती बाबासाहेबांनी केली. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आज भारतातील बौद्ध धम्मीयांनी आपल्या सर्वसमावेशक उत्थानाकडे वाटचाल सुरू करून आपल्या जीवनात फार मोठा बदल घडवून आणलेला दिसतो . सर्वच क्षेत्रात आज बौद्ध आघाडीवर दिसतात . बाबासाहेबांचा शिका!, संघटीत व्हा !! व संघर्ष करा!!! हा मंत्र व भारत बौद्धमय करण्याची बाबासाहेबांची अपूर्ण राहिलेली इच्छा लक्षात ठेऊन आम्हाला पुढील वाटचाल करण्याची खरी गरज आहे .

           ◾️बुद्ध आणि भारतीय संविधान :  भारतीय संविधान निर्मात्यांनी भारतीय संविधानाची निर्मितीच मुळी बौद्ध धम्माच्या
तत्वज्ञानावर केलेली दिसते . या धम्माच्या ब-याच  खाणाखुणा संविधानात आपल्याला दिसून येतात . व्यक्ती हा विकासाचा केंद्रबिंदू मानून त्याचा सामाजीक, आर्थीक व राजनैतीक विकास  करण्याच्या माध्यमातून संविधान आकारास आलेले दिसते . मानव कल्याणार्थ समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ही तत्वे बौद्ध धम्मातून आलेली आहेत. पार्लमेंटरी पद्धत असो, भारतीय ध्वज वा राजमुद्रा असो,राष्ट्रपतीच्या खुर्चीवरील धम्मचक्र प्रवर्तन सुक्त लिखीत अशोकचक्र असो या संकल्पना संविधानात अधोरेखीत झालेल्या दिसतात. बुद्धाची विचारसरणी ही लोकशाही विचारसरणी आहे . एकूणच बौद्ध धम्म विचारसरणीचा प्रभाव भारतीय शासनवस्थेत आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच की काय ?काही लोकांना संविधान व शासनव्यवस्था रुचताना दिसत नाही .

         ◾️ धम्म मानवाच्या दुःख मुक्तीचा सन्मार्ग : बुद्धाने ज्ञानप्राप्तीनंतर बौद्ध धम्माची स्थापना केली आणि भिक्खू व अनुयायांद्वारा त्याचा प्रचार प्रसार केला . मानवाच्या दुःखमुक्तीसाठी मध्यममार्ग सांगीतला . बुद्धाने चार आर्यसत्य , अष्टांग मार्ग  , दहा पारमीता आणि पंचशील सुद्धा दिलेले आहे .या बुद्ध तत्वज्ञानाचा अवलंब करून मानव आपले जीवन सुखमय करू शकतो . ‘अत्तदीप’ होऊन दुःखावर मात करू शकतो . तो जीवनाच्या उत्थानासाठी सतत उर्जा देत असतो . मानवी जीवन जगण्याच्या पद्धीत बरीच सुधारणा होऊ शकते . देशातील  बहुजन समाजातील अनेक लोक बौद्ध धम्माकडे वळताना दिसतात. ही आनंदाची, कौतुकाची व धम्म प्रसाराच्या दृष्टीने महत्वाची बाब ठरते. म्हणून धम्म हा मानवाच्या दुःख मुक्तीचा सन्मार्ग ठरतो .

     ◾️नवीन शैक्षणीक धोरण 2020 : भ्रम आणि वास्तव :- लेखक याविषयी आपलं मत मांडताना म्हणतात की, शिक्षण प्रणालीतून वर्तमान समस्येचे निदान करून भविष्याचा उन्नत मार्ग निर्माण करणे हे शिक्षणाचे ‘ध्येय ‘आहे . जसे ,ज्ञान प्राप्त करणे, उपयोजन करणे, विकास करणे,वैज्ञानीक दृष्टीकोण निर्माण करणे, संस्कृतीचा प्रचार प्रसार करणे, आदर्शाची जोपासना करणे,विषमतामूलक व्यवस्था हद्दपार करणे,लोकशाही मूल्यांची पेरणी करणे,स्व:जाणिवांचा विकास करणे इत्यादी. तसेच शिक्षणाची काही ‘उद्दिष्टेही’ आहेत . समान शिक्षण, सर्वांगीण विकास, सामाजीक जबाबदारी व राष्ट्रीय जाणीव, बालकेंद्रीत शिक्षण, सृजनत्व निर्मिती,आधुनिक विचारसरणी,धर्मनिरपेक्ष व सामाजिक न्यायाची बांधिलकी, विज्ञान, तंत्रज्ञान जोपासने , शिक्षणातून समाजपरिवर्तन, अवैज्ञनीक विचारसरणीला मुठमाती, धार्मीक असहिष्णूता समाप्त करणे, इत्यादी ठळकपणे सांगता येतील .नविन शैक्षणिक धोरणाचा आधार काय आहे ? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्य व व्यवसायाभिमुख, मातृभाषेतून प्राथमीक शिक्षण, परदेशातील विद्यापिठांना मुक्त प्रवेश, स्वायतता विद्यापीठ निर्मीती,कार्पोरेट शाळा निर्मीती,पाली व इतर भाषांचे संवर्धन,प्राचीन सभ्यतेचा गौरव, डिजीटल क्रांती,समानतेचे शिक्षण, विश्वमानव व महामानव तयार करणे इत्यादी .आणि त्यामध्ये भ्रम कसा निर्माण करण्यात आला आणि वास्तव काय आहे?याचेही विश्लेषण यामध्ये आले आहे .परंपरा व रुढी घट्ट करणे, संविधानात्मक तरतुदींना फाटा, प्राचीन ग्रंथाचा उदो उदो, बहुजन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातून बाहेर फेकणे, चातुर्वर्ण्य चौकट मजबूत करणे, वंचितांना सेवा व चाकरी करण्याचा डाव, यासह अनेक वास्तव सांगीतले आहेत . याविषयी गायकवाड यांनी सखोल विवेचन केले आहे . या विषयावर संसदेत चर्चा करून या धोरणातील सत्यता बाहेर आणण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली आहे.

◾️भारतीय संविधान: मानवमुक्तीचा प्रलेख असल्याचेही लेखक गायकवाड यांनी आपले मत मांडले आहे . भारतीय समाजाला एकत्र बांधून ठेवणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय . भारतातील विषमतेने बरबटलेल्या धार्मिक मनुप्रणित व्यवस्थेला नेस्तनाबूत करून समग्र मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झालेली संविधानसंहिता म्हणजे कल्याणकारी योजनांचा आलेख असल्याचेही ते म्हणतात . हे खरे आहे आहे , याविषयी दुमत नाही पण आजच्या काळातील शासनव्यवस्थेच्या वाटचालीचे वास्तव बघता देश कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे . हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे . वाढलेली महागाई , रोजगार व शासकीय नोक-या हद्दपार झाल्या आहेत . शासकीय साधनसंपत्तीचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे . बरेच संसाधने लीजवर दिले जात आहेत. काही विकल्या जात आहेत . भांडवलदारांचे येथे फावते आहे. आंतर कलह निर्माण होताना दिसताहेत . भारत राष्ट्राच्या ऐवजी हिंदू राष्ट्राची संकल्पना पुढे आणण्याचे सुतोवाच लोक उघड उघड करताना दिसताहेत, संविधान बदलण्याचीही भाषा बोलली जाते आहे .अलीकडे  जरी हिंदू राष्ट्राची संकल्पना जोर धरू लागली असली तरी देशाचे राष्ट्रीयत्व हे हिंदूत्व नसून भारतीयत्व हेच खरे राष्ट्रीयत्व आहे. हे बहुजन समाजाने समजून घेणे अगत्याचे आहे. विरोधी पक्ष असून नसल्यासारखा , अशक्त झाला आहे . शासनाच्या विरोधात बोलल्यास देशद्रोह माणला जातोय .खरच येथे लोकशाही नांदते आहे का ? याविषयी समाजमाध्यमातून लोक शंका व्यक्त करताना दिसतात. यावर ठोस उपाय योजना होण्याची गरज वाटते.अशावेळी आम्हाला या दगलबाज व्यवस्थेच्या विरोधात उभे राहण्यासाठी, आमच्या प्रेरणा , तथागत बुद्ध, डाँ.बाबासाहेब, चैत्यभूमी, दीक्षाभूमी यापासून ऊर्जा मिळत असते .

◾️चैत्यभूमी म्हणजे निळ्या पाखरांची अणुऊर्जा होय, असं लेखक म्हणतात.दि.6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले . तेव्हा लाखो लोक हळहळले होते . आज करोडो लोकांसाठी  चैत्यभूमी ही प्रेरणास्थान बणलेली आहे.चैत्यभूमी म्हणजे दादरमधील ज्या भूमीवर डाँ.बाबासाहेबांच्या देहावर अंतीम संस्कार करण्यात आले ती जागा (स्मशानभूमी) होय. त्याचेच पुढे चैत्यभूमी असे नामकरण करण्यात आले. कित्येक दिवसापासून सबंध भारतातून व परदेशातील लोक तेथे येतात .कारण तेथून कार्यप्रवण होण्यासाठी आम्हास उर्जा प्राप्त होत असते .त्याचप्रमाणे लेखकाला दीक्षाभूमी ही एक समग्र क्रांतीभूमी वाटते . आज 65 वर्षाचा काळ नागपूर येथे धम्मदीक्षा घेण्याच्या घटनेला झाला. दि. 14 आँक्टोबर 1956 या पर्वावर बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना स्वतःसोबत बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. ही एक क्रांतीच होती. आणि म्हणूनच ही भूमी क्रांतीभूमी म्हणून ओळखल्या जाते . दरवर्षी भारताच्या कानाको-यातून लाखो लोक नागपूरला दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी येत असतात. येथे पुजेच्या साहित्याची दुकाने नसून पुस्तकांची दुकानेच बघायला मिळतात . बरेच लोक पुस्तके खरेदी करतात व या स्थळावरून प्रेरणा घेऊन जातात. दीक्षाभूमीने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे . ही केवळ धम्मभूमीच नसून ती वाङ्मयीन, शैक्षणीक, राजकीय, समाज,वैज्ञानीक, आर्थीक, सांस्कृतीक, कृषी, पर्यावरण, न्याय, स्त्री समाज इत्यादी क्षेत्रातील काम करणा-या कार्यकर्त्यांना नवीन प्रेरणा देण्याचे काम करते. म्हणूनच ती समग्र क्रांतीभूमी ठरते .

◾️शोषित मुक्तीच्या लढाया : भ्रम आणि वास्तव याविषयी प्रकाश टाकतांना लेखक अनेक उदाहरणाचे दाखले देऊन या विषयाची योग्य समीक्षा करताना दिसतात .बुद्धापासून तर डाँ. बाबासाहेबांपर्यंतच्या अनेक नेत्यांनी, राज्यांनी, पक्षांनी केलेल्या चळवळीचा प्रदीर्घ प्रवास मांडतात. यातील काही चळवळी केवळ फार्स होत्या .त्यातील वास्तव हे वेगळेच होते . केवळ राजकारणासाठी हा देखावा करण्यात आला होता . त्यातून कुणाचेही भले झाले नाही. मात्र बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीमुळे अनेकांना न्याय मिळाला आणि आयुष्याला सकारात्मक वळण प्राप्त झाले. हे येथे महत्वाचे वाटते .
           मध्यंतरी संपूर्ण जगावरच कोरोणा नावाचे संकट आले . त्यात करोडो लोक मृत्यूमुखी पडले तर बरेच बेघर, बेरोजगार आणि विस्थापीतही झाले . या महामारीतून  ब-याच उत्पाती लोकांचे मेंदू जागेवर आले . या काळात डाँक्टर, नर्स, समाजसेवक, दवाखाने, याचीच जास्त गरज लोकांना भासली आणि त्यामुळेच अनेकांचे प्राण वाचले . लाँकडाऊनमुळे अनेकांचे खायचे वांदे झाले . रोजगार गेला ,नोक-या गेल्या, अनेक लोकांनी कामाच्या जागा सोडल्यात, भयभीत झाले, आजार बळावले, महागाई वाढली आणि सोशल डिस्टंनसींगमुळे ( फिजीकल डिस्टनसींग) एक समानतेचा नवा विचार समोर आला .जात, धर्म,वंश, परंपरा विसरून लोक केवळ माणूस झाले होते . पण कुटुंबातच एकमेकाकडे संशयाच्या नजरेने बघत दूरही गेले होते . मृतदेहावर सोपस्कार नाही की बघायला जाणे नाही, की अंतीमयात्रा नाही ,लग्न नाही ,कोणतेच समारंभ,संमेलने,चर्चासत्रे नव्हते. सर्व कृतींना टाळे लागले होते .अनेक लोक कोविड-19 हे एक जागतीक पातळीवरील जैविक युद्ध असल्याचे माणतात . या काळात मंदीर, शाळा, कार्यालये, वाहतुकीची साधने,कारखाणे, उद्योग धंदे,लग्न, ब-याच प्रमाणात दुकाने बंद असल्याने फार मोठे नुकसानही लोकांना सोसावे लागले. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे दोन वर्षात शैक्षणिक नुकसानही फार मोठ्या प्रमाणात झाले . शासनाने आँफलाईन शिक्षण बंद करून आँनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आणला . पण गरीब विद्यार्थांजवळ मोबाईलसारखी महागडी साधने उपलब्ध नसल्याने ते मात्र शिक्षणापासून वंचीत राहिले . विद्यार्थ्यांची मौज झाली पण वर्गाने पुढे जाऊनही ज्ञानाने दोन वर्षे मागे आलीत .कोवीड-19 चा कवितेवरही परिणाम झाल्याचे लेखक नमूद करतात . या काळात अनेक कवींनी या विषयावर कविता लिहिल्या . या काळात राबणा-या हातांना बळ प्राप्त करून दिले . त्यांचे कार्य, त्याग व लोकांचे झालेले हाल अधोरेखीत केले .अनेक साहित्यकृतीही प्रकाशीत झाल्यात .
           बाबासाहेब म्हणतात , “जगातील मानवी समाजात क्रांती यशस्वी व्हायची तर ख-या लोकशाहीचा म्हणजे अर्थातच कामगारशाहीचा जगात प्रचार व्हावयास हवा आहे .” कामगार कायदे दुरुस्ती विधेयक 2014 नंतर व्यवसायाची व्याख्याच बदलवून टाकलेली आहे . केंद्र सरकारणे विस लाख करोड रुपयाची घोषणा केली पण ते पँकेज जर लाँकडाऊनपुर्वी मिळाले असते तर कामगारांचे स्थलांतर थांबले असते . या महामारीने 98% कामगारांचे जीवन उद्धवस्त झाले. हा महत्वाचा मुद्दा आहे . कामगाराबरोबरच शेतक-यांचीही अवस्था  बिकट आहे .भारत कृषीप्रधान देश आहे. 65% जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे . ब्रिटीश कालखंडातही अनेक जाचक कायदे करून पिळवणूक केल्या गेली . आजपर्यंतही आणेवारी सारखे काही कायदे अमलात होते .आताच्या सरकारने 2020 साली शेतीविषय तीन विधेयक आणलेत .1) शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य(प्रोत्साहन व सुलभता 2) शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार(सबलिकरण आणि संरक्षण) 3)  अत्यावश्यक वस्तू (दुरूस्ती) . हे शेतक-यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार असल्याचे सांगण्यात येते . पण वरवर जरी असे असले तरी, शेतक-यांचे यात नुकसानच आहे. म्हणून हे तीनही विधेयक मागे घेण्यासाठी अनेक दिवस शेतक-यांनी विविध पातळ्यांवर आंदोलन चालविले .अनेक शेतकरी मृत्यूमुखीही पडले .शेवटी पंतप्रधानांच्या आश्वासनानुसार आंदोलन स्थगीत करण्यात आले.
             स्त्री मुक्तीसाठी , सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या स्थरावरून अनेक आंदोलने चालविल्या गेले . 1908 साली न्यूयार्कमध्ये
कामाचे तास कमी करण्यावरून कामगार महिलांचे आंदोलन झाले . भारतात संविधानामुळे मात्र स्त्रीयांना आत्मविश्वास मिळाला. संयुक्त राष्ट्र संघाने स्त्री वर्गाच्या प्रगतीसाठी 1975 साली आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा करण्याचे ठरविले . 1848 साली फुले दांपत्यांनी  मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा उघडली . आणि आज स्त्रीने सर्वच क्षेत्रात भरारी घेतली . भारतीय स्त्री शिक्षणाची आद्य जननी म्हणून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा उल्लेख होतो . त्या पहिल्या स्त्री शिक्षीका, मुख्याध्यापीका झाल्यात . त्यांनी पती महात्मा जोतीराव फुले यांच्या बरोबर विविध प्रथांविरोधात कार्य केले.  स्वतः मुल दत्तक घेतले, त्याला डाँक्टर केले,दि.28 नोव्हेबर 1890 साली पतीच्या निधनानंतर ही चळवळ त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं.  सत्यशोधक समाज चळवळही चालविली, प्लेगच्या महामारीत लोकांची सेवा केली . यातच त्यांचे दि.10 मार्च 1897 रोजी निर्वाण झाले . त्या समस्त स्त्री वर्गासाठी खपल्यात पण बहुजन स्त्रीयांमधील रूढी,परंपरा,उपवास, व्रत, वैकल्य अजूनही वजा झाले नाही . याचे दुःख वाटते ?
           जागतिकीकरण आणि आंबेडकरी कविता . याविषयीही लेखकांनी सखोल विवेचन मांडले आहे .जागतिकीकरण म्हणजे काय ? आंबेडकरवादी कविता म्हणजे काय ? आंबेडकरवादी कवितेतील विश्वजाणीवा, आंबेडकरवादी कवितेतील सौंदर्य, आंबेडकरवादी कवितेतील वेदना,विद्रोह व नकार, आंबेडकरवादी कवितेची बांधिलकी, आंबेडकरी कवितेसमोरील आव्हाने, इत्यादी मुद्द्यांवर सखोल भाष्य केले आहे . आंबेडकरी साहित्याने वैश्वीक जाणीवा जपल्या आहेत .हे आंबेडकरी साहित्याचं मोठेपण आहे . त्याने साहित्य जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे . मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या विविध भाषामधूनही हे साहित्य अनुवादीत झाले आहे .
            एकूणच या पुस्तकात विविध विषयावर केलेले चिंतनशील वैचारीक लेखन समाजातील नवपिढीकरीता वाचनीय व प्रेरणादायी ठरेल. बोध घेण्यासारखे लेखन आहे . लेखक संदीप गायकवाड हे उच्च शिक्षीत असून ते व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांचा 1) गर्द काळोखात पेरण्यासाठी (कवितासंग्रह) 2) संदीरा (कादंबरी) प्रकाशित आहेत. ते अनेक वृत्तपत्रातून सांप्रतस्थितीवर स्फुटलेखन करीत असतात. ते चांगले समीक्षकही आहेत .विविध विषयावर ते निर्भेडपणे लेखन करून समाजाला सजग करण्याचं कार्य करीत असतात . या पुस्तकातूनही त्यांनी विविध विषयावर लेखन केलेलं आहे . अनेक विषयातील भ्रम काय आणि वास्तव काय ? या विषयी परखडपणे उदाहरणादाखल आपलं मत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे . बहुजनांना सजग करण्याची आपली भूमिका चोखपणे निभावली आहे . एक सजग कार्यकर्ता म्हणून त्यांनी ही जबाबदारी पेलली आहे . संदीप गायकवाड सर, आपण करीत असलेल्या कार्याबाबत आपलं अभिनंदन. हे नेक कार्य असंच अव्याहत सुरू ठेवावं या साठी आपणास हार्दिक मंगलकामना !

 

◾️लेखसंग्रहाचे नाव: शोषित मुक्तीच्या  लढाया :भ्रम आणि वास्तव
◾️लेखक : संदीप गायकवाड
◾️प्रकाशन : युरो वर्ल्ड पब्लिकेशन,मुंबई
◾️पृष्ठ संख्या : 160
◾️मुल्य : 200/-₹
◾️मो.9637357400

 

✒️अरुण हरिभाऊ विघ्ने,रोहणा, आर्वी, जिल्हा वर्धा

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED