ऊसतोड मजूर लागले परतीच्या प्रवासाला; बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला

45

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.16मे):-जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकत आल्याने ऊसतोड मजुरांची घरवापसी सुरु झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून पेटलेली धुराडी आता बंद होऊ लागली आहेत. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यातील ऊसतोड कामगार कुटुंबियांसह परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

सातारा जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून सहकारी साखर कारखान्यांची संख्याही जास्त आहे. यावर्षी जिल्ह्यातील जरंडेश्‍वर, अजिंक्यतारा, श्रीराम फलटण, न्यू शुगर फलटण, शरयू, स्वराज, जयवंत शुगर, कृष्णा, रयत आदि साखर कारखारन्यांमध्ये हंगामातील ऊस गाळप करण्यात आले. जिल्ह्यात ऊस उत्पादन वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साखर उत्पादनही वाढले आहे. ऊस दराचे त्रांगडे, अवकाळी यामुळे गाळप हंगामही एक महिना उशीरा म्हणजेच डिसेंबरमध्ये सुरु झाला. त्यातच परतीचा व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने तोडणी कार्यक्रम एक महिना पुढे गेला. त्यामुळे यावर्षी गाळप हंगामाची सांगताही उशीराच होत आहे.

शेंद्रे येथील अजिंक्य सहकारी साखर कारखाना व जरंडेश्‍वर या दोन कारखान्यांनी अतिरिक्‍त ऊस तोडीची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे या दोन कारखान्यांचे गाळप अद्याप सुरू आहे. सुमारे सहा महिन्यांपासून ऊसतोड मजूर आपल्या मायभूमीपासून दूर येवून जिल्ह्यातील साखरपट्ट्यात ऊसतोड करत आहेत. बहुतांश ऊसतोड मजूर हे उस्मानाबाद, बीड, नगर, लातूर जिल्ह्यातून आलेले असतात. भीषण दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे ओढवलेली आर्थिक ओढाताण अशा कारणांमुळे हे ऊसतोड मजूर साखर पट्ट्यात तात्पुरते स्थलांतरीत होवून गाळप हंगाम संपेपर्यंत काम करत असतात. घरचे वयोवृध्द, मुलांची शाळा, जनावरे अशा एक ना अनेक अडचणींना तोंड देत वर्षभर हाता -तोंडाशी गाठ पडावी, यासाठी दरवर्षी ऊसतोड करण्यासाठी साखर कारखान्यांवर येत असतात. गाळप हंगामात पाच ते सहा महिने ऊस तोड करतात. मात्र साखर कारखान्याचा पट्टा पडला की या मजुरांना मायदेशी जाण्याची ओढ लागते. कारखानदार व मुकादम यांचा हिशोब झाली की सामानाची बांधाबाध करुन आपल्या मायदेशी परतीचा प्रवास सुरु होतो. दरवर्षीच्या मानाने यावर्षी अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उशीरा संपला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे ऊसतोड मजूर उशीराच मायदेशी परतणार असल्याचे चित्र दिसत आहे.

सामानाची बांधाबाध तर कुठे कपड्यांची धुलाई..

करार झालेल्या कारखान्याचा पट्टा पडल्याने ऊसतोड कामगारांचे मन गावाकडे ओढ घेवू लागले आहे. आर्थिक, कौटुंबिक यासह अनेक अडचणींवर मात करुन हे कामगार इथपर्यंत पोहचले आहेत. काम संपताच होईल तेवढे लवकरात लवकर गावी परतण्याची घाई आहे. प्रत्येक वाहनधारक आपापल्या सोईने मुक्काम हलवणार असल्यामुळे गावोगावच्या या मजुरांच्या खोपटांवर कुठे सामानाची बांधाबांध तर कुठे अंथरुन- पांघरुणासह कपड्यांच्या धुलाईसाठी लगबग सुरु झाली आहे.